सनातनच्‍या ५८ व्‍या संत पू. (कै.) श्रीमती विजयालक्ष्मी काळेआजी यांचा मृत्‍यू आणि मृत्‍यूत्तर साधनाप्रवास यांचे सुश्री मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

‘२४.१२.२०२४ या दिवशी सनातनच्‍या ५८ व्‍या संत पू. (कै.) श्रीमती विजयालक्ष्मी काळेआजी (वय ८८ वर्षे) यांनी देहत्‍याग केला. त्‍यानंतर देवाच्‍या कृपेने त्‍यांच्‍या मृत्‍यूपूर्वीची स्‍थिती, त्‍यांचा मृत्‍यू आणि त्‍यांच्‍या मृत्‍यूनंतरची स्‍थिती यांच्‍या संदर्भात झालेले सूक्ष्म परीक्षण येथे लेखबद्ध केले आहे. या लेखातून ‘संतांच्‍या संदर्भातील आलेल्‍या विविध अनुभूतींमागील आध्‍यात्मिक पैलू उलगडून अध्‍यात्‍मशास्‍त्राचे ज्ञान मिळण्‍यास आणि मृत्‍यूनंतरची प्रक्रिया अन् सूक्ष्म जगताशी संबंधित असणार्‍या अनेक शंकांचे निरसन होण्‍यास साहाय्‍य होईल’, असे वाटते.

१३ डिसेंबर २०२४ या दिवशी कै. विजयालक्ष्मी काळेआजी यांची प्रथम पुण्‍यतिथी आहे. त्‍या निमित्ताने हे लिखाण प्रसिद्ध करत आहोत.

पू. (कै.) श्रीमती विजयालक्ष्मी काळेआजी यांच्‍या चरणी प्रथम पुण्‍यतिथीच्‍या निमित्ताने सनातन परिवाराचा कृतज्ञतापूर्वक नमस्‍कार !

पू. ​(कै.) (श्रीमती) विजयालक्ष्मी काळेआजी

१. प्राण जाण्‍यापूर्वी डोळे उघडे असणे आणि प्राण जातांना डोळे अर्धवट मिटले जाऊन प्राण आज्ञाचक्रातून जाणे

‘पू. काळेआजींच्‍या देहत्‍यागापूर्वी त्‍यांचे डोळे उघडे होते आणि त्‍यांच्‍या देहत्‍यागाच्‍या वेळी त्‍यांचे डोळे अर्धवट मिटलेले होते’, असे मला जाणवले. (‘हे बरोबर आहे.’ – डॉ. ज्‍योती काळे (पू. काळेआजींची मुलगी)) जेव्‍हा आध्‍यात्मिकदृष्‍ट्या उन्‍नतांचे प्राण आज्ञाचक्रातून जातात, तेव्‍हा त्‍यांना मृत्‍यूत्तर देवलोकात स्‍थान प्राप्‍त होते. पू. काळेआजींचे प्राण आज्ञाचक्रातून गेल्‍यामुळे त्‍यांना सद़्‍गती मिळून त्‍यांच्‍या शिवात्‍म्‍यालाही वैकुंठात स्‍थान प्राप्‍त झाले.

‘आत्‍मा’ हा भगवंताचा अंश असतो. तो परमात्‍म्‍याच्‍या मूळ आणि शुद्ध स्‍वरूपात विराजमान असतो; परंतु भगवंताच्‍या मायेच्‍या प्रभावामुळे आत्‍म्‍याच्‍याभोवती अविद्येचे आवरण आलेले असते. या आवरणामुळे परमात्‍म्‍याच्‍या मूळ आणि शुद्ध स्‍वरूपातील आत्‍मा ४ स्‍थितींमध्‍ये वावरतो.

पू. काळेआजींच्‍या लिंगदेहाची पातळी ८० टक्‍क्‍यांच्‍या जवळ आल्‍यामुळे त्‍यांच्‍या आत्‍म्‍याला ‘शिवात्‍मा’ असे संबोधले आहे.

– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्‍यात्मिक पातळी ६५ टक्‍के) (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.१.२०२४)

२. पू. काळेआजींच्‍या देहत्‍यागापूर्वी आणि देहत्‍यागाच्‍या वेळी सूक्ष्मातून विविध देवतांनी त्‍यांचे दर्शन घेऊन त्‍यांना वंदन करणे 

पू. काळेआजींनी श्रीरामाप्रती आत्‍मनिवेदन भक्‍ती केली होती. त्‍यामुळे अशा थोर रामभक्‍त पू. काळेआजींचे दर्शन घेण्‍यासाठी स्‍वर्गलोकातील देवता अधून-मधून त्‍यांच्‍या निवासस्‍थानी येत होत्‍या.

३. पू. काळेआजींच्‍या देहत्‍यागापूर्वी आणि देहत्‍यागानंतर सूक्ष्मातून पंचतत्त्वांच्‍या स्‍तरांवर आलेल्‍या अनुभूती आणि त्‍यामागील कार्यकारणभाव !

३ अ. दैवी सुगंध येणे : पू. काळेआजी संत झाल्‍यापासून त्‍यांच्‍या अनेक वस्‍तूंना दैवी सुगंध येत होता. त्‍यांच्‍या देहत्‍यागानंतर या दैवी सुगंधात वृद्धी झाली. (‘यातील अनुभूती बरोबर आहेत.’ – डॉ. ज्‍योती काळे, पू. काळेआजींची मुलगी)

३ आ. पाण्‍याचे थेंब पडल्‍यासारखे जाणवणे : जेव्‍हा पू. आजी शेवटच्‍या रुग्‍णाईत अवस्‍थेत होत्‍या, तेव्‍हा ‘पू. आजींभोवती अनिष्‍ट शक्‍तींनी कोणत्‍याही प्रकारचे त्रासदायक आवरण निर्माण करू नये’, यासाठी सूक्ष्मातून देवांचे वैद्य अश्‍विनीकुमार त्‍यांच्‍या घरी येऊन श्रीविष्‍णूचे पाद्यपूजन केलेल्‍या श्रीविष्‍णुचरण तीर्थाचे प्रोक्षण करत होते. सूक्ष्मातून होणार्‍या या जलवर्षावामुळे देहत्‍याग करण्‍यापूर्वी पू. काळेआजी यांना घरावर पाऊस पडल्‍याप्रमाणे जाणवत होते. तसेच त्‍यांच्‍या देहावरही सूक्ष्मातून पाण्‍याचे थेंब पडल्‍याचे त्‍यांना आणि त्‍यांच्‍या मुलीला जाणवत होते. (‘यातील अनुभूती बरोबर आहेत.’ – डॉ. ज्‍योती काळे, पू. काळेआजींची मुलगी)

३ इ. दैवी कण येणे : पू. आजींच्‍या देहत्‍यागाच्‍या आधी आणि नंतर त्‍यांच्‍या पार्थिवावर, तसेच त्‍यांच्‍या रहात्‍या घरामध्‍ये विविध रंगांचे अनेक दैवी कण दिसले. यावरून ‘पू. आजींचे वास्‍तव्‍य असणारी वास्‍तू किती पवित्र आणि दिव्‍य आहे’, हे सूत्र यातून लक्षात आले. (‘यातील अनुभूती बरोबर आहेत.’ – डॉ. ज्‍योती काळे, पू. काळेआजींची मुलगी)

३ ई. थंड वार्‍याची झुळूक येणे : सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे भगवंतस्‍वरूप असल्‍याने त्‍यांच्‍याकडून विविध संत आणि साधक यांच्‍याकडे चैतन्‍याचे प्रवाह प्रक्षेपित होतात. जेव्‍हा हे चैतन्‍याचे प्रवाह वायुतत्त्वाच्‍या स्‍तरावर प्रक्षेपित होतात, तेव्‍हा संत आणि साधक यांना सूक्ष्मातून थंड वार्‍याची झुळूक येऊन अंगाला शीतल अन् कोमल स्‍पर्श करून गेल्‍याची अनुभूती येते. (‘यातील अनुभूती बरोबर आहेत.’ – डॉ. ज्‍योती काळे)

