बांगलादेशी हिंदूंना परत आणण्‍यासंबंधी भारतातील केंद्र सरकारने हस्‍तक्षेप करावा !

विशेष लेख

बांगलादेशी हिंदूंची केविलवाणी अवस्‍था : तेथील हिंदूंचे प्राण वाचवा !

बांगलादेशामधील सध्‍याच्‍या घडामोडी पहाता ‘केंद्र सरकारने संयुक्‍त राष्‍ट्रांकडे बांगलादेशात ‘शांती सेना’ (पीसकीपिंग मिशन) तैनात करण्‍याची विनंती करावी, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथे छळ होणार्‍या बांगलादेशी हिंदूंना परत आणण्‍यासंबंधी हस्‍तक्षेप करावा’, अशी मागणी बंगालच्‍या मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी यांनी २ डिसेंबर या दिवशी केली. ‘बांगलादेशामधील घडामोडी पहाता आणि बंगालमध्‍ये रहाणार्‍या नागरिकांनी त्‍यांच्‍या नातेवाइकांचे बांगलादेशातील अनुभव सांगितल्‍यानंतर, बांगलादेशातून भारतात येणार्‍या अनेकांना अटक झालेल्‍या घटनांनंतर, तसेच येथील (बंगालमधील) ‘इस्‍कॉन’च्‍या प्रतिनिधींशी बोलल्‍यानंतर मला विधानसभेत यावर बोलणे भाग पडले आहे’, असे बॅनर्जी म्‍हणाल्‍या. ‘हा राजकीय मुद्दा नसून बंगाली हिंदूंसाठी हा अस्‍तित्‍वाचा मुद्दा आहे’, असेही बॅनर्जी म्‍हणाल्‍या. बांगलादेशामधून येणार्‍या पर्यटकांची संख्‍या जुलै आणि ऑगस्‍ट मासामध्‍ये गेल्‍या वर्षीच्‍या तुलनेत घटल्‍याचे त्‍यांनी सांगितले. याचसमवेत जानेवारी ते ऑगस्‍ट या काळात गेल्‍या वर्षीच्‍या तुलनेत बांगलादेशातही अल्‍प प्रवासी गेले आहेत.

१. ‘इस्‍कॉन’च्‍या चिन्‍मय कृष्‍ण दास प्रभु यांना अटक आणि बांगलादेशातील चिघळत चाललेली परिस्‍थिती

बिग्रेडियर हेमंत महाजन (निवृत्त)

भारतात येणार्‍या ‘इस्‍कॉन’च्‍या ५० हून अधिक सदस्‍यांना बांगलादेश प्रशासनाने रोखल्‍याचे वृत्त ‘इस्‍कॉन’च्‍या कोलकाता येथील शाखेसह अनेक बांगलादेशी माध्‍यमांनी दिले आहे. ‘सर्व वैध कागदपत्रे असूनही इस्‍कॉनच्‍या सदस्‍यांना भारतात प्रवेश करण्‍यापासून रोखले’, असे या माध्‍यमांनी म्‍हटले आहे. बांगलादेशात सत्तातंर झाल्‍यापासून हिंदु अल्‍पसंख्‍यांकांवर आक्रमणे होण्‍याच्‍या घटनांमध्‍ये वाढ झाली आहे. नुकतेच चितगाव येथे झालेल्‍या आंदोलनाच्‍या वेळी ‘इस्‍कॉन’च्‍या चिन्‍मय कृष्‍ण दास प्रभु यांच्‍यासह १९ जणांवर देशद्रोहाचा गुन्‍हा नोंदवण्‍यात आला होता. बांगलादेश पोलिसांकडून या प्रकरणी चिन्‍मय प्रभु यांना अटक करण्‍यात आली होती. नंतर या अटकेच्‍या निषेधार्थ हिंसाचार झाला आणि त्‍यात त्‍यांच्‍या अधिवक्‍त्‍यांचा मृत्‍यू झाला. त्‍यानंतर पुन्‍हा अन्‍य एका अधिवक्‍त्‍यांनी त्‍यांना साहाय्‍य करण्‍यासाठी न्‍यायालयात धाव घेतली; पण त्‍यांनाही गंभीर मारहाण करण्‍यात आली, तसेच त्‍यांच्‍या घरीही तोडफोड करण्‍यात आली. आता त्‍यांना साहाय्‍य करण्‍याकरता कुणीही अधिवक्‍ते सिद्ध नाहीत. ‘भारतीय हिंदु’, अशी ओळख सांगितल्‍याने बांगलादेशात गेलेल्‍या पर्यटक भारतीय युवकालाही बेदम मारहाण झाली.

