कोल्‍हापूर येथे दैनिक ‘सनातन प्रभात’चा रौप्‍यमहोत्‍सवी सोहळा भावपूर्ण वातावरणात साजरा !

  • ‘सनातन प्रभात’चे वाचक, हितचिंतक, विज्ञापनदाते यांची उपस्‍थिती

  • सोहळ्‍याला ६०० हून अधिक उपस्‍थिती

  • दैनिकाच्‍या वितरकांचा सत्‍कार !

दीपप्रज्‍वलन करतांना (डावीकडून) सद़्‍गुरु स्‍वाती खाडये, प्रा. राजेंद्र ठाकूर, श्री. अजय केळकर

कोल्‍हापूर, १ डिसेंबर (वार्ता.) – गेल्‍या २५ वर्षांपासून अविरतपणे धर्माधिष्‍ठित हिंदु राष्‍ट्रासाठी कटीबद्ध असलेल्‍या आणि समाजावर साधना अन् धर्मपालन यांचे संस्‍कार करणार्‍या दैनिक ‘सनातन प्रभात’चा रौप्‍यमहोत्‍सवी सोहळा भावपूर्ण आणि उत्‍साही वातावरणात येथे पार पडला. शहरातील राजारामपुरी येथील इंद्रप्रस्‍थ सांस्‍कृतिक भवन येथे १ डिसेंबर या दिवशी सायंकाळी ५ वाजता हा सोहळा आयोजित करण्‍यात आला होता. या सोहळ्‍याला सनातन संस्‍थेच्‍या धर्मप्रचारक सद़्‍गुरु स्‍वाती खाडये, स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांचे अभ्‍यासक आणि प्रखर हिंदुत्‍वनिष्‍ठ प्रा. राजेंद्र ठाकूर सर आणि दैनिक ‘सनातन प्रभात’चे विशेष वरिष्‍ठ प्रतिनिधी श्री. अजय केळकर, ‘सनातन प्रभात’चे वाचक, हितचिंतक, विज्ञापनदाते, साधक यांची उपस्‍थिती होती.

दैनिक ‘सनातन प्रभात’च्‍या अंकाचे प्रकाशन करतांना (डावीकडून) श्री. अजय केळकर, प्रा. राजेंद्र ठाकूर, सद़्‍गुरु स्‍वाती खाडये

वर्धापनदिन सोहळ्‍याचा प्रारंभ मान्‍यवरांच्‍या हस्‍ते निरांजनाने दीपप्रज्‍वलन करून करण्‍यात आला. त्‍यानंतर श्री. गुरुप्रसाद जोशी आणि श्री. विवेक देवस्‍थळी यांनी वेदमंत्रपठण केले. ‘सनातन प्रभात’ नियतकालिक समुहाचे संस्‍थापक संपादक सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्‍या संदेशाचे वाचन सनातन संस्‍थेचे आधुनिक वैद्य मानसिंग शिंदे यांनी केले. सनातन संस्‍थेच्‍या धर्मप्रचारक सद़्‍गुरु स्‍वाती खाडये यांचा सन्‍मान सौ. गायत्री चव्‍हाण यांनी केला, तर प्रा. राजेंद्र ठाकूर सर यांचा सत्‍कार हिंदु जनजागृती समितीचे कोल्‍हापूर जिल्‍हा समन्‍वयक श्री. आदित्‍य शास्‍त्री यांनी केला. ‘सनातन प्रभात’चे विशेष वरिष्‍ठ प्रतिनिधी श्री. अजय केळकर यांचा सत्‍कार सनातन संस्‍थेचे श्री. सतीश माळी यांनी केला, तर ‘सनातन प्रभात’चे विशेष प्रतिनिधी श्री. सचिन कौलकर यांचा सत्‍कार प्रा. राजेंद्र ठाकूर सर यांनी केला. सोहळ्‍याला मान्‍यवर म्‍हणून उपस्‍थित असलेले ह.भ.प. विठ्ठलतात्‍या पाटील यांचा सन्‍मान हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रथमेश गावडे यांनी केला. कृतीशील वाचक आणि हिंदुत्‍वनिष्‍ठ श्री. चारुदत्त पोतदार आणि ‘सनातन प्रभात’चे वाचक अन् उद्योजक श्री. प्रभुप्रसाद जांगीड यांचा सत्‍कार सद़्‍गुरु स्‍वाती खाडये यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला. या वेळी ‘सनातन प्रभात’च्‍या वर्धापनदिन विशेषांकाचे प्रकाशन सद़्‍गुरु स्‍वाती खाडये यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.