३ उ. दैवी नाद ऐकू येणे : जेव्‍हा संतांकडून आकाशतत्त्वाच्‍या स्‍तरावर चैतन्‍याचे प्रक्षेपण होते, तेव्‍हा संतांच्‍या सान्‍निध्‍यात विविध प्रकारचे दैवी नाद सूक्ष्मातून ऐकू येतात. जेव्‍हा पू. काळेआजींनी देहत्‍याग केला, तेव्‍हा तेथे उपस्‍थित असणार्‍या साधकांपैकी काही जणांना बासरीचा, काही जणांना शंखाचा, तर काही जणांना समुद्रात उसळणार्‍या लाटांचा सूक्ष्म नाद ऐकू आला. (‘यातील अनुभूती बरोबर आहेत.’ – डॉ. ज्‍योती काळे, पू. काळेआजींची मुलगी)

४. पू. काळेआजींच्‍या पार्थिवाच्‍या अंत्‍यसंस्‍कार विधीच्‍या वेळी त्‍यांची मुलगी डॉ. ज्‍योती काळे यांना आलेल्‍या विविध अनुभूती आणि त्‍यामागील आध्‍यात्मिक कार्यकारणभाव !

सुश्री (कु.) मधुरा भोसले

४ अ. पू. काळेआजींच्‍या पार्थिवाच्‍या अंत्‍यसंस्‍काराच्‍या वेळचे वातावरण अत्‍यंत दैवी असल्‍याचे जाणवणे : पू. काळेआजी प्रभु श्रीरामाच्‍या परम भक्‍त असल्‍यामुळे त्‍यांच्‍या अंत्‍यसंस्‍काराच्‍या वेळी स्‍वर्गलोकातील देवता, देवगुरु बृहस्‍पति आणि सत्‍यलोकातील सप्‍तर्षी यांनी पू. काळेआजींच्‍या पार्थिवावर सूक्ष्मातून पुष्‍पवृष्‍टी केली अन् वेदांतील मंगलता प्रदान करणारे विविध मंत्र म्‍हटले. त्‍यामुळे त्‍यांच्‍या अंत्‍यसंस्‍काराच्‍या वेळचे वातावरण अत्‍यंत दैवी झाले होते.

४ आ. पू. काळेआजींच्‍या पार्थिवाच्‍या चितेच्‍या ज्‍वाळा ऊर्ध्‍व (वरच्‍या) दिशेने पुष्‍कळ उंच जाणे : पू. काळेआजींच्‍या पार्थिवातून ऊर्ध्‍व दिशेने चैतन्‍याचे प्रक्षेपण होऊन सभोवतालच्‍या वायूमंडलाची शुद्धी होत होती. त्‍यामुळे त्‍यांच्‍या चितेच्‍या ज्‍वाळा ऊर्ध्‍व (वरच्‍या) दिशेने पुष्‍कळ उंच जात होत्‍या.

४ इ. पू. काळेआजींच्‍या पार्थिवाच्‍या चितेच्‍या अग्‍नीमध्‍ये श्रीकृष्‍ण आणि देवता यांच्‍या आकृत्‍या दिसणे : पू. काळेआजींच्‍या भक्‍तीमुळे त्‍यांच्‍या मनात साठलेले भगवंताचे दिव्‍य रूप त्‍यांच्‍या अंत्‍यसंस्‍काराच्‍या वेळी अग्‍नीज्‍वाळेमध्‍ये प्रकट होत होते. याला आध्‍यात्मिक परिभाषेत ‘भावामुळे भगवंताचे रूप साकार होणे किंवा प्रगट होणे’, असे म्‍हणतात. सर्वसामान्‍य व्‍यक्‍तीच्‍या अंत्‍यसंस्‍कारांतर्गत दहन विधीमध्‍ये ‘क्रव्‍याद’ नावाचा अग्‍नी कार्यरत असतो. संतांच्‍या पार्थिवाचे दहन चालू असतांना त्‍यांच्‍या देहातून प्रक्षेपित झालेल्‍या चैतन्‍यामुळे त्‍यांचा चिताग्‍नी शुद्ध आणि पवित्र होतो. पू. काळेआजींच्‍या पार्थिवाचे दहन चालू असतांना सूक्ष्मातून श्रीकृष्‍ण आणि विविध देवता यांच्‍या आकृत्‍या चिताग्‍नीत प्रगट झाल्‍या. त्‍यामुळे त्‍यांच्‍या दहन विधीच्‍या वेळी पवित्र आणि पावन असलेले श्री अग्‍नीनारायणाचे ‘पावक’ हे रूप कार्यरत झाले होते.

