मुंबई – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी खोटे आरोप करण्यासाठी संसदेचा उपयोग केला आहे. ही विधाने त्यांनी संसदेच्या बाहेर केली, तर आम्ही त्यांच्या विरोधात तक्रार करू. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची अपकीर्ती करण्यासाठी राहुल गांधी यांच्याकडून संसदेचा चुकीचा उपयोग करण्यात आला, असे विधान स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी १५ डिसेंबर या दिवशी पत्रकार परिषदेत केले. या वेळी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकांच्या कोषाध्यक्षा सौ. मंजिरी मराठे उपस्थित होत्या.
या वेळी रणजित सावरकर म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी राहुल गांधी यांनी धादांत खोटी विधाने केली आहेत; मात्र त्यांचे पणजोबा जवाहरलाल नेहरू यांनी अनेकदा राज्यघटनेची पायमल्ली केली आहे. १० मे १९४७ या दिवशी व्हाईसरॉय लॉर्ड माऊंट बॅटन पत्नीसह नेहरू यांना घेऊन शिमला येथे गेले. तेथे माऊंट बॅटन यांनी नेहरू यांना फाळणीची योजना सांगितली. त्या वेळी नेहरू यांनी चिडून माऊंट बॅटन यांचा फाळणीचा प्रस्ताव फाडून फेकला होता; परंतु एका दिवसानंतर फाळणीचा सुधारित प्रस्ताव नेहरू यांनी मान्य केला. फाळणीला संमती देणारे नेहरू हे एकप्रकारे ब्रिटिशांचे दलाल होते, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही.’’