पाकच्या चर्चेच्या प्रस्तावावर भारताचे उत्तर
नवी देहली – पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनी भारताशी पुन्हा चर्चा चालू करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ते म्हणाले, ‘संवाद (टँगो) करण्यासाठी दोघांची आवश्यकता असते.’ भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले की, पाकिस्तानच्या संदर्भात ‘टी’चा अर्थ ‘टँगो’ नसून ‘टेररिझम्’ (आतंकवाद) आहे.
चीन बनवत असलेल्या नव्या तालुक्यांमध्ये लडाखचा भाग
रणधीर जैस्वाल यांनी चीनच्या संदर्भात सांगितले की, चीन त्याच्या होटन प्रांतात दोन नवीन तालुके (काऊंटी) निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. या तालुक्यांचा काही भाग लडाखमध्ये येतो. लडाखवर चीनचे बेकायदेशीर नियंत्रण भारताने कधीच मान्य केलेले नाही. चीनने नवीन तालुके घोषित केल्याने भारताच्या सार्वभौमत्वावर कोणताही परिणाम होणार नाही. आम्ही याविषयी तक्रार केली आहे.
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणावर भारताचा आक्षेप !
चीन बांधत असलेल्या सर्वांत मोठ्या धरणावर जैस्वाल म्हणाले की, चीन तिबेटमधील यार्लुप त्यांगपो (ब्रह्मपुत्रा) नदीवर वीज निर्मितीशी संबंधित प्रकल्पावर काम करत आहे. या नदीचे पाणी भारताला मिळते आणि आम्ही ते वापरतो. त्यामुळे आम्ही सतत राजनैतिक माध्यमातून चीनसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे.
जैस्वाल यांनी या वेळी ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने प्रसिद्ध केलेले, ‘भारतीय गुप्तचर यंत्रणा ‘रॉ’ मालदीवमधील मुईज्जू यांना सत्तेवरून हटवू इच्छित नव्हती’, हे मूळ वृत्तच फेटाळून लावले.