४ ई. पू. काळेआजींच्‍या पार्थिव देहाच्‍या अंत्‍यसंस्‍काराच्‍या वेळी तेथील स्‍मशानात सर्वत्र विभूतीचा सुगंध दरवळणे आणि तेथे शिवतत्त्व जाणवणे : पू. काळेआजींनी त्‍यांचा कुलदेव ‘श्री कालभैरव’ याची उपासना केली होती. श्री कालभैरव हे शिवाचे एक रूप असल्‍याने जेव्‍हा पू. काळेआजींच्‍या देहातून शिवतत्त्वमय चैतन्‍यलहरी प्रक्षेपित झाल्‍या, तेव्‍हा शिवाने देहावर धारण केलेल्‍या आणि पवित्र असणार्‍या चिताभस्‍माचा किंवा विभूतीचा सुगंध स्‍मशानात दरवळला. शिव लयाची देवता असल्‍यामुळे स्‍मशानात जिवाच्‍या पार्थिव देहाचे दहन होऊन त्‍याचा लय होतो, तसेच शिवाच्‍या प्रेतपूतन, भूतनाथ, वेताळ इत्‍यादी शिवगणांचा वास स्‍मशानभूमीत असल्‍यामुळे स्‍मशानाला ‘रुद्रभूमी’, असेही म्‍हणतात.

४ उ. स्‍मशानात पू. काळेआजींच्‍या चितेच्‍या ठिकाणचे वातावरण पुष्‍कळ हलके आणि प्रसन्‍न जाणवणेे; मात्र स्‍मशानात पू. आजींच्‍या चितेच्‍या शेजारीच असलेल्‍या विद्युत् दाहिनीच्‍या ठिकाणी आणि सभोवतालच्‍या परिसरात जडपणा जाणवणे : रज आणि तम या गुणांचा गुणधर्म ‘जडत्‍व’ असतो आणि ‘हलकेपणा’ हा सत्त्वगुणाचा गुणधर्म असतो. स्‍मशानात पू. काळेआजींच्‍या पार्थिवातून सत्त्वप्रधान असणारी शक्‍ती, भाव, चैतन्‍य, आनंद आणि शांती यांच्‍या लहरींचे प्रक्षेपण झाल्‍यामुळे स्‍मशानात पू. काळेआजींच्‍या चितेच्‍या ठिकाणचे वातावरण पुष्‍कळ हलके जाणवले. सर्वसामान्‍य व्‍यक्‍ती रज-तम प्रधान असल्‍यामुळे स्‍मशानात सर्वसामान्‍य व्‍यक्‍तीच्‍या पार्थिवाच्‍या दहनासाठी वापरलेल्‍या विद्युत् दाहिनीच्‍या ठिकाणी जडपणा जाणवतो. त्‍याचप्रमाणे सर्वसामान्‍य व्‍यक्‍तीच्‍या मृत्‍यूनंतर त्‍यांच्‍या पार्थिवांवर नियंत्रण मिळवण्‍यासाठी अनिष्‍ट शक्‍ती कार्यरत झालेल्‍या असतात, तसेच मृत पावलेल्‍या सर्वसामान्‍य व्‍यक्‍तीचे नातेवाईकही व्‍यक्‍तीच्‍या मृत्‍यूमुळे दुःखी झालेले असतात. अशा विविध कारणांमुळे स्‍मशानातील वातावरणात जडत्‍व आणि दुःखदायी त्रासदायक स्‍पंदने जाणवतात.

