वर्ष २००२ मध्ये गुजरात येथे झालेल्या गोध्रा जळीतकांडावर आधारित ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट १५ नोव्हेंबरला प्रदर्शित झाला. अयोध्येतून कारसेवकांना घेऊन जाणारी साबरमती एक्सप्रेस गुजरातमधील गोध्रा रेल्वेस्थानकावर धर्मांधांकडून थांबवण्यात आली आणि त्यातील ‘एस् ६’ हा कोच रसायन अन् केरोसीन ओतून पेटवून देण्यात आला. यामध्ये ५९ कारसेवकांचा जिवंत जळून मृत्यू झाला. त्यांचा अक्षरश: कोळसा झाला. यामध्ये महिला आणि लहान मुलेही होती. या जळीतकांडाविषयी प्रथम वेगवेगळे निष्कर्ष काढण्यात आले होते. या जळीतकांडाच्या गुन्हेगारांना अटक करण्यातही काही वर्षे लागली, ३१ जणांना शिक्षा झाली, तर काही पुराव्यांच्या अभावी निर्दाेष सुटले.
१. चित्रपटाचे कथानक
या चित्रपटाचे कथानक एका प्रसिद्ध राष्ट्रीय इंग्रजी वाहिनीभोवती केंद्रित आहे. या वाहिनीवर एक मुलाखत चालू असतांना गोध्रा रेल्वेस्थानकावर एका रेल्वेच्या बोगीला आग लागल्याची घटना घडते. त्यामुळे वाहिनीचे प्रमुख त्वरितच त्या प्रमुख पत्रकार वृत्तनिवेदिकेला तेथे जाण्यास सांगतात. या पत्रकार महिलेसह याच वाहिनीत काम करणारा व्हिडिओ वार्तांकन करणारा हिंदी भाषिक पत्रकारही असतो. संबंधित महिला पत्रकार प्रत्यक्ष गोध्राच्या रेल्वेची बोगी जळलेल्या ठिकाणी जाऊन माहिती गोळा करते. तेव्हा त्याच ठिकाणी आलेल्या एका मोठ्या पक्षाच्या २ नेत्यांमध्ये या प्रकरणाचा राजकीय लाभ उठवून सत्ताधारी पक्षाच्या विरोधात वातावरण निर्माण करण्याची चर्चा होते. या राजकीय पक्षाचा प्रमुख संबंधित वाहिनीच्या मुख्य संपादकांना संपर्क करून कशा प्रकारे या प्रकरणाविषयी लोकांमध्ये विषय जायला पाहिजे, हे सांगतो. त्यानुसार मुख्य संपादक प्रत्यक्ष घटनास्थळी गेलेल्या पत्रकार महिलेला संपर्क साधून काय सांगायचे, ते ‘ब्रीफ’ (विवरण) करतो. नंतर महिला पत्रकार इंग्रजीतून वार्तांकनास प्रारंभ करते. या वार्तांकनात ती ‘हा एक अपघात असून रेल्वेच्या डब्याला आग लागली आणि त्यात प्रवाशांचा मृत्यू झाला. स्थानिक प्रशासन आणि अन्य यंत्रणा ही दुर्घटना रोखण्यास अपयशी ठरली’, असे सांगते. तेव्हा समवेत असलेल्या हिंदी भाषिक पत्रकाराला ती गोष्ट खटकते. या ठिकाणी विटांचा खच, स्थानिकांचे म्हणणे आणि मुख्य म्हणजे या दुर्घटनेत जे वाचले त्यांचे म्हणणे हा पत्रकार रेकॉर्ड करतो. त्यानुसार येथे आग बाहेरून लावली, असे लक्षात येते; मात्र या वाहिनीची मुख्य इंग्रजी भाषिक पत्रकार आणि वृत्तनिवेदिका मात्र याउलट वार्तांकन करत असल्याने त्याला हे चुकीचे आहे अन् सत्य काहीतरी वेगळेच आहे, हे लक्षात येते.