ऊन, वारा आणि पाऊस या कशाचीही तमा न बाळगता साधना म्‍हणून ‘सनातन प्रभात’ अंकाचे वितरण करणार्‍या मलकापूर (जिल्‍हा कोल्‍हापूर) येथील वितरक सौ. संगीता मिरजकर यांचा सत्‍कार प्रा. राजेंद्र ठाकूर यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला. गेली २५ वर्षे घर आणि व्‍यवसाय सांभाळून अवितरपणे साधना म्‍हणून दैनिक ‘सनातन प्रभात’ची सेवा करणारे आजरा (जिल्‍हा कोल्‍हापूर) येथील वितरक श्री. आनंदराव साठे आणि श्री. राजू सुतार यांचा सत्‍कार प्रा. राजेंद्र ठाकूर यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला.

सोहळ्‍याला उपस्‍थित धर्मप्रेमी आणि वाचक

दैनिक ‘सनातन प्रभात’च्‍या रौप्‍य महोत्‍सवी वर्धापनदिन सोहळ्‍यातील वक्‍त्‍यांचे मनोगत…

‘सनातन प्रभात’ने हिंदु राष्‍ट्राविषयी मांडलेली भूमिका सत्‍यात उतरत आहे ! – प्रा. राजेंद्र ठाकूर, प्रखर हिंदुत्‍वनिष्‍ठ

प्रा. राजेंद्र ठाकूर

क्रांतीकारक चापेकर बंधू, राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे संस्‍थापक पू. हेगडेवार, स्‍वातंत्र्यवीर सावकर, श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे संस्‍थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी आणि त्‍यानंतर दैनिक ‘सनातन प्रभात’ने गेल्‍या २५ वर्षांपासून हिंदु राष्‍ट्र होणार असल्‍याचे उद़्‍घोषित केले, ते आता सत्‍यात उतरत आहे. हिंदुस्‍थानात संस्‍कार, संस्‍कृती, हिंदु धर्म यांवर बोलायची अनुमती दिली जात नाही, हेे दुर्दैवी आहे; मात्र ‘सनातन प्रभात’ या सर्व गोष्‍टी समाजासमोर आणत आहे. गेल्‍या २५ वर्षांत ‘सनातन प्रभात’ने ३७० कलम रहित करण्‍याविषयी वारंवार सांगितले होते. त्‍याप्रमाणे हे कलम हटवले गेले. मला वाटत होते की, राष्‍ट्र आणि धर्म यांविषयी बातम्‍या येत असतांना या दैनिकावर बंदीचे सावट का येत नाही ? मात्र हे दैनिक चालू ठेवण्‍यासाठी हिंदूंनी कष्‍ट सहन केले आहेत. भारतीय नागरिकत्‍व कायदा, समान नागरी कायदा, अयोध्‍या येथील श्रीरामजन्‍मभूमी आणि आता काशी विश्‍वेवर मंदिरांविषयी ‘सनातन प्रभात’ने भूमिका मांडली आहे. वक्‍फ बोर्डाच्‍या विरोधातही ‘सनातन प्रभात’ने सतत ताठ मानेने भूमिका मांडली आहे. लवकरच संसदेत हे वक्‍फ बोर्ड सुधारणा विधेयक मान्‍य केले जाणारच आहे. हिंदूंना राष्‍ट्र आणि धर्म यांविषयी माहिती देऊन त्‍यांना जागृत करणे हे प्रत्‍येक हिंदूचे दायित्‍व आहे.

हिंदुत्‍वनिष्‍ठांनी राबवलेल्‍या मोहिमांना बळ देण्‍याचे कार्य ‘सनातन प्रभात’ने केले ! – सद़्‍गुरु स्‍वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्‍था

