‘‘२४.१२.२०२३ या दिवशी सनातनच्या ५८ व्या संत पू. (कै.) श्रीमती विजयालक्ष्मी काळेआजी (वय ८८ वर्षे) यांनी देहत्याग केला. १२.१२.२०२४ या दिवशीच्या अंकात पू. काळेआजी यांनी आयुष्यभर केलेली साधना, त्यांच्या मृत्यूपूर्वीची स्थिती, त्यांचा मृत्यू आणि मृत्यूत्तर स्थिती यांच्या संदर्भातील लेखबद्ध केलेले ईश्वरी ज्ञान आपण पाहिले. आज या लेखामध्ये आपण पू. काळेआजींचा मृत्यूत्तर साधनाप्रवास याच्या संदर्भात झालेले सूक्ष्म परीक्षण येथे लेखबद्ध केले आहे.
आज १३ डिसेंबर २०२४ या दिवशी कै. विजयालक्ष्मी काळेआजी यांची प्रथम पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने हे लिखाण प्रसिद्ध करत आहोत. (भाग २)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/862576.html
पू. (कै.) श्रीमती विजयालक्ष्मी काळेआजी यांच्या चरणी प्रथम पुण्यतिथीच्या निमित्ताने सनातन परिवाराचा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
७. सनातनच्या ५८ व्या संत पू. (कै.) श्रीमती विजयालक्ष्मी काळेआजी (वय ८८ वर्षे) यांच्या मृत्यूत्तर सूक्ष्मातील प्रवासाची काही वैशिष्ट्ये
पू. काळेआजींच्या मृत्यूनंतर त्यांच्या लिंगदेहाला नेण्यासाठी सूक्ष्मातून श्रीविष्णूचे दूत पुष्पक विमान घेऊन आले होते. त्या वेळी पुढील प्रकारे सूक्ष्म प्रवास झाला.
७ अ. पू. काळेआजी यांच्या लिंगदेहाने महर्लोकाच्या सगुण-निर्गुण स्तरावरील कृष्णलोक अनुभवणे : महर्लोक म्हणजे ऋषिलोक ! त्याच्या शेजारी सगुण कृष्णलोक आहे. जेव्हा पू. काळेआजींची काही वर्षांपूर्वी पृथ्वीवर स्थूलदेहात असतांना ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित झाली होती, तेव्हा त्यांच्या लिंगदेहाने निळसर प्रकाश असलेला महर्लोक अनुभवला होता. या वेळी पू. काळेआजींच्या शिवात्म्याने श्रीविष्णूच्या दूतांकडे महर्लोकाच्या शेजारी असणारा कृष्णलोक अनुभवण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे त्यांचे पुष्पक विमान महर्लोकाच्या शेजारी असणार्या सगुण कृष्णलोकाकडे गेले. तेथे सुंदर उपवन, रंगीबेरंगी फुले, फुलपाखरे, पशूपक्षी आणि उल्हासित करणारे वायूमंडल होते. पू. काळेआजींना कृष्णलोकातील पुढील पशूपक्ष्यांचे दर्शन झाले. त्याचा आध्यात्मिक भावार्थ पुढीलप्रमाणे आहे.
टीप – सारणीतील मोराचे सूत्र टंकलेखन करत असतांना मला केकावली (मोराचा ध्वनी) स्थुलातून ऐकू आले.
टीप १ – ‘ज्याप्रमाणे कोकिळेकडे स्थुलातून मधुर गायन करण्याची कला आहे, त्याप्रमाणे दैवी पोपटांकडे स्वतःची गायन कला आहे. सामान्य पोपटांमध्ये गायनकला सुप्तावस्थेत असते.ज्या पोपटांमध्ये ही सुप्तावस्थेत असलेली गायनकला जागृत असते, ते पोपट मधुर स्वरात भगवंताचे नाम घेतात.’ – सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.१.२०२४)
७ आ. सातव्या पाताळातील बलाढ्य अनिष्ट शक्तींनी मायावी जाळे निर्माण करून अंधार पाडल्यामुळे सगुण कृष्णलोकाडून वैकुंठाकडे जाणारा विष्णुमार्ग न दिसणे आणि सत्यलोकातील सप्तर्षींच्या निर्गुण रूपांनी प्रकाशझोत पाडून मार्गदर्शन करणे : सगुण कृष्णलोकापासून वैकुंठाकडे जात असतांना सातव्या पाताळातील बलाढ्य अनिष्ट शक्तींनी मायावी जाळे निर्माण करून अंधार पाडला. त्यामुळे श्रीविष्णूच्या पार्षदांना पुष्पक विमान नेमके कोणत्या दिशेने पुढे न्यायचे, हे कळेना. त्यामुळे त्यांनी सप्तर्षींना मार्गदर्शन करण्यासाठी प्रार्थना केली. तेव्हा सप्तर्षी लोकात (टीप ३) असणार्या सप्तर्षींच्या निर्गुण रूपाकडून पांढर्या प्रकाशाचा एक झोत पुष्पक विमानाच्या मार्गाकडे आला. त्यामुळे सोनेरी रंगाच्या सोपानाच्या (पायर्यांच्या) स्वरूपात दिसणारा विष्णुमार्ग पुन्हा श्रीविष्णूच्या पार्षदांना दिसू लागला आणि पुष्पक विमान वैकुंठाच्या दिशेने वेगाने जाऊ लागले. सप्तर्षींनी केलेल्या साहाय्यासाठी श्रीविष्णूच्या सुनंद आणि स्वानंद या पार्षदांसह पू. काळेआजींच्या शिवात्म्याने मनोमन कृतज्ञता व्यक्त केली.
