श्री. अनिल धीर हे ‘इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज’ (इन्टॅक) या संस्थेच्या गव्हर्निग कौन्सिलचे प्रमुख सदस्य आहेत. ते मंदिरांचे रक्षण आणि संवर्धन यांसाठी कार्य करतात. दैनिक ‘सनातन प्रभात’चे प्रतिनिधी श्री. विक्रम डोंगरे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. या वेळी श्री. धीर यांनी ‘मंदिराचे रक्षण आणि संवर्धन, तसेच मंदिराचे सरकारीकरण’, यांविषयी मांडलेले विचार वाचकांसाठी देत आहोत.
१. मंदिराच्या रक्षणासाठी कार्य करण्याची प्रेरणा कशी मिळाली ?
मी मूळचा पंजाबचा आहे; पण माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी ओडिशाच राहिली आहे. माझे वास्तव्य भुवनेश्वरमध्ये आहे. भुवनेश्वर हे ‘मंदिरांचे शहर’ म्हणू शकतो. एकेकाळी तेथे सहस्रोंच्या संख्येने मंदिरे होती. जुन्या भुवनेश्वरमध्ये आजही ६०० ते ७०० मंदिरे आहेत. ती सर्व प्रकारच्या शैलीतील असून अतिशय पुरातन आहेत. मी महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना इतिहासाचाही विद्यार्थी राहिलो आहे. त्यामुळे माझी मंदिरांविषयी विशेष रुची आहे. पुरीमध्ये जगन्नाथ मंदिरासमवेतच कोणार्क सूर्य मंदिरही आहे. त्यामुळे त्यांच्या संवर्धनासाठी मी ओडिशामध्ये सतत प्रवास करत असतो.
ओडिशामध्ये हिंदु, जैन, शीख, बौद्ध असे सर्व धर्मीय लोक रहातात. येथे सर्व धर्म, पंथ आणि संप्रदाय यांचे स्थान विविध रूपांमध्ये आढळते. ओडिशामध्ये २२ ते २५ टक्के लोकसंख्या ही वनवासी आहे. तेथे विविध प्रकारचे ६२ आदिवासी समाज आहेत. त्यांच्या स्वतंत्र प्रथा आणि परंपरा आहेत. त्यातील ३२ आदिवासी गट हे आदिम आहेत, ज्यांना आपण पूर्वी आदिमानव म्हणत होतो. सहस्रो वर्षांपासून ते जंगलामध्ये जसे रहात होते, तसेच ते आजही रहात आहेत. सध्या सरकार विविध योजनांच्या माध्यमातून त्यांच्यात परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहे. या ६२ आदिवासी समाजांची जीवन जगण्याची एक स्वतंत्र पद्धत आहे.
आदिवासीही सनातनी आहेत. ते निसर्गाची, म्हणजे नदी, पर्वत, वृक्ष यांची पूजा करतात. त्यांच्या स्वतंत्र कबरी असतात. दगड आणि लाकडाचा खांब यांच्या रूपात ते त्यांच्या देवाला पूजतात. त्यांचे देव विशेष ८-१० वृक्षांमध्ये ठेवलेले असतात. त्यावर त्यांची अतिशय अढळ श्रद्धा असते. ते स्वत:ची ओळख जपतात आणि ती नष्ट होऊ देत नाहीत. मी मोठमोठी मंदिरे आणि आदिवासींचे वृक्षांमध्ये वसलेली लहान लहान मंदिरेही पाहिली. त्यामुळे केवळ मीच नाही, तर याचा कुणी थोडाही अभ्यास केला आणि त्यासंदर्भात सखोल जाणून घेतले, तर रुची जागृत होईल. यात माझीही शालेय दिवसांपासून रुची निर्माण झाली होती. मी या क्षेत्रात नव्हतो, तर ‘कॉर्पोरेट’ (व्यावसायिक) क्षेत्रात होतो. मी ‘कॉर्पोरेट’ क्षेत्रात मोठ्या पदावर असतांना वर्ष २०१४ मध्ये या कार्यासाठी वाहून घेण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून मी पूर्णवेळ ‘इन्टॅक’ या संस्थेशी, तसेच पुरातन मंदिरे, जुने संस्कार, सभ्यता आणि वारसा यांच्याशी संबंधित संस्थांसाठी काम करत आहे. मी संशोधन करतो आणि बराच प्रवास केला आहे. मी ११ ग्रंथ लिहिले आहेत. त्यातील काही ओडिशा सरकारने (राज्य अभिलेखागारने) प्रकाशित केले आहेत. माझी चळवळ अद्यापही चालू आहे. मी कोणता तरी उपक्रम हातात घेतो आणि त्याला पूर्ण करतो.
