
भारतीय नद्यांना वैदिक ऋषी ‘लोकमाता’ असे म्हणत; कारण या नद्यांच्या काठीच भारतीय संस्कृतीचा विकास झाला. प्राचीन संस्कृतीचा सगळा इतिहास या नद्यांच्या साक्षीने, त्यांच्याच तीरावर घडला. गंगेसारख्या पवित्र नद्यांच्या तीरावर ऋषींचे आश्रम असत. त्याभोवती मोठमोठी अरण्ये असत. आश्रमांमध्ये वास्तव्य करणारे ऋषी सहस्रो विद्यार्थ्यांना शास्त्र आणि कला यांचे शिक्षण देत असत. दूर असलेल्या नगरांतून मुले आश्रमांमध्ये येऊन रहात. पूर्ण १२ वर्षे असे वास्तव्य झाल्यावर ही मुले शास्त्रपारंगत होत, मग त्यांना ‘स्नातक’ ही पदवी प्राप्त होत असे. ‘स्नातक’ ही पदवी प्राप्त झाल्यानंतर छात्र आचार्यांचा आशीर्वाद घेऊन आणि उपदेश ग्रहण करुन नगरांमध्ये आपापल्या घरी जात. स्वगृही जातांना निरोप समारंभ होत असे आणि आचार्य त्या सर्वांना उपदेश करत.
(साभार : ‘उपनिषद् प्रभा’ पुस्तकातून, लेखक वि. प्र.मोहगावकर आणि ‘सांस्कृतिक वार्तापत्र’)