PHD In Hindu Studies From DU : देहली विद्यापिठात ‘हिंदू स्टडीज’मध्ये पीएच्.डी. करण्याची सुविधा

पहिल्या टप्प्यात १० जागा उपलब्ध करणार

नवी देहली – देहली विद्यापीठ २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून ‘हिंदू स्टडीज’ या विषयामध्ये पीएच्.डी. करण्याची सुविधा उपलब्ध करणार असून त्याची सिद्धता चालू झाली आहे. याच्या पहिल्या टप्प्यात १० जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. स्थायी समितीच्या प्रस्तावाच्या आधारे ही सिद्धता करण्यात येत आहे. विद्यापिठातीलच ‘सेंटर फॉर हिंदू स्टडीज’च्या (हिंदु शास्त्रांच्या अभ्यासाचा विभाग) नियामक मंडळाने ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शिफारस केली होती.

१. ‘हिंदू स्टडीज’च्या संयुक्त संचालिका प्रेरणा मल्होत्रा यांनी सांगितले की, याचा उद्देश विद्यार्थ्यांना नवीन संधी शोधणे, हा आहे. याच्याशी संबंधित प्रश्‍न आणि त्यांना ‘हिंदू स्टडीज’मध्ये कोणत्या संशोधन संधी मिळू शकतात, यासाठी विद्यार्थी आमच्याशी सतत संपर्क साधतात.

२. हा प्रस्ताव मान्य झाल्यास विद्यार्थी हिंदु धर्मशास्त्र आणि वेद याांरख्या हिंदु अभ्यासांवर संशोधन करू शकतील. या कार्यक्रमासाठी पात्रता देहली विद्यापिठाच्या नियमांनुसार असेल. अर्जदारांनी ‘जे.आर्.एफ./ नीट’ किंवा विद्यापिठाच्या पीएच्.डी. परीक्षेत किमान ५५ टक्के गुणांसह हिंदू अभ्यास किंवा संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.