२. ‘इन्टॅॅक’ या संस्थेचे ध्येय आणि उद्देश
वर्ष १९८४ मध्ये ‘इन्टॅक’ ची स्थापना झाली. माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची वारसा विषयात पुष्कळ रुची होती. त्यांच्यासमवेत पुपुल जयकार काम करत होत्या. त्यांनीही अनेक संशोधन केले आहे. श्रीमती गांधी यांचे निधन झाले, तेव्हा त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘इंडियन नॅशनल ट्रस्ट’ या नावाचा एक न्यास स्थापन करण्यात आला. या न्यासाच्या प्रमुख पुपुल जयकार होत्या. श्रीमती गांधी यांच्या विचारसरणीवर एक संस्था स्थापण्यात यावी, जिच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर संवर्धन आणि जीर्णाेद्धार यांचे काम केले जावे, असे ठरले. त्यानुसार ‘इन्टॅक’ची स्थापना झाली. आज ४० वर्षांपासून ‘इन्टॅक’ कार्यरत आहे. आमचे मुख्य केंद्र देहलीत असून प्रत्येक राज्यात कार्यकारिणी आहे. ३०० स्वतंत्र ‘चॅप्टर्स’ (विभाग) आहेत. प्रत्येक काम स्वयंसेवा म्हणून केले जाते. अलीकडेच केंद्रशासनाने ‘इन्टॅक’ला ‘सेंटर फॉर एक्सलन्स’चा (उत्कृष्ट केंद्र) दर्जा देऊन १०० कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. आम्ही भारत सरकार आणि विविध राज्य सरकारे यांच्यासाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. ६०० हून अधिक पुस्तके लिहिण्यात आली आहेत. आमचे प्रशिक्षण कार्यक्रम असतात. आमचे जीर्णाेद्धार केंद्र असून त्या माध्यमातून जुनी मंदिरे, राजवाडे आणि महाल यांचा जीर्णाेद्धार केला जातो. भारतीय पुरातत्व विभागानंतर वारसाच्या संरक्षणासाठी कुणी काम करत असेल, तर ती ‘इन्टॅक’ आहे.
३. पुरी शहराचे आध्यात्मिक महत्त्व
जगन्नाथ मंदिर एक धाम आहे, तसेच जगन्नाथ पुरी हे शंकराचार्यांचे एक प्रमुख पीठही आहे. त्याला ‘गोवर्धन पीठ’ म्हणतात. सर्व पिठांमध्ये ते महत्त्वाचे समजले जाते. चार वेदांनुसार पिठांची स्थापना झाली. गोवर्धन पीठ हे पुरी मंदिराच्या जवळ समुद्रकिनारी आहे. आज पुरी एक मोठे शहर बनले आहे. पूर्वीच्या काळी येथे १६० हून अधिक मठ होते. असा एखादाच संप्रदाय असेल, ज्याचा मठ येथे नसेल आणि असे कोणते महात्मा अन् संत नसतील, ज्यांनी पुरी येथे भेट दिली नसेल. गुरुनानक, चैतन्य महाप्रभु, संत कबीर, रामानंदजी, रामानुजन अशा विविध महापुरुषांनी येथे भेट दिली आहे.
४. भगवान जगन्नाथाच्या सेवेत विविध संप्रदायांचा वैशिष्ट्यपूर्ण सहभाग
पुरी हे समुद्रकिनारी एका कोपर्यात आहे. पूर्वीच्या काळी ओडिशात पुष्कळ वन आणि नद्या होत्या. त्या काळी आताच्या एवढी लोकसंख्याही नव्हती. ओडिशा हे वनांनी वेढलेले होते. त्यामुळे पुरीचा प्रवास सहज नव्हता. असे असतांनाही अनुमाने ६०० वर्षांपासून या ठिकाणी यात्रेकरू येत आहेत. ते येथे येऊन पुष्कळ आध्यात्मिक ऊर्जा घेऊन जात होते. परत जातांना ते मठाच्या स्वरूपात त्यांची खूण सोडून जात होते. या ठिकाणी गुरु गोविंदसिंहही येऊन गेले. गुरुनानक देव पंजाब येथून पुरीला पायदळ घेऊन गेले होते आणि तेथे काही काळ राहिले होते. त्यांनी शिखांची आरती जगन्नाथ मंदिराच्या परिसरातच रचली होती. ती शिखांची मूलमंत्र असून प्रतिदिन सकाळी म्हटली जाते. तेथे त्यांनी एकूण ३ मठ स्थापन केले होते. त्यातील २ मठ राज्य सरकारने तोडले असून १ मठ अद्यापही अस्तित्वात आहे.