४ ऊ. पू. काळेआजींच्‍या पार्थिवाच्‍या दहनानंतर तेथील राखेचा रंग पांढरा शुभ्र असणे आणि त्‍याला दैवी सुगंध येणे : अंत्‍यसंस्‍कार विधीच्‍या अंतर्गत दहन विधी चालू असतांना पू. काळेआजींच्‍या पार्थिव देहातून पांढर्‍या रंगाच्‍या सात्त्विक शक्‍तीच्‍या लहरींचे पुष्‍कळ प्रमाणात प्रक्षेपण झाले. सात्त्विक लहरींचा रंग पांढरा असून सात्त्विकतेला दैवी सुगंध येत असतो. त्‍यामुळे पू. काळेआजींच्‍या पार्थिवाच्‍या राखेत तेजतत्त्वाच्‍या स्‍तरावरील सात्त्विकता घनीभूत झाली. तेव्‍हा तिला पांढरा रंग प्राप्‍त झाला. जेव्‍हा या राखेमध्‍ये शुद्ध पृथ्‍वीतत्त्व कार्यरत झाले, तेव्‍हा या राखेला दैवी सुगंध आला.

४ ए. अस्‍थी विसर्जन करतांना पू. काळेआजींच्‍या अस्‍थी पुष्‍कळ हलक्‍या असूनही नदीच्‍या पात्रात तळाशी लवकर जाणे आणि नदीच्‍या पाण्‍यात लवकर विरघळणे : पू. काळेआजींच्‍या पार्थिवामध्‍ये पुष्‍कळ सात्त्विकता आणि चैतन्‍य होतेे. त्‍यामुळे त्‍यांच्‍या अस्‍थीही पुष्‍कळ हलक्‍या होत्‍या. त्‍याचप्रमाणे त्‍यांच्‍या अस्‍थींमध्‍ये प्रभु श्रीरामाच्‍या नामातील शब्‍दरूपी नाद भिनला होता. त्‍यामुळे या अस्‍थींमध्‍ये आकाशतत्त्वाचे प्रमाण अधिक होते. त्‍यामुळे त्‍या आतून पुष्‍कळ पोकळ होत्‍या आणि पृथ्‍वीतत्त्वाचे प्रमाण अल्‍प असल्‍यामुळे त्‍यांची घनता अल्‍प होती. त्‍यामुळे त्‍यांच्‍या अस्‍थी वाई, जिल्‍हा सातारा येथील गणपति घाटावर कृष्‍णानदीमध्‍ये विसर्जित केल्‍यावर त्‍या लवकर विरघळून गेल्‍या.

५. पू. काळेआजींच्‍या पार्थिव देहाच्‍या अंत्‍यसंस्‍कारानंतर केलेल्‍या अंत्‍यविधींच्‍या वेळी त्‍यांची मुलगी डॉ. ज्‍योती काळे यांना आलेल्‍या विविध अनुभूती आणि त्‍यांमागील आध्‍यात्मिक कार्यकारणभाव !

५ अ. पू. काळेआजींच्‍या देहत्‍यागाच्‍या १० व्‍या दिवशी त्‍यांच्‍या पिंडाला कावळा लगेच शिवणे आणि तेथील वातावरणही प्रसन्‍न अन् हलके जाणवणे : पू. काळेआजींना सद़्‍गती मिळाली असून त्‍यांना वैकुंठात स्‍थान प्राप्‍त झाले आहे. त्‍याचप्रमाणे त्‍यांनी अनेक वर्षे प्रभु श्रीरामाची भक्‍तीपूर्ण उपासना केली होती. त्‍यामुळे त्‍यांच्‍या देहत्‍यागानंतर १० व्‍या दिवशी त्‍यांच्‍या रामभक्‍तीने ओतप्रोत भरलेल्‍या त्‍यांच्‍या पिंडाचे प्रतिरूप असणार्‍या भाताच्‍या पिंडाचे दर्शन घेण्‍यासाठी ऋषिलोकातून परम रामभक्‍त काकभृषुंडी ऋषि हे कावळ्‍याच्‍या रूपात आले होते. पू. काळेआजींच्‍या राममय झालेल्‍या पिंडाचे प्रतीक असलेल्‍या भाताच्‍या पिंडाचे दर्शन घेतल्‍यावर काकभृषुंडी ऋषींना अलौकिक आनंद आणि परम शांती यांची अनुभूती आली. त्‍यामुळे पू. काळेआजींसाठी ठेवलेल्‍या पिंडाच्‍या ठिकाणचे वातावरण पुष्‍कळ हलके आणि प्रसन्‍नदायी झाल्‍याचे जाणवले.

