संपादकीय : दान आणि भीक !

शिर्डी येथील भव्य प्रसादालयामध्ये अन्नदान आणि सुजय विखे पाटील

हिंदु धर्मानुसार दानाला मोठे महत्त्व आहे. अन्नदान, धनाचे दान, वस्तूंचे दान, सुवर्ण दान, गोदान, ज्ञानदान आणि सर्वांत शेवटी प्राणाचे दान हे काही दानांचे प्रकार आहेत. ‘दान केल्याने पुण्य मिळते आणि पापांचे क्षालन होते’, असे शास्त्रांमध्ये सांगितलेले आहे. विविध पापांसाठी विविध दान केले जाते. अशा प्रकारचे दान केल्याने होणार्‍या लाभाची अनुभूती व्यक्ती घेत असते, त्यामुळे दानाचे महत्त्व अद्यापही टिकून आहे. तसे पाहिले, तर या पृथ्वीतलावर अनेक गोष्टी या दानांवरच होत असतात, असे म्हटले, तर चुकीचे ठरू नये. व्यक्ती, समाज, मंदिरे, संस्था, गाव, राज्ये, देश आदींना दान केले जाते, असे दिसून येते. त्यातही अनेक ठिकाणी अन्नदान होतांना अधिक प्रमाणात आढळते. काही जण पैसे देऊन अन्नदानास हातभार लावतात, तर काही जण स्वतः अन्न बनवून किंवा विकत आणून वाटतांना आपण पहात असतो. दान घेणार्‍याची आर्थिक क्षमता नसल्याने किंवा शारीरिक व्याधीमुळे तो दान घेत असतो, तर काही वेळेला धार्मिक कृती म्हणून दान घेतो, उदा. ‘ब्राह्मणांना अमुक एक गोष्ट दान करा, मंदिराला दान करा’, असे म्हटले जाते, अशा वेळी त्या ब्राह्मणाला किंवा मंदिराला त्या वेळी आवश्यकता असते, असे नाही. पूर्वीचे राजे-महाराजे अन्नछत्र उभारून अन्नदान करत होते. आताही अनेक श्रीमंत व्यक्ती विविध संस्थांना अन्नदानासाठी पैसे देत असतात. देशात अनेक मंदिरांमध्ये विनामूल्य भोजन उपलब्ध केले जाते. काही ठिकाणी अल्प पैशात अन्न मिळते.

महाराष्ट्रातील शिर्डी येथील भव्य प्रसादालयामध्ये अनेक वर्षांपासून अल्प पैशात भोजन मिळत होते आणि आता ते विनामूल्य करण्यात आले आहे; कारण काही देणगीदार त्यासाठी पैसे देत आहेत. अहिल्यानगरमधील माजी खासदार आणि भाजपचे नेते सुजय विखे पाटील यांनी याला आक्षेप घेत पूर्वीप्रमाणे पैसे घेऊन भोजन देण्याची सूचना केली आहे. ही सूचना करतांना त्यांनी अन्नदानाचा लाभ घेणार्‍यांना ‘भिकारी’ या आक्षेपार्ह शब्दाचा वापर केल्याने वाद चालू झाला आहे. मुळात ‘मंदिरांच्या ठिकाणी होणार्‍या अन्नदानाला भीक म्हणू नये, तर ‘तो देवाचा प्रसाद आहे’, असा भाव असणे आवश्यक आहे. ही पूर्वीपासून चालू असलेली हिंदु धर्माची परंपरा आहे. सध्याच्या काळात पूर्णपणे विनामूल्य करणे आर्थिकदृष्ट्या शक्य नसल्याने अल्प पैशांत मंदिरांच्या ठिकाणी भोजन मिळते, प्रसाद मिळतो. जर या अन्नदानाला भीक म्हणून पाहिले, तर ‘राजकारण्यांकडून सध्या महिलांना प्रतिमाह देण्यात येणारी रक्कम एकाअर्थी भीक आहे’, असे कुणी म्हटले, तर चूक ठरू नये. राजकीय स्वार्थासाठी सरकारच्या तिजोरीवर आणि तेही राज्यांवर मोठे कर्ज असतांना भार टाकून अशा प्रकारचे पैसे वाटले जाणे, हे चूक असतांना त्याकडे दुर्लक्ष करून अन्नदानावर प्रश्न उपस्थित करणे, हे अत्यंत अयोग्य आहे. एखादी गोष्ट विनामूल्य देणे आणि भीक देणे यांत भेद आहे. सरकारने जनतेला विनामूल्य देण्याची सवय लावणे, म्हणजे त्यांना परावलंबी करण्यासारखे असते. काही प्रमाणात जनतेला साहाय्य करणे, हे शासनकर्त्यांचे दायित्व असते, ते त्यांनी पार पाडायला हवे; मात्र सरसकट पैसे देणे, ही चूक ठरते. याविषयी ते मौन बाळगतात आणि मंदिरांकडून होणार्‍या अन्नदानावर प्रश्न उपस्थित करतात. असे प्रश्न उपस्थित करणार्‍यांना सर्वच स्तरावरून होत असलेला विरोध चांगले लक्षण आहे. मंदिरांकडून आता अन्नदानासमवेत धर्मज्ञानाचे दान करणे आवश्यक ठरले आहे. तसे जर चालू झाले, तर पुढच्या पिढीमध्ये धर्माविषयीचे अशा प्रकारे अज्ञानामुळे केले जाणारे विधान टाळले जाईल आणि अन्नासह ज्ञानामुळेही समाज सशक्त होईल.