पुरीमध्ये असलेल्या प्रत्येक संप्रदायाचा तेथे मठ होता. तेथील राजाच्या लक्षात आले की, तेथे भारतभरातून मोठ्या प्रमाणात संप्रदाय येत आहेत. तेव्हा त्यांनी भगवान जगन्नाथ रथयात्रेच्या निमित्ताने त्या सर्वांना जोडले. प्रत्येक मठ सेवाकार्याच्या माध्यमातून मंदिराशी जोडला गेला होता. मंदिराशी संबंधित प्रत्येक सेवा मठांनी आपांपसात वाटून घेतली होती. देवस्नान पौर्णिमेच्या (रथयात्रेच्या २ आठवड्यापूर्वी देवस्नान करण्यात येते.) नंतर भगवान जगन्नाथांना ताप येतो आणि त्यांची प्रकृती बिघडते. त्यामुळे एक मठ त्यांच्यासाठी औषधी बनवण्याची सेवा करतो, तर कुणी तुलसीदल पाठवतो. हे एक प्रकारे दैवी संघटन होते. या मठांमध्ये त्यांच्या अनुयायांच्या रहाण्याची सोय होती होती. त्यांच्या गोशाळा होत्या. या मठांमधून धर्माचा प्रसार होत होता, तसेच आयुर्वेदाचे शोधकार्य होत होते. जेव्हा दुष्काळ पडत होता, तेव्हा या मठांच्या माध्यमातून लोकांच्या अन्नपाण्याची सोय केली जात होती. वृद्धांचीही सेवा होत होती. मठांची संपूर्ण सामाजिक ‘इकोसिस्टम’ (यंत्रणा) होती. आता ती बंद पडण्याच्या मार्गावर आहे. काही मठांनी ती बंदही केली आहे.
५. मंदिर सरकारीकरणामुळे मठ आणि मंदिरे यांचा आध्यात्मिक र्हास
मठांचे सरकारीकरण झाले. त्यामुळे तेथे पूर्वीप्रमाणे आध्यात्मिकता राहिली नाही. अनेक ठिकाणी प्रशासक नेमले आहेत. काही मठांच्या भूमीवर सरकारने ताबा मिळवला आहे. एवढे होऊनही या संप्रदायांचे मंदिराशी असलेले आपुलकीचे नाते कायम राहिले. पूर्वापार चालत आलेली पद्धत चालू ठेवली असती, तर अतिशय चांगले झाले असते. ही पद्धत परत पुनर्जीवित करणे कठीण आहे.
मंदिर चालवणे, हे सरकारचे काम नाही. मंदिर भक्तांनीच चालवले पाहिजे. लोकांचाही त्याला विशेष विरोध नाही. मठ चालवायचा असेल, तर पूर्णवेळ अनुयायी ठेवावे लागतात. मठ चालवण्यासाठी तेथे शिष्य ठेवावा लागतो. ही सोपी गोष्ट नाही. दुर्दैवाने आज १६० पैकी केवळ ६० मठ शेष राहिले आहेत.
४ वर्षांपूर्वी राज्य सरकारने या ६० मठांपैकी २२ मठ भुईसपाट केले आहेत. ते सर्व अगदी मंदिरांच्या आजूबाजूलाच होते. परिक्रमा मार्गाच्या उभारणीसाठी त्यांना तोडण्यात आले. त्यामुळे आता त्यांचे काहीच अस्तित्व शिल्लक नाही. काहींना हानीभरपाई देण्यात आली आणि दुसरीकडे मठ उभारण्यास सांगण्यात आले. काही मठाधीश निघून केले. एकदा ५०० वर्षांची चालू आलेली पद्धत नष्ट केली की, ती परत उभारणे सोपे नाही. जे २२ मठ तोडले गेले आहेत, त्यांचे पुनर्वसन होईल, असे वाटत नाही.
ओडिशात पूर्वीचे २५ वर्षांचे शासन गेले आणि सध्याचे भाजप सरकार आले आहे. पूर्वीच्या सरकारने सौंदर्यीकरणाच्या नावाखाली मठ आणि मंदिरे यांची पुष्कळ तोडफोड केली. त्यांनी धार्मिक क्षेत्राचा पूर्ण बट्ट्याबोळ केला. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपने मंदिरांच्या विषयांना निवडणुकीतील सूत्र बनवले होते. त्याचा त्यांना पुष्कळ लाभ झाला. आता पुढे ते काय करणार आहेत, हे काळच सांगेल. पंतप्रधान मोदी स्वत: भगवान जगन्नाथाचे मोठे भक्त आहेत. त्यामुळे आम्हाला आशा आहे की, जे होईल, ते चांगलेच होईल.
(क्रमशः पुढच्या रविवारी)
– श्री. अनिल धीर, सदस्य, ‘इन्टॅक’ गव्हर्निंग कौन्सिल, ओडिशा.