काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेत मनुस्मृति आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर आरोप केल्याचे प्रकरण
‘ द्रोणाचार्यांनी आपल्या शिष्यांचे अंगठे कापले’, अशी बुद्धी असणारे राहुल गांधी संसदेत पुन्हा एकदा सावरकर यांच्यावर घसरले. सावरकर यांच्या पुस्तकातील एखादे वाक्य घ्यायचे आणि आरोप करायचे’, हा सावरकर विरोधकांचा नेहमीचा खेळ आहे. आताही त्यांनी तेच केले आहे.
१. कोट्यवधी हिंदूंचे निबंध हे मनुस्मृतीवरच आधारित !
‘वेदांच्या खालोखाल आपल्या हिंदु राष्ट्राचा अत्यंत पूज्य आणि आपल्या संस्कृतीचा, आचारांचा अन् व्यवहाराचा प्राचीन काळापासून आधारस्तंभ होऊन बसलेला असा जर कोणता ग्रंथ असेल, तर तो ‘मनुस्मृति’ हाच होय. आपल्या राष्ट्राच्या ऐहिक आणि पारलौकिक जीवनयात्रेचे नियमन शतकानुशतके हा ग्रंथच मुख्यतः करत आलेला आहे. आजही कोट्यवधी हिंदु ज्या निर्बंधान्वये (कायद्याने) स्वतःचे जीवन आणि व्यवहार घालवत अन् चालवत आहेत, ते निर्बंध (कायदे) तत्त्वतः तरी मनुस्मृतीवरच आधारलेले आहेत. मनुस्मृति हीच आजही तत्त्वतः ‘हिंदु निर्बंध (हिंदु लॉ)’ आहे.’ सावरकर यांचे ही वाक्ये ‘प्राचीन आणि अर्वाचीन महिला’, या लेखात प्रारंभीला आहे.
२. सावरकर यांनी मनुस्मृतीविषयी लेखात मांडलेले मत
‘मनुस्मृतीला हिंदु लॉ मानण्याचा प्रघात होता’, हेच सावरकर यांनी या वाक्यातून सांगितलेले आहे, ते त्यांचे मत नव्हे. त्या लेखात त्यांनी त्यांची मते वारंवार मांडली, त्यातील काही वाक्ये पुढीलप्रमाणे अशी…
अ. ‘मनुस्मृतीस धर्मशास्त्र म्हणून न मानता तो एक त्या काळचे आमचे समाजचित्र दाखवणारा सामाजिक इतिहासग्रंथ आहे’, याच नात्याने काय तो या लेखात आम्ही त्याचा उपयोग करणार आहोत.’
आ. ‘मनुस्मृतीच्या काळच्या ज्ञानानुरुप, त्यांनी सुचले ते सिद्धांत लिहिले. २ सहस्र वर्षांत मनुष्याचा अनुभव वाढून, प्रयोगांती अधिक तथ्य नियम सापडताच ते स्वीकारून पूर्वीची चुकीची मते सोडून देणे, हेच प्रगतीचे लक्षण. पूर्वजांच्या ज्ञानात भर टाकणे, हाच पूर्वजांनाही इष्ट वाटेल, असा पूर्वजांचा खरा अभिमान होय. या अद्ययावत्पणातच हिंदु राष्ट्राचे खरे कल्याण साधून जगाच्या पुढे दोन पावले जाण्याची धमक त्यात उत्पन्न होऊ शकणारी आहे; पण मनूस त्रिकालाबाधित मानण्याच्या ‘श्रुतिस्मृतिपुराणोक्त’ प्रवृत्तीने २ सहस्र वर्षांपूर्वीच्या विज्ञानाच्या मागासलेल्या स्थितीतून आपले पाऊल पुढे पडण्याची शक्यताच खुंटते.’
इ. ‘राष्ट्राच्या आजच्या परिस्थितीत राष्ट्रधारणास जो श्लोक उपयुक्त वाटेल, तो मनूचा असो, प्रक्षिप्त असो, तो आम्ही आचरू; जेथे तो परवडणार नाही, तेथे राष्ट्रहितसाधक असे अद्ययावत् ज्ञानाच्या कसोटीस उतरणारे नवीन निर्बंध करू.’
ई. कोणताही श्लोक मूळचा म्हणून चांगला, प्रक्षिप्त म्हणून वाईट वा स्मृतीतील म्हणूनच अनुल्लंघ्य असे आम्ही मानत नाही, तर आजच्या राष्ट्रीय परिस्थितीत हितकारक असेल, तर मानतो, नाही तर तसा हितकारक तो नवीन निर्बंध नवीन म्हणून चक्क सांगून स्वीकारतो. विज्ञाननिष्ठ, प्रत्यक्षनिष्ठ, अद्ययावत् प्रवृत्ती हीच. याच प्रवृत्तीने नि याच ऐतिहासिकदृष्टीने मनुस्मृति वाचायला हवी.
३. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे अभ्यासपूर्ण मत
स्वातंत्र्यवीर सावरकर हे बुद्धीवादी आणि विज्ञाननिष्ठ होते. सप्टेंबर १९३४ मध्ये ‘किर्लोस्कर’मधील लेखात सावरकर लिहितात, ‘ही प्राचीन श्रुतिस्मृतिपुराणादि शास्त्रे ऐतिहासिक ग्रंथ म्हणून संग्रहालयात सन्मानपूर्वक ठेवून, आता विज्ञानयुगाचे पान उलटले पाहिजे. या ग्रंथांचा काल काय झाले हे सांगण्यापुरता अधिकार; आज काय योग्य ते सांगण्याचा अधिकार प्रत्यक्षनिष्ठ – अद्यतन विज्ञानाचा ! या अद्ययावतपणात मागच्या सर्व अनुभवांचे सारसर्वस्व सामावलेले असतेच… श्रुतिस्मृतिपुराणादि हे सारे ग्रंथ आम्ही अत्यंत कृतज्ञ आदराने सन्मानतो; पण ऐतिहासिक ग्रंथ म्हणून. अनुल्लंघ्य धर्मग्रंथ म्हणून नव्हे. त्यांचे सारे अज्ञान आजच्या विज्ञानाच्या कसोटीस आम्ही लावणार आणि नंतर राष्ट्रधारणास, उद्धारणास, जे अवश्य वाटेल ते बेधडक आचरणार ! म्हणजेच आम्ही अद्ययावत् बनणार, अप् टु डेट बनणार..’
हे वाचले, तर कुणीही शहाणा माणूस सावरकर यांच्यावर आरोप करणार नाही. राहुल गांधी यांना कुणीतरी समज दिल्याने ते सावरकरांवर आरोप करत नव्हते; पण आता महाराष्ट्रातील पराभवानंतर काँग्रेसकडे आता मांडण्यासारखा काही मुद्दा नाही, असे झाले की, काँग्रेसी सावरकर यांच्यावर आरोप करू लागतात. चांगले आहे, सावरकर यांच्यावर ते जितके आरोप करत रहातील तितका काँग्रेसचा अंत जवळ येईल, तो ठेका राहुल गांधींनी घेतला आहेच.’ (१४.१२.२०२४)
– सौ. मंजिरी मराठे, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक प्रतिष्ठान, मुंबई.