टीप ३ – सप्तर्षींचे मूळ निर्गुण रूप ब्रह्मलोक आणि सत्यलोक यांच्यामध्ये असणार्या ‘सप्तर्षी’ लोकात असते. जेव्हा श्रीविष्णु, देवी किंवा गणपति पृथ्वीवर अवतार घेतात, तेव्हा अवतारांच्या धर्मसंस्थापनेच्या अवतारी कार्यात सहभागी होऊन साहाय्य करण्यासाठी सप्तर्षी लोकातील अरुंधतीसह सप्तर्षींची सगुण रूपे उच्च स्वर्गलोक ते महर्लोक यांच्यामध्ये असणार्या नक्षत्रलोकामध्ये ब्रह्मकमळावर विराजमान असतात.
७ इ. पुष्पक विमानाला प्रथम लक्ष्मीलोक लागणे : जेव्हा पू. काळेआजींच्या शिवात्म्याला घेऊन पुष्पक विमान वैकुंठाच्या जवळ पोचले, तेव्हा तेथे प्रथम लक्ष्मीलोक लागला. पू. काळेआजींची कुलदेवी श्री महालक्ष्मीदेवी असल्यामुळे त्यांच्यावर श्री महालक्ष्मीदेवीची विशेष कृपा होती. श्री महालक्ष्मीदेवीला पू. काळेआजींचा शिवात्मा पाहून पुष्कळ आनंद झाला आणि तिने पू. काळेआजींवर वात्सल्ययुक्त कृपाकटाक्ष टाकला. त्यानंतर पू. काळेआजींच्या शिवात्म्याचे स्वागत करण्यासाठी श्री महालक्ष्मीदेवीने तिच्या लोकातील दोन पांढर्या शुभ्र हत्तींना सोंडेमध्ये पुष्पहार घेऊन पू. काळेआजींच्या शिवात्म्याकडे पाठवले. त्यांनी पू. काळेआजींच्या शिवात्म्याभोवती दैवी फुलांचे सुंदर पुष्पहार घातले. हे पाहून पू. काळेआजींच्या शिवात्म्यामध्ये कृतज्ञताभावाचे तत्त्व कार्यरत झाले. त्यानंतर पू. काळेआजींच्या शिवात्म्याला श्री महालक्ष्मीदेवीच्या सुंदर रूपाचे दर्शन झाले. तेव्हा भक्त आणि भगवंत यांच्या भेटीचा सुंदर योग पाहून समस्त लक्ष्मीलोकातील विविध भक्तांची भावजागृती झाली. लक्ष्मीलोकातील गुलाबी रंगाचे वायूमंडल अधिकच उजळून गेले आणि सर्वत्र आनंददायी वातावरण निर्माण झाले.
७ ई. पू. काळेआजींच्या शिवात्म्यासह पुष्पक विमानाने वैकुंठात प्रवेश करणे : त्यानंतर पू. काळेआजींच्या शिवात्म्याला घेऊन पुष्पक विमान तपोलोक आणि सत्यलोक यांच्यामध्ये असणार्या सगुण-निर्गुण स्तरावरील वैकुंठात पोचले. तेव्हा जय आणि विजय या विष्णूच्या द्वारपालांनी हात जोडून पू. काळेआजींच्या शिवात्म्याचे भावपूर्ण स्वागत केले. त्यानंतर त्यांनी शंखनाद केल्यावर वैकुंठाच्या सात सुवर्णदारांपैकी एकेक दार उघडू लागले आणि पुष्पक विमान पुढे जाऊ लागले. जेव्हा वैकुंठाचे शेवटचे, म्हणजे सातवे महाद्वार उघडले, तेव्हा साक्षात् श्री लक्ष्मीनारायणाने पू. काळेआजींच्या शिवात्म्याचे स्वागत केले. त्यानंतर पू. काळेआजींचा शिवात्मा पुष्पक विमानातून बाहेर आला आणि तो श्रीविष्णूच्या चरणांशी पोचला. अशा प्रकारे भक्त आणि भगवंत यांची दिव्य भेट पहाण्यासाठी महर्लोकातील महर्षि, जनलोकातील संत, तपोलोकातील तपस्वी, राजर्षि आणि सत्यलोकातील ब्रह्मर्षि अन् सप्तर्षि वैकुंठात आले. अशा प्रकारे ब्रह्मांडातील समस्त दैवी शक्तीही वैकुंठात जमल्या होत्या. त्यामुळे वैकुंठाचे सुप्त रूप दृश्य रूपात दृश्यमान झाले आणि सर्वांना वैकुंठाची दिव्यता अन् भव्यता अनुभवण्यास मिळाली.
