संपादकीय : ‘सुधारणा वर्षा’तील नवी आव्‍हाने ! 

भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

भारताच्‍या संरक्षण मंत्रालयाने वर्ष २०२५ हे ‘सुधारणा वर्ष’ म्‍हणून घोषित केले आहे, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी १ जानेवारी २०२५ या दिवशी केले. ‘एकविसाव्‍या शतकातील आव्‍हानांमध्‍ये देशाची सुरक्षा आणि सार्वभौमत्‍व सुनिश्‍चित करण्‍याची सिद्धता केली जाईल’, असे ते म्‍हणाले. या माध्‍यमातून संरक्षणक्षेत्रातील सुधारणांना चालना मिळणार आहे. मोठमोठ्या आव्‍हानांना सामोरे जाण्‍यासाठी बळ मिळेल आणि भारताचे संरक्षणक्षेत्र टप्‍प्‍याटप्‍प्‍याने अधिकाधिक सक्षम म्‍हणून गणले जाईल. या दिशेने संरक्षणाच्‍या अंतर्गत प्रयत्न करण्‍यात येणार आहेत. ‘वर्ष २०४७ पर्यंत भारत विकसित राष्‍ट्र म्‍हणून गणले जावे’, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ध्‍येय आहे. या ध्‍येयांतर्गत ‘सुधारणेचे वर्ष’ म्‍हणून भारताची होणारी वाटचाल निश्‍चितच आशादायी आहे. संरक्षणमंत्र्यांचे आव्‍हान स्‍वीकारण्‍यासाठी संरक्षणदलही सिद्ध आहे. हे सर्व चित्र पहाता येत्‍या वर्षभरात संरक्षणाचे वेगवेगळे मापदंड अनुभवता येऊन भारत एका वेगळ्‍याच उंचीवर पोचेल, हे निश्‍चित !

काही वर्षांपूर्वी ‘एक्‍झिम बँके’च्‍या अहवालात ‘भारत आफ्रिकेतील देशांची शस्‍त्रांची आवश्‍यकता पूर्ण करू शकतो’, असे सांगण्‍यात आले होते. सुधारणेच्‍या वर्षामुळे हे समीकरण भविष्‍यात आणखी व्‍यापक होईल. केवळ आफ्रिकेतील देशांपुरता मर्यादित असणारा भारत शस्‍त्रे पुरवण्‍यासाठी त्‍याच्‍या आंतरराष्‍ट्रीय कक्षा रूंदावूही शकतो. अशा प्रकारे आधुनिकीकरणाच्‍या या वाटचालीसाठी भारतियांच्‍या शुभेच्‍छा देशाच्‍या पाठीशी आहेतच, यात शंका नाही. सुधारणेच्‍या अंतर्गत प्रयत्न चालू असतांनाच भारतीय नौदलाच्‍या ताफ्‍यात १५ जानेवारी या दिवशी ‘निलगिरी’, ‘सुरत’ आणि ‘वागशीर’ या तीन युद्धनौकांचा सहभाग असणार आहे. ही भारतासाठी अभिमानास्‍पद घटना आहे !

सुधारणा वर्षाच्‍या अंतर्गत संयुक्‍तता आणि एकात्‍मतेच्‍या उपक्रमांना चालना देणे, ‘एकात्‍मिक थिएटर कमांड्‌स’ची स्‍थापना करणे, उदयोन्‍मुख तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करणे, रणनीती, तंत्रे आणि कार्यपद्धती विकसित करणे, तंत्रज्ञान हस्‍तांतर करणे, अकार्यक्षमता दूर करून पायाभूत सुविधा इष्‍टतम करणे, भारतीय संस्‍कृती आणि कल्‍पना यांच्‍याविषयी अभिमानाची भावना बाळगणे या दृष्‍टीने प्रयत्न केले जाणार आहेत. मागील वर्षीच्‍या अर्थसंकल्‍पात संरक्षणक्षेत्रासाठी केलेले प्रावधान पहाता भारत शस्‍त्रे किंवा संरक्षणविषयक उपकरणे या दृष्‍टीने सक्षम, सशक्‍त आणि स्‍वयंपूर्ण होत आहे, हे लक्षात येते. भारताने आता ५ अब्‍ज डॉलर्स निर्यातीचे ध्‍येय ठेवले आहे. भारताच्‍या संरक्षणक्षेत्रासाठी नवनवीन दालने उघडली जात आहेत. सर्वच सैन्‍यदलांमध्‍ये संघटितपणा किंवा एकी जेवढी असेल, तेवढी ही संरक्षणाची फळी बळकट होईल. भारताची बाजारपेठ सध्‍या उदयोन्‍मुख आहे. त्‍यात बर्‍याचशा गोष्‍टींच्‍या शोधांची दिवसेंदिवस भर पडत आहे. भारताने विविध क्षेपणास्‍त्रांची केलेली चाचणी, त्‍यांमध्‍ये करण्‍यात येणारी अतीप्रगत सुधारणा पहाता भारत क्षेपणास्‍त्रनिर्मितीत लवकरच पारंगत होईल. भविष्‍यात ‘मॅन पॅक्‍ट हाय फ्रिक्‍वेंन्‍सी सॉफ्‍टवेअर डिझाईन’, ‘रेडिओ सिस्‍टीम’, ड्रोनला तोडणारी यंत्रणा, तोफखान्‍यातील बाँबना मार्गदर्शन करून त्‍यांना अधिक अचूक करणे अशा स्‍वरूपाच्‍या प्रणालीही आपल्‍याला पहायला मिळणार आहेत.