बांगलादेशातील हिंदूंवर होणार्‍या हिंसाचाराच्‍या विरुद्ध लढा देणारे ‘इस्‍कॉन’च्‍या ‘पुंडरिक धाम’चे अध्‍यक्ष चिन्‍मय कृष्‍णा दास प्रभु यांना ढाका येथे देशद्रोहाच्‍या आरोपाखाली अटक करण्‍यात आली आहे. बांगलादेशामध्‍ये दास यांच्‍या अटकेचा निषेध करण्‍यासाठी मोठ्या संख्‍येने हिंदू रस्‍त्‍यावर उतरले आहेत. भारताच्‍या परराष्‍ट्र मंत्रालयानेही चिन्‍मय प्रभु यांच्‍या अटकेवर चिंता व्‍यक्‍त केली. हिंदु समुदायाला कायदेशीर संरक्षण आणि अल्‍पसंख्‍यांकांसाठी समर्पित मंत्रालयाच्‍या मागणीसाठी चिन्‍मय प्रभु यांच्‍या नेतृत्‍वाखाली आंदोलन चालू होते.

‘बांगलादेश सम्‍मिलित सनातन जागरण जोत’चे प्रवक्‍ते असलेले चिन्‍मय प्रभु यांना झालेली अटक आणि नंतर त्‍यांचा जामीन नाकारण्‍यात येणे, हे गंभीर आहे. बांगलादेशातील हिंदु आणि इतर अल्‍पसंख्‍यांकांवर आतंकवादी घटकांकडून झालेल्‍या आक्रमणानंतर ही घटना घडली आहे. तिथे अल्‍पसंख्‍यांकांची घरे आणि व्‍यावसायिक संस्‍थांची जाळपोळ आणि लुटमार, तसेच चोरी, देवता अन् मंदिरांची विटंबना असे अनेक गुन्‍हे नोंद आहेत; परंतु या घटनांचे गुन्‍हेगार अजूनही मोकाट फिरत आहेत, तर दुसरीकडे शांततापूर्ण सभांद्वारे स्‍वतःचे हक्‍क मागणार्‍या धर्मप्रचारकांवर आरोप केले जात आहेत, हे अतिशय दुर्दैवी आहे. बांगलादेशातील ‘आंतरराष्‍ट्रीय सोसायटी फॉर कृष्‍णा चेतना (इस्‍कॉन)’वर करण्‍यात येणार्‍या कार्यवाहीच्‍या वेळी तेथील सरकारी बँकांनी या हिंदु संघटनेशी संबंधित १७ बांगलादेशी हिंदूंची बँक खाती गोठवली आहेत.

बांगलादेशातील अवामी लीगच्‍या अध्‍यक्षा आणि माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी तेथील हिंदूंवर होणारे अन्‍याय अन् अत्‍याचार यांचा तीव्र निषेध केला आहे. ‘अधिवक्‍ता सैफुल इस्‍लाम यांची झालेली हत्‍या, म्‍हणजे मानवी हक्‍कांचे उल्लंघन आहे’, असे शेख हसीना म्‍हणाल्‍या आहेत. आता ब्रिटनचे खासदार बॉब ब्‍लॅकमन यांनी आणि ब्रिटननेही बांगलादेशात चालू असलेल्‍या हिंदूंवरील अन्‍याय आणि अत्‍याचार यांच्‍याविरोधात आवाज उठवला आहे.

२. ‘इस्‍कॉन’ आतंकवादी संघटना असल्‍याचा महान शोध ‘नोबेल’ (नोबेल विजेते महंमद युनूस यांच्‍या) सरकारने लावला !

बांगलादेशात इस्‍लामी कट्टरतावाद्यांनी सत्ता हस्‍तगत केली. त्‍यानंतर शेख हसीना यांच्‍या विरोधातील या आंदोलनाने हिंदूविरोधी जिहादचे रूप घेतले. आतापर्यंत शेकडो हिंदूंची सर्रास हत्‍या करण्‍यात आली असून सहस्रो हिंदु महिलांवर अत्‍याचार करण्‍यात आले आहेत. शेकडो मंदिरेही पाडण्‍यात आली आहेत. आता तर त्‍या देशातील ‘इस्‍कॉन’ या संघटनेला ‘आतंकवादी’ ठरवण्‍याचा विचार तेथील सरकार करत आहे. ही संघटना ‘आतंकवादी’ असल्‍याचा महान शोध त्‍या देशाच्‍या ‘नोबेल’ सरकारने लावला. त्‍यामुळे या संघटनेवर बंदी आणण्‍याचा विचार केला जात आहे.

‘इस्‍कॉन’ ही प्रामुख्‍याने अमेरिकास्‍थित धार्मिक संघटना असून ती जगभर भगवद़्‍गीता आणि कृष्‍णलीला यांचा प्रचार करते. अमेरिकेपासून रशियापर्यंत आणि युरोपपासून आफ्रिकेपर्यंत तब्‍बल १७७ देशांमध्‍ये या संघटनेचे कार्य चालू आहे. काही आखाती देशांमध्‍येही ही संघटना कार्यरत आहे. या ‘इस्‍लामी देशांना ही संघटना ‘आतंकवादी’ आहे’, असा शोध लागलेला नाही की, जो दरिद्री आणि भुकेकंगाल बांगलादेशाने लावला आहे. ‘इस्‍कॉन’ ही धर्मादाय संस्‍था असून तिच्‍या माध्‍यमातून अनेक प्रकारचे विनामूल्‍य साहाय्‍य दिले जाते. ही संस्‍था हिंदु धर्माच्‍या तत्त्वज्ञानाचा प्रसार करत असली, तरी ती कुठेही धर्मपरिवर्तनाच्‍या कामात गुंतलेली नाही. यंदा बांगलादेशात आलेल्‍या पूरस्‍थितीत याच चिन्‍मय कृष्‍ण दास प्रभु यांनी स्‍वत: अनेक ठिकाणी होड्यांमधून साहाय्‍य पोचवले होते.

