Under Water Drone In Mahakumbh : भाविकांच्या सुरक्षेसाठी ‘अंडर वॉटर ड्रोन’ यंत्रणा सज्ज !

  • प्रयागराज महाकुंभपर्व २०२५

  • प्रथमच वापर !

(‘अंडर वॉटर ड्रोन’ यंत्रणा म्हणजे पाण्याखाली चालणार्‍या कारवायांवर लक्ष ठेवणारी आधुनिक यंत्रणा)

प्रयागराज – पाण्याखाली चालणार्‍या कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रयागराज येथील महाकुंभपर्वात यंदा प्रथमच ‘अंडर वॉटर ड्रोन’ यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशानुसार पोलीस महानिरीक्षक डॉ. राजीव नारायण मिश्र यांनी ही यंत्रणा तैनात केली. अत्यंत वेगवान असणार्‍या या यंत्रणेची पाण्याखाली १०० मीटर अंतरापर्यंत कारवायांचा वेध घेऊन त्याची अचूक माहिती पोलिसांपर्यंत पोचवण्याची क्षमता आहे.  यंत्रणा पाण्याखाली २४ घंटे कार्यरत असणार आहे.

एकेका भाविकाच्या सुरक्षेसाठी विशेष यंत्रणा कार्यान्वित !

एकेका भाविकाच्या सुरक्षेच्या दृष्टीने रणनीती आखण्यात आली आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी पीएसी, एन्.डी.आर्.एफ्., एस्.आर्.एफ्. यांसारख्या यंत्रणाही तैनात करण्यात आल्या आहेत. या यंत्रणांची पथके ७०० झेंडे असलेल्या नावांमध्ये २४ घंटे तैनात असतील. इतकेच नव्हे, तर नदीकाठी ‘रिमोट लाईफ बॉय’ नावाचे पथकही सिद्ध करण्यात आले आहे. हे पथक अत्यंत गतीने पाण्यात कुठेही पोचून संकटातील भाविकांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्यास सक्षम आहे.

तीन स्तरीय तपासणीनंतर भाविकांना मिळणार महाकुभंक्षेत्रात प्रवेश !

नववर्षानिमित्त प्रयागराज येथील प्रसिद्ध मंदिरे आणि प्रमुख ठिकाणे येथे होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी सुरक्षेत वाढ केली आहे. जिल्ह्यात येणार्‍या प्रत्येक भाविकाची तपासणी करण्यात येणार आहे. तीन स्तरीय तपासणीनंतर भाविकांना महाकुंभक्षेत्रात प्रवेश देण्यात येणार आहे. यासाठी ठिकठिकाणी तपासणी नाके असणार आहेत. यासह भाविकांच्या सुरक्षेसाठी ए.आय. कॅमेरे, ड्रोन आणि अँटी ड्रोन अशा आधुनिक यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. सुरक्षेसाठी गुप्तचर यंत्रणा प्रयागराजसह आजूबाजूच्या संपूर्ण परिसरात सक्रीय झाली आहे, अशी माहिती महाकुंभगरीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक राजेश द्वीवेदी यांनी दिली.