८. पू. काळेआजींच्या शिवात्म्याने ब्रह्मांडातील विविध लोकांमध्ये केलेला सूक्ष्मातील प्रवास
९. मृत्यूत्तर सद़्गती मिळणे
अशा प्रकारे पू. काळेआजींचा शिवात्मा हा भक्तीमय असल्यामुळे त्याला श्रीमन्नारायणाच्या जवळ रहाण्याचे सौभाग्य प्राप्त होऊन ‘समीप मुक्ती’ प्राप्त झाली. त्याचप्रमाणे पू. काळेआजींनी भगवंताच्या सगुण रूपाची उपासना अधिक प्रमाणात केल्यामुळे त्यांच्या शिवात्म्याला भगवंताप्रमाणे, म्हणजे श्रीमन्नारायणाप्रमाणे स्वरूप प्राप्त होऊन ‘सरूप मुक्ती’ मिळाली. अशा प्रकारे वैकुंठात काही काळ राहिल्यानंतर त्यांचा पुन्हा एक जन्म पृथ्वीवर होऊन त्यांच्या शिवात्म्याला जेव्हा सद़्गुरुपद प्राप्त होईल, तेव्हा त्याला ‘सायुज्य मुक्ती’ प्राप्त होणार आहे. त्यानंतर त्यांना मृत्यूत्तर पुन्हा वैकुंठात स्थान लाभून कलियुगाच्या शेवटी जेव्हा श्रीविष्णूचा कल्की अवतार पृथ्वीवर होईल, तेव्हा पू. काळेआजींचा विष्णुमय झालेला शिवात्मा पृथ्वीवर जन्मतःच सद़्गुरूंच्या रूपाने मनुष्यजन्म घेऊन तो अवतारी कार्यात सहभागी होऊन परात्पर गुरुपद प्राप्त करील. हा त्यांचा शेवटचा जन्म असेल. तेव्हा श्रीविष्णूच्या अवताराच्या कार्यात सहभागी झाल्यामुळे त्यांची समष्टी साधना करून त्यांना मोक्ष प्राप्त होईल.
१०. धारिकेचे टंकलेखन करत असतांना आलेल्या विविध दैवी अनुभूती
या धारिकेचे लिखाण माझ्याकडून अल्प वेळेत आणि ओघवत्या भाषेत झाले. टंकलेखन इतके सहजरित्या झाले की, मला त्यासाठी कोणतेही विशेष प्रयत्न करावे लागले नाहीत. ही धारिका टंकलिखित करत असतांना संगणकाच्या पडद्यातून कधी गुलाबी रंगाचे, तर कधी पिवळसर पांढर्या रंगाचे प्रकाश किरण बाहेर पडत होते; गुलाबाचा दैवी सुगंध दरवळत होता; बासरी किंवा वीणा यांचे मधुर स्वर माझ्या कानी पडत होते आणि मनाला पुष्कळ आनंद जाणवत होता. भगवंताच्या संतरत्नरूपी प्रिय भक्तांचे लिखाण करतांना कशा दैवी अनुभूती येतात, हे मला श्री गुरूंच्या कृपेमुळे अनुभवता आले. यासाठी मी त्यांच्या चरणी कृतज्ञ आहे.
११. कृतज्ञता आणि प्रार्थना
अशा प्रकारे ‘या लेखातून पू. काळेआजींच्या रूपाने संतरत्नरूपी परम विष्णुभक्ताची साधना आणि गुणवैशिष्ट्ये अनुभवण्याची संधी मिळाली, तसेच पू. काळेआजींच्या शिवात्म्याच्या मृत्यूत्तर सूक्ष्म प्रवासाचे सूक्ष्म अवलोकन करून ते लेखरूपात शब्दबद्ध करण्याची सेवा या पामराला मिळाली’, यासाठी मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेरूपी गुरुमाऊलीच्या चरणी कृतज्ञताभावाचे कमलपुष्प अर्पण करते. त्यांची कृपा आम्हा साधकांवर अशीच अखंड राहून आमचीही शीघ्र आध्यात्मिक उन्नती होऊन ‘आम्हाला पू. काळेआजींच्या शिवात्म्याप्रमाणे भक्त बनून वैकुंठात भगवंताच्या चरणी रहाण्याचे परम भाग्य प्राप्त व्हावे’, हीच विष्णुस्वरूप गुरुमाऊलीच्या पावन चरणी आर्तभावाने प्रार्थना समर्पित करते.’
– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.१.२०२४)
(समाप्त)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात. सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. |