|
महाराष्ट्र राज्य
मंदिर संस्कृती रक्षणासाठी पहिले ‘ऑनलाईन’ मंदिर अधिवेशन
१. मंदिर विश्वस्त आणि पुजारी यांना कृतीशील ठेवण्यासाठी ‘ऑनलाईन मंदिर अधिवेशन’ घेण्याचे ठरवणे : ‘वर्ष २०२० या दळणवळण बंदीच्या काळात आणि त्यापूर्वी बर्याच ठिकाणी मंदिरांवर आघात होत होते. या काळात कोरोना महामारीच्या काळामुळेही काही निर्णय मंदिर संस्कृतीच्या विरोधातही होत होते. या संदर्भात जागृती करणे, सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्याशी जोडलेले मंदिरांचे विश्वस्त, पुजारी यांना कृतीशील आणि संघटित ठेवणे, आपापसांत समन्वय ठेवणे आवश्यक होते. यासाठी एक ‘ऑनलाईन मंदिर अधिवेशन’ घेण्याचे ठरले आणि त्यानुसार नियोजन झाले.
२. ‘ऑनलाईन’ अधिवेशनात मंदिर संस्कृती रक्षणाच्या कार्यात सहभागी होण्याचा संकल्प करणे : नियोजनानुसार वर्ष २०२० मध्ये पहिले ‘ऑनलाईन’ मंदिर अधिवेशन पार पडले. ५ घंटे चाललेल्या या अधिवेशनात ‘मंदिर संस्कृती रक्षणा’च्या विविध विषयांवर अनेक हिंदुत्वनिष्ठ मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या अधिवेशनाला जम्मूपासून रामेश्वरम् (तमिळनाडू) आणि कामाख्या मंदिरापासून (आसाम) सोमनाथ मंदिरापर्यंत (गुजरात) १२०० हून अधिक मंदिरांचे विश्वस्त, पुजारी आणि पुरोहित जोडले होते. या वेळी उपस्थितांनी ‘यापुढेही आम्ही या कार्यात सक्रीय सहभागी होणार’, असा संकल्प केला. आज ही सर्व मंडळी या कार्याशी जोडून कृतीशील असून मंदिर संघटनाचे कार्य उत्तरोत्तर वाढत आहे.
३. मंदिर रक्षणाचे स्थापित झालेले बीजारोपण संपूर्ण भारतभर विस्तारणे, ही दैवी अनुभूतीच ! : आपत्कालीन स्थितीतही ‘ऑनलाईन’ अधिवेशन होणे आणि सर्वांना मंदिर संस्कृतीशी संबंधित कार्याशी जोडून ठेवणे, म्हणजे भगवंताच्या कृपेचा वर्षावच आम्ही क्षणोक्षणी अनुभवत होतो. या काळात मंदिर रक्षणाचे स्थापित झालेले बीजारोपण ‘आज संपूर्ण भारतभर विस्तारित होऊन त्याचे आता विशाल वटवृक्षात रूपांतर होत आहे’, याची दैवी अनुभूतीच येत आहे.
महाराष्ट्र राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांची भेट घेणे
जळगाव येथील मंदिर परिषदेनंतर महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिल्यांदा भेट घेण्यात आली. या वेळी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघाला ‘मंदिरांची समस्या सोडवणारे अधिकृत संघटन’ म्हणून घोषित करावे आणि आमच्याशी समन्वय करावा’, अशी मागणी करण्यात आली. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मंदिरांच्या संदर्भात येणार्या अडचणी आणि समस्या यांसाठी संपर्कात रहाण्याचे आश्वासन दिले. नागपूर अधिवेशनाच्या वेळी दुसर्यांदा मंदिर महासंघाच्या समन्वय समितीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या समवेत बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या पदाधिकार्यांना माननीय मंत्री तथा भाजपचे नेते गिरीश महाजन अन् शिवसेनेचे नेते माननीय आमदार भरतशेठ गोगावले यांना मंदिर महासंघाला जोडून देण्यात आले, तसेच त्यांच्याशी समन्वय ठेवण्याचे आश्वासन देण्यात आले.
जळगावमध्ये परिषदेचे आयोजन आणि मंदिर महासंघाची स्थापना
१. महाराष्ट्रातील मंदिरांच्या सरकारीकरणाला विरोध म्हणून मंदिर चळवळीचा आरंभ होणे : वर्ष २००८ पासून मंदिरांच्या रक्षणार्थ महाराष्ट्रात आणि अन्य काही राज्यांमध्ये मंदिर रक्षणार्थ चळवळ चालू आहे. वर्ष २००८ मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकार महाराष्ट्रातील साडेचार लाख मंदिरे कह्यात घेऊन त्याचे सरकारीकरण करण्यात येणार होते. त्याला विरोध करण्यापासून खर्या अर्थाने या चळवळीचा आरंभ झाला. सर्व मंदिरांचे विश्वस्त, पुजारी, हिंदुत्वनिष्ठ संघटना, संत, महंत यांनी केलेल्या विरोधामुळे सरकार करणार असलेला कायदा बारगळला.