३. राष्‍ट्रीय पातळीवर व्‍यापक चर्चा होण्‍याची आवश्‍यकता

सध्‍या बांगलादेशामध्‍ये सत्ता पालटामुळे तेथे अल्‍पसंख्‍यांक असलेल्‍या हिंदूंची अवस्‍था अतिशय भयावह झाली आहे. प्रतिदिन तेथील हिंदूंच्‍या हत्‍या होणे, महिलांवर बलात्‍कार होणे, देवतांच्‍या मूर्तींची विटंबना केली जाणे, हिंदूंच्‍या आध्‍यात्‍मिक नेत्‍यांना अटक केली जाणे, या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. तेथे असलेल्‍या हिंदूंचे रक्षण करणे, हे भारताचे नैतिक दायित्‍व आहे. या विषयावर राष्‍ट्रीय पातळीवर व्‍यापक चर्चा होण्‍याची आवश्‍यकता आहे. बांगलादेशातील हिंदूंची स्‍थिती दयनीय आहे.

जगाच्‍या कोणत्‍याही भागात मुसलमानविरोधी दंगे झाले, तर जगभरातील इस्‍लामी देशांकडून त्‍याविरोधात एकसूराने आवाज उठवला जातो. अनेकदा संयुक्‍त राष्‍ट्रांमध्‍येही त्‍याचा निषेध नोंदवला जातो. भारतातील धार्मिक स्‍वातंत्र्य धोक्‍यात आल्‍याचे खोटे अहवाल वेळोवेळी जारी करणार्‍या संयुक्‍त राष्‍ट्रांच्‍या कथित समित्‍यांनी बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांच्‍या विरोधात मात्र पूर्ण मौन धारण केले आहे. भारताला म्‍हणूनच बांगलादेशातील हिंदूंच्‍या हक्‍कांवर बोलण्‍याचा आणि आवश्‍यकता भासल्‍यास त्‍या देशात हस्‍तक्षेप करण्‍याचा हक्‍क आहे.

बांगलादेशामध्‍ये हिंदूंची भयावह अवस्‍था

४. भारतातील पुरोगामी गप्‍प आहेत !

दुर्दैव हेच की, बांगलादेशामधील हिंदु एका आध्‍यात्‍मिक गुरूच्‍या अटकेविषयी भारतातील पुरोगामी गप्‍प आहेत. गाझा आणि अन्‍य इस्‍लामी राष्‍ट्रांतील मानवाधिकारांवर ‘सेव्‍ह गाझा’ (गाझा वाचवा !) वगैरे म्‍हणून व्‍यक्‍त होण्‍याची चढाओढ लावणारे पुरोगामी, माध्‍यमांमधील पत्रकार या प्रकरणी मात्र गप्‍प आहेत. त्‍यामुळे मानवाधिकाराच्‍या नावाखाली अन्‍याय आणि अत्‍याचार यांवर व्‍यक्‍त होण्‍याचा हा सोयीस्‍करपणा सर्वस्‍वी निंदनीय आहे. त्‍यामुळे भारत सरकारसह जगभरातील हिंदूंनीही आता चिन्‍मय प्रभु यांच्‍या सुटकेसाठी बांगलादेश सरकारवर दबाव वाढवावा.

अमेरिकेच्‍या अध्‍यक्षीय निवडणुकीच्‍या प्रचारकाळात रिपब्‍लिकन पक्षाचे उमेदवार डॉनल्‍ड ट्रम्‍प यांनी उघडपणे बांगलादेशातील हिंदूंच्‍या नरसंहाराचा उल्लेख केला होता. ‘ज्‍याप्रमाणे जगभरातील ज्‍यू लोकांच्‍या सुरक्षेसाठी इस्रायल देश सदैव सक्रीय असतो, त्‍याप्रमाणे आता भारतानेही जगभरातील हिंदूंच्‍या हितासाठी सक्रीय होण्‍याची वेळ आली आहे.’ भारत ही आशिया खंडातील एक मोठी सत्ता आहे. भारताने स्‍वतःचे आर्थिक आणि लष्‍करी सामर्थ्‍य दाखवल्‍यास बांगलादेश गुडघ्‍यावर येईल. भारताने त्‍या देशाला निर्वाणीची चेतावणी दिल्‍यास तेथील हिंदूंचे प्राण वाचण्‍याची शक्‍यता आहे.

– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे. (४.१२.२०२४)

संपादकीय भूमिका

बांगलादेशातील हिंदूंच्‍या रक्षणासाठी भारताने स्‍वतःचे आर्थिक आणि लष्‍करी सामर्थ्‍य दाखवणे अपरिहार्य !