२. सत्याचा शोध घेणारे पत्रकार
हे वार्तांकन घेऊन तो वाहिनीच्या मुख्यालयात पोचतो आणि त्यांना त्याने ‘रेकॉर्ड’ केलेली कॅसेट देतो आणि ती दाखवतो. तेव्हा वाहिनीच्या मुख्य संपादकांनाही या पत्रकाराने अतिशय महत्त्वाची माहिती जीव धोक्यात घालून आणल्याची निश्चिती पटते. पत्रकारालाही त्याने चांगले आणि सत्य माहिती आणण्याचे काम केले, असे वाटते; मात्र दुसर्या दिवशी जेव्हा या वाहिनीवर गोध्रा कांडाविषयी वार्तांकन दाखवले जाते, ते इंग्रजी महिला पत्रकाराचे दिशाभूल करणारे वार्तांकन असते अन् या हिंदी भाषिक पत्रकाराचे वार्तांकन दाखवले जात नाही. यामुळे पत्रकाराला पुष्कळ संताप येतो, तो थेट वाहिनीच्या मुख्य संपादकांना जाब विचारतो. त्यामुळे त्याला तात्काळ कामावरून काढण्यात येते. हा पत्रकार वाहिनीकडे त्याची ‘व्हिडिओ क्लीप’ मागतो, तेव्हा ती क्लीप देण्यात येत नाही आणि हा पत्रकार या क्लीपचा साठा करणार्या वाहिनीतील संग्राहकाला ती पुढील उपयोगासाठी आणि योग्य व्यक्तीपर्यंत पोचण्यासाठी सांभाळून ठेवण्यास सांगतो.
गोध्राकांडाला ५ वर्षे पूर्ण झाल्यावर यातील घायाळांची सध्याची स्थिती दर्शवून पुन्हा सरकारवर आगपाखड करणारा एक कार्यक्रम करायचा ठरतो. यासाठी वाहिनीतील नवीन पत्रकार तरुणीला संधी दिली जाते. ती वेगवेगळ्या क्लिप्स पाहून माहिती संकलित करत असतांना या वाहिनीकडून ५ वर्षांपूर्वी हिंदी भाषिक पत्रकाराने सिद्ध केलेली क्लिप पहाते. या माहितीचे वेगळेपण या नवीन पत्रकार तरुणीला भावते आणि नंतर या कामावरून काढलेल्या; मात्र सत्यनिष्ठ पत्रकाराला ती शोधते अन् नेमके काय झाले ? याची गोध्रा हत्याकांडाच्या ठिकाणी विचारणा करते. या हिंदी भाषिक पत्रकारामध्ये सत्य शोधण्यासाठीची तळमळ अजून जागृत असते. त्यामुळे तो तिला ‘गोध्रा येथे जाऊनच नेमके सत्य शोधूया’, असे सांगतो आणि ते गोध्रा येथे जातात. तेव्हा जळलेल्या बोगीची ते पहाणी करतात, तेव्हा ‘सिगारेटचे थोटूक फेकल्याने आग लागली, असू शकते’, ही शक्यता चुकीची ठरते; कारण एवढ्या गर्दीत सिगारेट पेटवण्यास कुणी देणार नाही आणि पेटवल्यास त्वरित विझवण्यास सांगतील. बोगीमध्ये आग लागल्यावर कारसेवकांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न का केला नाही ? या प्रश्नाचे उत्तर शोधतांना ‘हे डबे बाहेरून तारा लावून बंद करण्यात आलेले असतात’, हे लक्षात येते, तसेच रेल्वेवर प्रथम दगड-विटा यांचा मारा केला जातो. ही रेल्वे ४ घंटे विलंबाने येते, त्याचप्रमाणे २ वेळा साखळी ओढून थांबवण्यात येते. दुसर्या वेळी फलाट सोडल्यावर काही अंतरावर थांबवण्यात येते आणि येथेच आग लावण्यात येते. या रेल्वेला आग लावणारे कोण आहेत ? त्या वेळी नेमके काय झाले ? याचा शोध घेतांना २ कथा (स्टोरी) तेथे प्रसारित करण्यात आल्या आहेत, असे लक्षात येते.