२. विविध उद्देशाने पुन्हा नव्या जोमाने मंदिरांशी संबंधित चळवळ चालू होणे : त्यानंतर मध्ये मध्ये हे कार्य चालूच होते. पुढे ४ आणि ५ फेब्रुवारी २०२२ या दिवशी जळगावमध्ये ‘मंदिर संस्कृती रक्षक अभियानां’तर्गत महाराष्ट्र राज्यस्तरीय मंदिर परिषदेचे आयोजन करण्यात आले. ‘मंदिरांचे विश्वस्त, पुरोहित आणि पुजारी यांचे संघटन व्हावे, तसेच मंदिरांचा आपापसांत समन्वय, त्यांचे संघटन, त्यांची संपर्क यंत्रणा वाढावी, मंदिरांची सुरक्षा आणि मंदिरे सनातन धर्मप्रचाराची केंद्रे व्हावीत अन् त्यासह मंदिरे ही सरकारीकरणापासून मुक्त व्हावीत’, या उद्देशाने ही चळवळ पुन्हा नव्या जोमाने चालू झाली.
३. मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करून भक्तांच्या कह्यात देण्यासाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’ हे व्यासपीठ सिद्ध होणे : जळगाव येथे झालेल्या पहिल्या राज्यस्तरीय मंदिर परिषदेमध्ये ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची स्थापना झाली. या मंदिर परिषदेला महाराष्ट्र राज्यातून ४०० हून अधिक मंदिरांचे विश्वस्त हे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्यावर विश्वास ठेवून उपस्थित राहिले होते. या मंदिर परिषदेमध्ये एक राज्यस्तरीय ‘कोअर ग्रुप’ची (समन्वय समितीची) स्थापना करण्यात आली. यासह ‘मंदिरांवर होणार्या आघातांच्या विरोधात तात्काळ आंदोलन करणे, त्याला विरोध करणे, मंदिरांच्या समस्या सोडवणे, मंदिरांच्या संस्थापनेसाठी प्रयत्न करणे, पुरातन ऐतिहासिक पौराणिक मंदिरांसाठी प्रयत्न करणे आणि मंदिरांची एक संघटित चळवळ उभारणे अन् हिंदूंच्या ज्या मंदिरांचे सरकारीकरण झालेले आहे, ती सरकारीकरणातून मुक्त करून भक्तांच्या कह्यात देणे यांसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’ हे व्यासपीठ सिद्ध झाले. ‘मंदिर विश्वस्त, पुजारी यांच्या समस्या सुटण्यासाठी एक माध्यम होणे’, असेही या व्यासपिठाचे कार्य होते.
४. भीमाशंकर (जिल्हा पुणे), मुंबई आणि गोवा येथे मंदिर परिषदेच्या बैठका होऊन संघटित चळवळ उभारली जाणे : यानंतर श्री ज्योतिर्लिंग, भीमाशंकर, जिल्हा पुणे; राष्ट्रीय स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, मुंबई आणि गोवा येथे आयोजित केलेल्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या वेळी ‘मंदिर संस्कृती रक्षणा’साठी एकूण ३ वेळा बैठका पार पडल्या. या बैठकांच्या माध्यमातून मंदिरांवर होणार्या आघातांच्या संदर्भात आंदोलन करण्यासह संघटित चळवळ उभारण्याचे ठरवण्यात आले.
ओझर (जिल्हा पुणे) येथे ‘द्वितीय मंदिर परिषदे’चे आयोजन
वर्षभरातच संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मंदिर महासंघाचे कार्य वाढले. त्यानंतर दुसर्या राज्यस्तरीय मंदिर परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेला महाराष्ट्रातून ७०० हून अधिक मंदिरांचे विश्वस्त आणि पुजारी उपस्थित होते. या मंदिर परिषदेमध्ये महाराष्ट्र मंदिर महासंघाचे कार्य राज्यस्तरापासून गाव पातळीपर्यंत पोचवण्याचा निश्चय करण्यात आला. प्रत्येक जिल्हास्तरावर जिल्हा समन्वयकांची नियुक्ती करून कार्यविस्तार करण्याचे ठरवण्यात आले. यासमवेत ‘मंदिरात वस्त्रसंहिता पालन करण्यापासून मंदिर परिसरामध्ये मद्यमांस बंदीपर्यंत विविध अभियानांचा प्रारंभ करण्यात आला. (वस्त्रसंहिता म्हणजे मंदिरात प्रवेश करतांना परिधान करायच्या कपड्यांच्या संदर्भातील नियमावली)
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत करण्यात आलेल्या मंदिर परिषदांचे आयोजन
१. अमरावती
अ. पहिल्या जिल्हास्तरीय मंदिर परिषदेच्या माध्यमातून अनेक मंदिर विश्वस्त कृतीशील होणे : अमरावतीमध्ये जिल्हास्तरीय मंदिर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचे आयोजन मंदिर महासंघाच्या माध्यमातून जोडलेल्या मंदिरांच्या माध्यमातूनच करण्यात आले. मंदिर विश्वस्त, पुरोहित आणि पुजारी यांनी स्वतःहून दायित्व घेऊन आयोजनापासून निवासापर्यंत सर्व प्रकारे नियोजन केलेली ही पहिली जिल्हास्तरीय मंदिर परिषद होती. या मंदिर परिषदेला ६५० हून अधिक मंदिरांचे विश्वस्त आणि पुजारी उपस्थित होते. या परिषदेच्या आयोजनाच्या पूर्वीचे वैशिष्ट्य, म्हणजे जिल्ह्यातील १३ तालुकास्तरीय मंदिरांच्या बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रत्येक बैठकीला सरासरी १०० हून अधिक मंदिरांचे विश्वस्त, पुरोहित आणि पुजारी उपस्थित होते. यामुळे अनेक मंदिरांचे विश्वस्त कृतीशील झाले आणि त्यांनी दायित्व घेऊन सेवा करण्यासाठी प्रारंभ केला आहे.
