कबुतरांचा उच्छाद !

दादर येथील कबुतरखाना

आज मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये कबुतरांची संख्या पुष्कळ प्रमाणात वाढली आहे. लालसर डोळे, मानेकडे हिरवट पट्टा आणि दिसायला रुबाबदार असलेला हा पक्षी अन् त्यांच्या भरार्‍या पाहून अनेकांनी त्याचे उदात्तीकरण केले आहे. काही जण त्यांच्या धार्मिक मान्यतेनुसार त्यांना खायला दाणे टाकतात. दादर येथील कबुतरखाना, गेट वे ऑफ इंडिया येथे आणि अन्य काही विशिष्ट सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना दाणे टाकण्याची वेगळी जागाच असते. तिथे अक्षरक्ष: कबुतरांच्या झुंडीच्या झुंडी असतात. अन्य शहरांतही इमारतींचे सज्जे, गच्च्या, ‘टॉवर’, उंच मोठे खांब अशा विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कबुतरे बसलेली असतात. शहरांतील इमारतींच्या सज्जांमध्ये असणारी कबुतरे खिडकीतून आत येतात आणि घाण करतात, असे ठिकठिकाणी पहायला मिळते. त्यासाठी गच्चीला जाळ्या लावून कारागृहाप्रमाणे घर बंद करावे लागते. वरकरणी निरुपद्रवी वाटणारा हा पक्षी आरोग्यासाठी मात्र घातक आहे.

नेरुळच्या ‘तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर’चे फुप्फुसरोगतज्ञ डॉ. अभय उप्पे यांनी ‘कबुतरांच्या विष्ठेचा मानवी आरोग्यावर काय परिणाम होतो ?’, याविषयी दिलेल्या माहितीनुसार कबुतरांच्या पंखातून निघणार्‍या ‘फिदर डस्ट’ या पदार्थामुळे अतीसंवेदनशील न्यूमोनिया आणि फुफ्फुसाचे आजार बळावण्याची शक्‍यता असते. धूळ, प्रदूषण, कबूतर आणि किडे यांच्या विष्ठेपासून मानवी शरिरात १५० हून अधिक प्रकारच्या ॲलर्जी निर्माण होतात. याला प्रतिबंध न घातल्यास दमा बळावण्याची शक्यता वाढते. अनेक वेळा रुग्णांना होणारा सर्दी, खोकला याचे कारणही कबुतरांची विष्ठा असू शकते. कबुतरांच्या विष्ठेचा दुर्गंध, ती पावसात कुजल्याने त्यात होणारे किडे यांमुळे लहान मुले, गर्भवती महिला, तसेच ज्येष्ठ नागरिक इत्यादी रोगप्रतिकारशक्ती अल्प असलेल्यांना अधिक प्रमाणात त्रास होण्याचा धोका संभवतो. सर गंगाराम रुग्णालयातील आधुनिक वैद्या रश्मी सामा यांच्या मते कबुतरांमुळे होणारे बरेच आजार हे फुफ्फुसांच्या विकाराशी संबंधित असून त्यावर वेळीच उपचार झाले नाहीत, तर हा आजार जीवघेणा ठरू शकतो. कबुतरांची संख्या जसजशी वाढत आहे, तसे या आजारांचे प्रमाण वाढत आहे. खोकला विकार, श्वसनाचे त्रास, अंगदुखी, वजन अल्प होणे, हलका ताप येणे हे सर्व आजार कबुतरांमुळे होऊ शकतात. त्यामुळे या समस्येकडे अधिक गांभीर्याने पहाण्याची आणि उपाययोजना काढण्याची आवश्यकता आहे. वर्ष २००१ मध्ये अनेक देशांनी कबुतरांमुळे होणार्‍या घाणीविरुद्ध मोहीम राबवली होती. लंडनमध्ये सार्वजनिक परिसरात कबुतरांना दाणे टाकण्यावर बंदी आहे. अशा उपाययोजना काढून जागृती आणि कठोर कार्यवाही केल्यास त्यांचा उच्छाद अन् पसरणारे रोग यांना आळा बसेल !

– श्री. संदेश नाणोसकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.