प्रयागराज कुंभपर्व २०२५
महाकुंभात ४०-५० कोटी भाविक येण्याची शक्यता !

प्रयागराज (महाकुंभनगर), ९ जानेवारी (वार्ता.) – मानवतेचा अमूर्त वारसा म्हणून ओळखला जाणारा सनातन संस्कृतीचा सर्वांत मोठा मानवी मेळावा म्हणजे महाकुंभ आहे. हा महाकुंभ भारतीय श्रद्धेचे प्रतीक आहे. यंदाच्या महाकुंभामध्ये सनातन संस्कृतीवर श्रद्धा असलेले ४०-५० कोटी भाविक येण्याची शक्यता आहे, अशी माहिती उत्तरप्रदेशाचे पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री जयवीर सिंह यांनी सक्रिट हाऊस येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या वेळी उत्तरप्रदेश पर्यटन महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सान्या छाबरा यांनी पर्यटन महामंडळाने मेळ्यासाठी केलेल्या सिद्धतेची माहिती दिली.
मंत्री जयवीर सिंह म्हणाले की,
१. महाकुंभातून परतणारा प्रत्येक भाविक सुखद अनुभव घेऊन निघावा, असा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. महाकुंभ मेळा पुढील ४५ दिवस राज्यातील विविध लोककला, प्रादेशिक कलाकार आणि देशभरातील कलाकार यांचा संगम घडवण्याची संधी उपलब्ध करून देणार आहे.
२. महाकुंभात भव्य ‘ड्रोन शो’ आणि ‘लेझर शोचे’ही आयोजन करण्यात येणार असून त्याचे दिनांक लवकरच घोषित केले जातील. महाकुंभातील भव्यता, दिव्यता आणि अलौकिकता अनुभवता यावी, यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
३. उत्तरप्रदेश पर्यटन विभागाने देहली येथे आयोजित ‘महा कुंभ-२०२५ प्रिल्युड’चाही उल्लेख केला. देशाचे केंद्रीय नेते आणि राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि लोकप्रतिनिधी यांनाही महाकुंभ २०२५ मध्ये विश्वासाने स्नान करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
४. विविध देशांच्या राजदूतांनाही महाकुंभात उपस्थित रहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पर्यटन विभागाकडून ५ एकरांवर ‘यूपी स्टेट पॅव्हेलियन’ची स्थापना केली जात आहे, ज्यामध्ये एकूण १२ सर्किट प्रदर्शित केले जातील.