२. नागपूर
अ. जिल्हास्तरीय मंदिर परिषदेत स्त्रियांनीही सहभाग घेणे : नागपूर जिल्ह्यात आयोजित केलेल्या मंदिर परिषदेला स्त्रियांचा सहभाग लक्षणीय होता. मंदिर महासंघाच्या माध्यमातून कृतीशील झालेल्या विश्वस्तांनी पुढाकार घेऊन या परिषदेचे आयोजन केले. या मंदिर परिषदेला ३५० हून अधिक मंदिरांचे विश्वस्त आणि पुजारी उपस्थित होते. मंदिर महासंघाची नागपूर जिल्हास्तरावर स्थापना होऊन परिषदेला उपस्थित असलेले मंदिर विश्वस्त आणि पुजारी कृतीशील झाले अन् त्यांनी मंदिरांच्या अनुषंगाने विविधांगी कार्य करण्यास प्रयत्न आरंभले.
३. सिंधुदुर्ग
अ. ‘मंदिरांच्या समस्या सोडवण्यासाठी विश्वस्तांचे संघटन’, या विचाराने सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंदिर परिषद पार पडणे : सिंधुदुर्गमध्ये जिल्हास्तरीय पार पडलेल्या मंदिर परिषदेला ४०० हून अधिक मंदिरांचे विश्वस्त उपस्थित होते. हे कोकणसारख्या ठिकाणी महत्त्वाचे होते. ‘कोकणातील मंदिरांच्या समस्या या राज्यातील इतर मंदिरांच्या समस्यांपेक्षा वेगळ्या आहेत आणि ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’ यासाठी व्यासपीठ आहे. त्यांच्या समस्या सोडवता येतील आणि मंदिर विश्वस्तांचे संघटन होईल’, या भावनेने सर्व मंदिर विश्वस्त एकत्र आले अन् सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पहिली मंदिर परिषद झाली.
४. रत्नागिरी
अ. मंदिर परिषदेच्या जिल्हास्तरीय बैठकीला ४०० हून अधिक मंदिरांचे विश्वस्त सहभागी होणे : रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या मंदिर परिषदेला ४०० हून अधिक मंदिरांचे विश्वस्त उपस्थित होते. या परिषदेच्या आयोजनामध्येही मंदिर विश्वस्तांचा सक्रीय सहभाग होता. या परिषदेचे वैशिष्ट्य म्हणजे कृतीशील मंदिर विश्वस्तांची नियमित बैठक चालू झाली. मंदिरांवर होणार्या आघातांच्या विरोधात सर्वांनी संघटितपणे अन् सातत्याने प्रयत्न चालू केले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ५१ हून अधिक मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू झाली आणि त्याला माध्यमांनी चांगली प्रसिद्धी दिली. (२५.८.२०२४)
महाराष्ट्रात पार पडलेली मंदिर अधिवेशने (वर्ष २०२३-२०२४)
महाराष्ट्रात एकूण २ राज्यस्तरीय (जळगाव आणि ओझर (पुणे)) आणि ४ जिल्हास्तरीय (अमरावती, नागपूर, सिंधुदुर्ग अन् रत्नागिरी), अशा एकूण ६ मंदिर परिषदांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये २ सहस्र ९०० जणांनी सहभाग घेतला.
‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’, म्हणजे एक आशेचा किरण !
जळगावच्या मंदिर परिषदेनंतर अमरावती, नागपूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथे जिल्हास्तरीय मंदिर परिषदांचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून ६ सहस्र ५०० हून अधिक मंदिरांचे विश्वस्त आणि पुजारी या माध्यमातून आपल्याशी जोडलेले आहेत. मंदिर संघटनाचे कार्य हे आता व्यापक स्तरावर वाढत असून मंदिरावरील होणार्या आघातांच्या, मंदिर रक्षणाच्या दृष्टीकोनातून ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’, हा एक आशेचा किरण आहे.
या संपूर्ण पानावरील लेखाचे लेखक : श्री. सुनील घनवट, राष्ट्रीय संघटक, मंदिर महासंघ