
१. एका साधकाने एका संतांच्या सत्संगात स्वतःकडून साधनेचे काही प्रयत्न होत नसल्याचे सांगितल्यावर संतांनी ‘प्राण्याला शिक्षापद्धत अवलंबावी लागते, तेव्हाच तो ऐकतो’, असे सांगणे
‘आश्रमभेटीच्या निमित्ताने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात एक साधक आले होते. वर्ष २००८ पर्यंत ते नोकरी सांभाळून प्रसारसेवा करत होते. त्यानंतर इतर व्यापांमुळे त्यांची सेवा न्यून होत गेली आणि कालांतराने ती पूर्णपणे थांबली. सहज बोलतांना त्यांनी सांगितले, ‘‘मागे मी रामनाथी आश्रम पहाण्यासाठी नाव नोंदवले होते. तो सुयोग या वेळी आला. मी परवाच इथे आलो. काल संतांच्या सत्संगाचा योग आला अन् उद्या मी जाणार आहे.’’ तेव्हा मी त्यांना म्हणालो, ‘‘संत काय म्हणाले ?’, ते थोडक्यात सांगा.’’ तेव्हा ते साधक म्हणाले, ‘‘मी संतांना सांगितले की, माझ्याकडून साधनेच्या संदर्भात कुठलेही प्रयत्न होत नाहीत.’’ यावर संतांनी माणूस आणि प्राणी यांचे उदाहरण दिले. ‘प्राण्याला शिक्षापद्धत अवलंबावी लागते. तेव्हाच तो ऐकतो’, असे ते म्हणाले.’’
२. ‘मनुष्य आणि प्राणी यांच्या उदाहरणातून संतांना नेमकेपणाने काय सांगायचे असेल ?’, याविषयी झालेले चिंतन
२ अ. मनुष्य : जे हितोपदेश ऐकून त्यानुसार कृती करण्याचा प्रयत्न करतात, त्यांनाच ‘मनुष्य’ असे संबोधू शकतो.
२ आ. प्राणी : ‘मनुष्यजन्म प्राप्त झाल्यावर ज्यांना त्याचे सार्थक व्हावे’, असे वाटत नाही, ते सर्व प्राणीच होत.
२ इ. प्राण्यांना विवेकबुद्धी नसल्याने त्यांच्यासाठी दंड आणि भेद अवलंबला जाणे : मनुष्य आणि प्राणी या भूतलावर सर्वत्र वावरत असतात. मनुष्याला देवाने योग्य-अयोग्य विचार करण्याची बुद्धी दिली आहे. यालाच आपण ‘विवेक’ म्हणतो. प्राण्यांना विवेकबुद्धी नसल्याने त्यांच्यासाठी दंड आणि भेद यांचा अवलंब करावा लागतो. तेव्हाच ते वठणीवर येतात. यातून ज्याने त्याने आपले हित-अहित ठरवणे उचित ठरते.
प्रसंगानुरूप देवाच्या कृपेने झालेले चिंतन कृतज्ञताभावाने अर्पण करत आहे.’
– श्री. धनंजय राजहंस (आध्यात्मिक पातळी ६० टक्के), फोंडा, गोवा.