सद़्‍गुरु स्‍वाती खाडये

‘सनातन प्रभात’मधून आयुर्वेद, राष्‍ट्रीय सुरक्षा, धर्मावर घेतले जाणारे आक्षेप आणि त्‍याचे खंडण, धर्मद्रोह्यांची षड्‍यंत्रे, हिंदु संघटनाची आवश्‍यकता आदी महत्त्वपूर्ण विषयांवर अभ्‍यासक आणि तज्ञ यांचे लेख प्रकाशित होतात. त्‍यांचा धर्मप्रसार करतांना लाभ होतो. असा अनुभव अनेक हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांच्‍या कार्यकर्त्‍यांनाही आला आहे. हिंदुत्‍वनिष्‍ठांच्‍या मोहिमांना बळ देण्‍याचे कार्य ‘सनातन प्रभात’ने केले आहे. हिंदुत्‍व, हिंदु राष्‍ट्र यांविषयीच्‍या आध्‍यात्मिक संकल्‍पना सुस्‍पष्‍ट करून त्‍याविषयी जागृती करण्‍याचे कार्य ‘सनातन प्रभात’ २५ वर्षांपासून करत आहे. अनेकदा ‘सनातन प्रभात’ला धमकावण्‍यात आले, ‘सनातन प्रभात’च्‍या कार्यालयावर आक्रमणही करण्‍यात आले, ‘सनातन प्रभात’च्‍या संपादकांना अटक करण्‍याचे कारस्‍थान रचण्‍यात आले; परंतु ‘सनातन प्रभात’ निडरपणे एका धर्मयोद्ध्यासम लढत ताठ मानेने उभा आहे.


हे ही वाचा → दैनिक ‘सनातन प्रभात’च्‍या रौप्‍यमहोत्‍सवी सोहळ्‍यातील वाचकांचे हृदयस्‍पर्शी मनोगत !


‘सनातन प्रभात’ने नेहमीच वैचारिक योद्ध्याची भूमिका बजावली ! – अजय केळकर, विशेष वरिष्‍ठ प्रतिनिधी, दैनिक ‘सनातन प्रभात’

श्री. अजय केळकर

हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेच्‍या कार्यात ‘सनातन प्रभात’ने नेहमीच वैचारिक योद्ध्याची भूमिका बजावली आहे. हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांच्‍या हिंदुहिताच्‍या आंदोलनांना ‘सनातन प्रभात’कडून वैचारिक बळ पुरवले जाते, उदा. गणेशोत्‍सवाच्‍या कालावधीत ‘श्री गणेशमूर्तीचे पाण्‍यात विसर्जन करू नका, प्रदूषण होते’, किंवा होळीच्‍या कालावधीत ‘होळी साजरी करू नका; कारण पाणी वाया जाते’, अशा प्रकारचे आवाहन केले जाते. त्‍याला अनेक हिंदुत्‍वनिष्‍ठ वैध मार्गाने विरोध करतात. याविषयी वृत्ते प्रसिद्ध करण्‍यासह धर्मशास्‍त्र अवश्‍य नमूद करतो. ‘सनातन प्रभात’ने लोकमान्‍य टिळक यांच्‍या ‘केसरी’चा आदर्श समोर ठेवला आहे. वृत्तांच्‍या माध्‍यमातून समाज, राष्‍ट्र आणि धर्म यांवरील आघातांना वाचा फोडून अन् त्‍याविषयी जनआंदोलन उभे करून, हे आघात यशस्‍वीपणे रोखण्‍याची शक्‍ती ‘सनातन प्रभात’मध्‍ये आहे.

उपस्‍थित अन्‍य मान्‍यवरांची नावे…

हिंदुत्‍वनिष्‍ठ श्री. शिवाजी पवार, श्री. तानाजी पवार, सिद्ध समाधी योगाचे आचार्य उमेशजी, श्री संप्रदायाचे श्री. विजय पाटील, मंदिर प्रतिनिधी श्री. आप्‍पासाहेब गुरव, अशोक गुरव, शिवा काशीद यांचे वंशज श्री. आनंदराव काशीद, महाराष्‍ट्र इंजिनिअर्सचे श्री. नितीन वाडीकर, उद्योजक श्री. उदय दुधाणे, श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे श्री. सुरेश यादव, ठाकरे गटाचे श्री. संभाजीराव भोकरे, श्री. राजू यादव.

उपस्‍थित मान्‍यवर

तात्‍यासाहेब दंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिश कुलकर्णी, उद्योजक श्री. सचिन गणेश कुलकर्णी, उद्योजक श्री. रवींद्र ओबेरॉय, ह.भ.प. विठ्ठलतात्‍या पाटील, हिंदुत्‍वनिष्‍ठ श्री. रमेश पडवळ, श्री. चारुदत्त पोतदार, ‘सनातन प्रभात’चे वाचक आणि उद्योजक श्री. प्रभुप्रसाद जांगीड, महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्‍हा उपाध्‍यक्ष श्री. भगवंत जांभळे, हिंदुत्‍वनिष्‍ठ अभिजीत पाटील, हिंदु एकता आंदोलनाचे श्री. राजू तोरसकर, प्रवचनकार श्री. कृष्‍णदेव गिरि