३. असत्याचा भांडाफोड
पहिली कथा ‘फलाटावरील एका मुसलमान मुलीची या डब्यातील काही कारसेवक छेड काढतात. त्यामुळे स्थानिक मुसलमान आणि कारसेवक यांच्यात वाद होतो अन् नंतर फलाटावरील सद्दाम सुपारीवाला हा मुसलमानांना अधिक संख्येत आणून रेल्वे थांबवून डब्याला आग लावतात’, अशी होती. दुसर्या कथेमध्ये ‘फलाटावरीलच एका मुसलमान चहावाल्याचा आणि गाडीतील कारसेवकांचा वाद होतो. त्यामुळे फलाटावरील सद्दाम सुपारीवाला मुसलमानांना गोळा करतो आणि पुढे रेल्वेच्या डब्यांना आग लावतो’, अशी दुसरी कथा होती. तेव्हा प्रत्यक्ष या मुसलमान मुलीला भेटून नेमके काय झाले आणि तिने पोलिसांना का कळवले नाही ? विचारले जाते, तेव्हा तिची कथा खोटी आहे, हे उघड होते. यामध्ये दुसरा एक प्रत्यक्षदर्शी असतो, तो म्हणजे अरुण बर्दा. त्याचाही पत्रकार शोध घेतात, तेव्हा तो सांगतो की, रेल्वेस्थानकावर एका मुसलमान चहावाल्यासमवेत भांडण झाले आणि त्यानंतर एका मुसलमानासह तो पळत स्थानिक वस्तीमध्ये गेल्यावर तेथे २० लिटर पेट्रोलचे अनेक कॅन एका छोट्या टेंपोमध्ये भरण्यात येत असल्याचे लक्षात येते.
रेल्वेस्थानकावरील वाद हा केवळ बनाव होता आणि येथे मोठे काहीतरी घडणार होते. या मुसलमान गुंडांसमवेत तोही जातो, तेव्हा ते रेल्वेच्या डब्यांवर दगडफेक करून त्यांना आग लावत असल्याचे स्वत: पहातो. तेव्हा त्याला धक्का बसतो. या जळीतकांडाचा मुख्य सूत्रधार असलेल्या स्थानिक मुसलमान प्रमुखाला जेव्हा पत्रकार ‘हे तुम्ही का केले ?’ असे विचारतात तेव्हा त्यांना गोध्रामध्ये स्वत:चा दबदबा बनवायचा असतो, स्वत:ला समाजात मोठेपणा मिरवायचा असतो, असे त्याच्या सांगण्यातून लक्षात येते. तेही अशा षड्यंत्रासाठी मुसलमान तरुणांचा बुद्धीभेद करून त्यांच्याकडून या घटना घडवून घेतात आणि मुख्य म्हणजे त्यांना कायदा अन् सुव्यवस्था यांचे कुठलेच भय नसते, हे लक्षात आले.
पत्रकार सत्य माहिती मिळवतात आणि यावर आधारित अहवाल सिद्ध करून नवीन पत्रकार तरुणी जेव्हा ही सर्व खरी माहिती वृत्तवाहिनीवरून देण्यास प्रारंभ करते, तेव्हा तिला ५ वर्षांपूर्वी याच प्रकरणाला अपघात असे संबोधणारी वरिष्ठ महिला पत्रकार थांबवते अन् हे वृत्तवाहिनीच्या धोरणांच्या विरोधात असल्याचे सांगते.
संबंधित हिंदी भाषिक पत्रकार नंतर काही वर्षांनी हिंदी भाषिक वाहिन्या चालू होतात, तेथे वार्तांकन करतांना ही सर्व माहिती सांगतोच आणि ज्या ५९ कारसेवकांचा मृत्यू झाला, त्यांची नावेही सांगतो. त्यामुळे जगाला पहिल्यांदा ही नावे समजतात, जी समजणे अत्यंत आवश्यक असते. गोध्रा हत्याकांड होऊन १५ वर्षांनी ही सर्व वस्तूस्थिती बाहेर येते, ही येथील व्यवस्थेची शोकांतिका आहे. एवढ्या गंभीर गोष्टीचेही राजकारण करून सत्य जनतेपासून अनेक वर्षे लपवून ठेवण्यात आले. या विषयातील अनेक पुरावे नष्ट झाले, ते नष्ट करण्यात आले. त्यामुळे अद्यापही पूर्ण न्याय मिळालेला नाही. एवढी मोठी घटना झाल्यावरही एवढे मोठे सत्य जनतेपासून का लपवून ठेवण्यात आले ? याला उत्तरदायी कोण आहे ? याचा शोध या चित्रपटातून घेतला आहे.