दुर्लक्षित; पण महत्त्वपूर्ण सूत्रे !

संरक्षणक्षेत्रात भारत भरारी घेत असला, तरी काही सूत्रे दुर्लक्षित झालेली किंवा केलेली असतात; पण त्‍यावरही या सुधारणा वर्षात दृष्‍टीक्षेप टाकणे आवश्‍यक आहे. भारतीय सैनिकांवर होणारी आक्रमणे, वर्षानुवर्षे चिघळलेला काश्‍मीरप्रश्‍न, भारतात राहूनही शत्रूराष्‍ट्रांविषयीच्‍या प्रेमाचा पुळका आलेले घरभेदी, आतंकवादाची टांगती तलवार, सैन्‍यदलाची सुरक्षा, भारताची आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर जाणूनबुजून अपकीर्ती करणारे गट, सैन्‍यदलातील अधिकार्‍यांची उघडकीस येणारी ‘हनी ट्रॅप’ची प्रकरणे या संकटांच्‍या दृष्‍टीनेही कृती होणे महत्त्वाचे आहे.

त्‍यांना खंबीरपणे तोंड द्यायला हवे. मागील वर्षी संरक्षणदलाच्‍या विमानाच्‍या खरेदीत भ्रष्‍टाचार झाला होता. या प्रकरणी संबंधितांच्‍या विरोधात गुन्‍हा नोंदवण्‍यात आला होता. संरक्षणासारख्‍या अतीसंवेदनशील आणि तितक्‍याच महत्त्वपूर्ण क्षेत्रात भ्रष्‍टाचार होतो, हे देशासाठी निंदनीय आहे. वायूदलाप्रमाणे अन्‍य दलांमध्‍ये हा भ्रष्‍टाचार होतो का, याची पडताळणी करायला हवी अन् तो रोखण्‍यासाठी भारताने प्रयत्न करावेत. भारताच्‍या यशस्‍वी पडणार्‍या पावलांना अशा कुकृत्‍यांमुळे गालबोट लागू नये, याची दक्षता घ्‍यायला हवी. विविध समाजविघातक घटकांमुळे देशांतर्गत निर्माण झालेल्‍या अस्‍थैर्याचा परिणाम अप्रत्‍यक्षपणे संरक्षण क्षेत्रावर होतोच. तिन्‍ही दलांमध्‍ये असणारा समन्‍वयाचा अभाव सुधारण्‍यासाठीही उपाययोजना काढली जावी.

महत्त्वाकांक्षी धोरणांचा परिणाम !

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘देशाच्या सीमा आखून घ्या. त्यांना तारांचे कुंपण घाला आणि संरक्षणक्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करा’, असा मोलाचा संदेश दिला होता; कारण त्‍यांनी दूरदृष्‍टीमुळे भारताचे भविष्‍य जाणले होते; पण तत्‍कालीन काँग्रेस सरकारने त्‍याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. त्‍यामुळे कुंपणाअभावी शत्रूंचा देशात शिरकाव झाला. अशा प्रकारे संरक्षणक्षेत्राचे वाटोळे करणार्‍या काँग्रेसला जनतेने वेळोवेळी निवडणुकीत धडा शिकवला आहे आणि अजूनही ती काँग्रेसला धडा शिकवतच आहे. आता नव्‍या शासनाच्‍या काळात त्‍या कृत्‍यांची पुनरावृत्ती होणार नाही; कारण आता विविध राष्‍ट्रांच्‍या भेटीगाठींतून राष्‍ट्रीय-आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर सौहार्द निर्माण होत आहे. यातूनच सेनादलातील सूसूत्रता आणि आत्‍मविश्‍वास वाढत आहे. प्रतिवर्षी राबवण्‍यात येणार्‍या महत्त्वाकांक्षी धोरणांमुळे भारत बलाढ्य किंवा महाशक्‍ती झालेल्‍या देशांच्‍याही वरचढ ठरेल, यांत शंका नाही. त्‍यांना भारताच्‍या सैनिकी शक्‍तीचा अंदाजच लावता येणार नाही. हाच भारत भविष्‍यात ‘प्रखर योद्धा’ होईल. सध्‍या अमेरिका तंत्रज्ञानाची महाशक्‍ती आहे. भारतानेही संरक्षणक्षेत्र विकसित करण्‍यासाठी ध्‍येय-धोरणांचा अवलंब करून स्‍वावलंबनाच्‍या दिशेने प्रयत्न केल्‍यास या महाशक्‍तीचा मुकुट भारताला परिधान करण्‍याची संधी मिळेल. सध्‍याची आंतरराष्‍ट्रीय उलथापालथ पहाता ‘तिसरे महायुद्ध’ कधीही भडकेल. या पार्श्‍वभूमीवर भारताने स्‍वयंपूर्ण व्‍हावे आणि जगाचे नेतृत्‍व करावे, असे भारतियांना वाटते.

सुधारणा वर्ष आणि तिसरे महायुद्ध या दोन्‍ही पार्श्‍वभूमीवर भारताने स्‍वयंपूर्ण होऊन जगाचे नेतृत्‍व करावे !