कै. बाळासाहेब विभूते (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) यांचा प.पू. भक्तराज महाराज यांच्याप्रतीचा भाव !
१. दिवसभर भ्रमणभाषवर प.पू. भक्तराज महाराज यांची भजने लावून ठेवणे : ‘माझ्या बाबांनी ((कै.) बाळासाहेब विभूते, आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) आमच्या लहानपणापासून आमच्यामध्ये प.पू. भक्तराज महाराज यांची भजने ऐकण्याची आवड निर्माण केली. ते सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत भ्रमणभाषवर प.पू. भक्तराज महाराज यांची भजने हळू आवाजात लावून ठेवत असत. काही दिवसांनी माझ्या बाबांनी नवीन ‘टेपरेकॉर्डर’ (ध्वनीमुद्रक) आणल्यावर प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनांचा पूर्ण संच (सी.डी.रूपात) आणला. माझे बाबा प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राला प्रतिदिन २ घंटे प्रदक्षिणा घालत नामजपादी उपाय करत असत.
२. घरी समारंभ असल्यास अन्य गाणी न लावता प.पू. भक्तराज महाराज यांची भजने लावणे : आमच्या घरी काही समारंभ असल्यास बाबा प.पू. भक्तराज महाराज यांची भजने लावत असत. बाबांनी आमच्यावर लहानपणापासून प.पू. भक्तराज महाराज यांची भजने ऐकण्याचा संस्कार केला. ते आम्हाला सांगत असत, ‘‘प.पू. भक्तराज महाराज यांच्या वाणीतील चैतन्यामुळे आपल्याला आध्यात्मिक लाभ होतो. आपले मन प्रसन्न रहाते आणि आपली भावजागृती होते. भक्तराज बाबा आपल्याकडून साधनेचे प्रयत्न करून घेतात.’’
३. आम्हाला प.पू. भक्तराज महाराज यांची भजने लावलेली नसतांनाही भजनांचा आवाज ऐकू येत असे. अशी अनुभूती पुष्कळ वेळा आली आहे.
– श्री. अभिजीत विभूते, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
साधकाला ‘प.पू. भक्तराज महाराज सूक्ष्मातून समवेत आहेत’, या संदर्भात येत असलेली प्रचीती !
१. साधकाच्या घरमालकाच्या पत्नीला प.पू. भक्तराज महाराज यांचे दर्शन होणे
१ अ. साधकाच्या घरमालकाने साधकाला ‘सनातनचे कुणीही येथे आलेले चालणार नाही’, असे सांगणे : अनुमाने ४ वर्षांपूर्वी मी आणि माझी पत्नी सौ. जान्हवी फोंडा, गोवा येथे भाड्याने खोली घेऊन रहात होतो. तेथील घरमालकाने आम्हाला सांगितले, ‘‘सनातनचे कुणीही येथे आलेले चालणार नाही.’’ आम्ही दैनिक ‘सनातन प्रभात’ बाहेरून आणत होतो. प्रत्येक २ – ३ दिवसांनंतर मी कामावरून येता-जाता घरमालक मला थांबवून माझ्याशी भांडत असत. ते म्हणत, ‘‘तुम्हाला सांगून कळत नाही का ? सनातनचे कुणी येथे यायला नको.’’ प्रत्यक्षात माझ्याकडे सनातनचे कुणीही साधक येत नव्हते.
१ आ. घरमालकाच्या पत्नीने ‘प्रतिदिन रात्री साधकाकडे धोतर, काळा कोट आणि काळी टोपी घातलेली व्यक्ती येते’,
असे घरमालकाला सांगणे अन् त्याविषयी घरमालकाने साधकाला सांगणे : नंतर घरमालक मला म्हणाले, ‘‘प्रतिदिन रात्री ११ वाजता तुमच्याकडे धोतर, काळा कोट आणि काळी टोपी घातलेली व्यक्ती येते. माझ्या पत्नीने त्यांना पाहिले आहे.’’ ते ऐकून माझ्या डोळ्यांतून भावाश्रू ओघळू लागले. माझ्या बाबांनी माझ्या लहानपणापासून प.पू. बाबांच्या भजनांचा माझ्यावर संस्कार केल्यामुळेच ‘प.पू. भक्तराज महाराज हे सूक्ष्मातून माझ्याकडे येतात’, याची मला पुन्हा अनुभूती आली.
१ इ. मी घरमालकाला सर्व समजावून सांगितल्यावर त्या दिवसापासून ते माझ्याशी प्रेमाने बोलू लागले. ‘हा पालट त्यांच्यामध्ये कसा झाला !’, ते मला समजले नाही.
२. नंतर ३ वर्षांनी प.पू. भक्तराज महाराज यांनी मला मोहमायेच्या पाशातून सोडवून सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करण्याची प्रेरणा दिली आणि तशी कृतीही करून घेतली.
३. मला आताही कधी कधी प.पू. भक्तराज महाराज यांची भजने ऐकू येतात. मला त्यांच्या आवाजातील मार्गदर्शन ऐकू येते. ‘प.पू. भक्तराज महाराज सूक्ष्मातून सतत माझ्या समवेत असतात’, याची मला जाणीव होते.
४. सनातनचे साधक अनुभवत असलेली प.पू. भक्तराज महाराज यांची कृपा
या अनुभूतीतून मला शिकायला मिळाले, ‘प.पू. भक्तराज महाराज सतत सूक्ष्मातून साधकांच्या समवेत असतात. त्यांच्या भजनांमधून साधकांना चैतन्य मिळते आणि ते साधकांना साधनेत साहाय्यही करतात.’
मी प.पू. भक्तराज महाराज यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. अभिजीत विभूते, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.७.२०२४)
|