Bodhgaya Burdwan Bomb Blast Case : वर्धमान आणि बोधगया बाँबस्फोट प्रकरणी बांगलादेशी आतंकवाद्याला ७ वर्षांची शिक्षा !

बेंगळुरू (कर्नाटक) – बोधगया आणि वर्धमान बाँबस्फोट प्रकरणी बांगलादेशी आतंकवादी जाहिदुल इस्लाम उपाख्य कौसर याला कर्नाटक न्यायालयाने दोषी ठरवले अन् ७ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच दरोडा, कट रचणे आणि दारूगोळा खरेदीशी संबंधित प्रकरणांमध्ये ५७ सहस्र रुपयांचा दंडही ठोठावला आहे. बांगलादेशात बाँबस्फोट घडवून आणल्यानंतर कौसर याने भारतात घुसखोरी केली होती.

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा न्यायालयाने वर्ष २०१४ मधील बंगालच्या वर्धमान बाँबस्फोट आणि वर्ष २०१८ मधील बिहारच्या बोधगया बाँबस्फोट प्रकरणी ‘जमात-उल-मुजाहिदीन बांगलादेश-भारत’च्या कारवायांना प्रोत्साहन दिल्याविषयी कौसर याला ही शिक्षा सुनावली. कौसर भारतात ‘जमात-उल-मुजाहिदीन बांगलादेश-भारत’चे नेतृत्व करत होता.

१. या प्रकरणांमध्ये एकूण ११ आरोपींना दोषी ठरवण्यात आले आहे. ऑक्टोबर २०१४ च्या वर्धमान बाँबस्फोटानंतर जाहिदुल इस्लाम आणि त्याचे सहकारी बेंगळुरूला पळून गेले होते. त्यानंतर जानेवारी २०१८ मध्ये बोधगया येथे त्यांना अटक करण्यात आली होती.

२. वर्ष २०१८ मध्ये निधी गोळा करण्याच्या कटाचा एक भाग म्हणून त्यांनी बेंगळुरूमध्ये ४ दरोडे घातले होते आणि लुटलेल्या पैशाचा वापर दारूगोळा खरेदी करण्यासाठी अन् आतंकवादी कारवाया घडवून आणण्यासाठी केला होता.

संपादकीय भूमिका

आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी होण्यासाठीच बांगलादेशी घुसखोर भारतात येतात, हे या उदाहरणातून पुन्हा एकदा लक्षात येते. त्यामुळे प्रत्येक बांगलादेशी घुसखोरावर कारवाई होण्यासाठी जनतेने सरकारवर दबाव आणला पाहिजे.