५ आ. पू. काळेआजींचा देहत्‍यागाच्‍या १२ व्‍या दिवशी त्रिपाद शांतीच्‍या वेळी चांगली स्‍पंदने जाणवणे : ‘पुनर्वसु, उत्तराषाढा, कृत्तिका, उत्तरा, पूर्वभाद्रपदा आणि विशाखा’, या नक्षत्रांना ‘त्रिपाद’ नक्षत्रे म्‍हणतात. मृत्‍यूच्‍या वेळी जर यांपैकी कोणतेही नक्षत्र असेल, तर व्‍यक्‍तीला त्रिपाद दोष लागतो. त्‍यामुळे व्‍यक्‍तीवरील या नक्षत्रांचा कुप्रभाव दूर करण्‍यासाठी ‘त्रिपाद शांती’ करावी लागते. पू. काळेआजींचा देहत्‍यागही त्रिपाद नक्षत्रांच्‍या योगावर झाल्‍यामुळे त्‍यांच्‍या देहत्‍यागाच्‍या १२ व्‍या दिवशी कृत्तिका नक्षत्र असल्‍यामुळे त्‍यांची ‘त्रिपाद शांती’ करण्‍यात आली. पू. काळे आजी संत असल्‍यामुळे त्‍यांच्‍यासाठी केलेल्‍या त्रिपाद शांतीच्‍या वेळीही कोणत्‍याही प्रकारचा त्रास किंवा जडपणा न जाणवता चांगली स्‍पंदने जाणवली.

५ इ. उदक शांतीच्‍या वेळी माझ्‍यासह नातेवाइकांना कोणताही त्रास न जाणवणे : १४ व्‍या दिवशी पू. काळेआजींचा शिवात्‍मा पूर्णपणे वैकुंठात स्‍थित झाल्‍यामुळे त्‍यांच्‍याकडून पृथ्‍वीच्‍या दिशेने चैतन्‍यलहरींचे प्रक्षेपण झाले. तसेच पू. काळेआजींचे अनेक नातेवाईक सात्त्विक आहेत. त्‍यामुळे पू. काळेआजींच्‍या नातेवाइकांनाही त्‍यांच्‍या निधनानंतर दुःखदायक स्‍पंदने न जाणवता पू. आजींच्‍या शिवात्‍म्‍याकडून प्रक्षेपित झालेली चैतन्‍य आणि आनंद यांचीच स्‍पंदने ग्रहण करता येऊन ती अनुभवता आली.

६. कृतज्ञता : ‘पू. काळेआजी परम रामभक्‍त असल्‍यामुळे त्‍यांच्‍याशी संबंधित असणारी अनेक आध्‍यात्मिक गुणवैशिष्‍ट्ये आणि दैवी अनुभूती अनुभवण्‍यास मिळाल्‍या. ‘श्री गुरूंच्‍या कृपेमुळे पू. काळेआजींच्‍या अंत्‍यविधींच्‍या संदर्भात आलेल्‍या विविध अनुभूतींमागील शास्‍त्र भगवंताने सोप्‍या परिभाषेत उलगडून सांगितले’, यासाठी श्री गुरु आणि भगवंत यांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’ (क्रमश:)

– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्‍यात्मिक पातळी ६५ टक्‍के) (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.१.२०२४)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला सूक्ष्म-परीक्षण म्हणतात.

सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.