४. भारत आणि हिंदु यांची अपकीर्ती करण्यासाठीच ‘नॅरेटिव्ह’ (कथानक)
देशातील भ्रष्ट व्यवस्थेमुळे मोठी षड्यंत्रे देशात रचली जातात, तरी त्यांच्या मुळाशी यंत्रणा पोचत नाही आणि कुणी पोचण्याचा प्रयत्न केल्यास त्याला दाबले जाते किंवा सत्य शोधणार्या व्यक्तीचा गळा घोटला जातो. त्याचप्रमाणे इंग्रजी वृत्तवाहिन्यांच्या काही माहितीतील फोलपणासुद्धा यातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हिंदु आणि वस्तूनिष्ठ वार्तांकन करण्याच्या ऐवजी चुकीचे वार्तांकन करून त्याद्वारे पैसा मिळवणे, लोकांची दिशाभूल करून वेगळीच माहिती लोकांच्या गळी उतरवणे, ज्याला सध्या ‘नॅरेटिव्ह’ असे म्हणतात. ते काम या इंग्रजी भाषिक वृत्तवाहिन्यांद्वारे गेली काही वर्षे होत असे. त्यातून भारत आणि हिंदु यांची अपकीर्तीही केली जायची.
मुख्य म्हणजे गोध्रा हत्याकांड झाले, तेव्हा सध्याचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे त्यांना घेरण्याचा, अडकवण्याचा या हत्याकांडानंतर उसळलेल्या दंगलीच्या निमित्ताने प्रयत्न झाला होता; मात्र त्यांना आणि काही मंत्र्यांना नानावटी आयोगाने दोषमुक्त ठरवले होते. महत्त्वाचे म्हणजे प्रत्यक्षात तत्कालीन सर्व प्रसारमाध्यमांनी सर्व लक्ष्य गोध्रा हत्याकांडाऐवजी त्यानंतर झालेल्या दंगलीवरच केंद्रीत केले. त्याचेच वार्तांकन अधिक केले. या दंगलीत अल्पसंख्यांकांची कशी हानी झाली ? त्यांचे लोक कसे मारले गेले आणि त्यांना हानीभरपाई लवकर कशी मिळाली पाहिजे, यावरच त्यांचा भर होता.
स्वत: पंतप्रधान मोदी यांनी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर ‘सत्य आता जनतेसमोर येत आहे’, असे चित्रपटाविषयी सांगितले आहे.’
श्री गुरुचरणार्पणमस्तु ।
– श्री. यज्ञेश सावंत, सनातन संकुल, देवद, पनवेल. (२१.११.२०२४)
हिंदूंच्या विरोधातील कथानके उघड होणे आवश्यक !
गुजरात हत्याकांडावरील या चित्रपटाच्या निमित्ताने भारतात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती कोण निर्माण करतो ? ती निर्माण झाल्यानंतर त्याची भीषणता न्यून करण्याचा आणि त्या सूत्रावरून लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न कसा केला जातो ? मुख्य म्हणजे यामध्ये जो पीडित, म्हणजेच हिंदु समाज आहे, त्यालाच पुन्हा कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती खराब करण्यासाठी कसे उत्तरदायी ठरवले जाते, या सर्व स्थितीचा राजकीय लाभ मिळण्यासाठी पुन्हा लोकशाहीच्या स्तंभांचाच कसा उपयोग केला जातो, हे लक्षात येते. वर्षानुवर्षे ती घटना, त्यातील भीषणता कशा प्रकारे दाबण्यात येते आणि त्या कालावधीत अत्याचार करणारा अल्पसंख्यांक समुदाय पुन्हा नवीन गुन्हे करण्यास, नवीन षड्यंत्र रचण्यास कसा मोकळा रहातो, हे लक्षात येते. हा सर्व प्रकार म्हणजे हिंदु आणि हिंदु शासनकर्ते यांविरुद्ध कथानक सिद्ध करून कलंकित करण्याचा प्रयत्न आहे. हा गट २ ते ३ दशकांपासून कार्यरत असलेल्या हिंदूंच्या विरुद्धच्या इकोसिस्टमचा (यंत्रणेचा) मोठा भाग आहे. सध्याच्या काळी प्रचलित असलेला शब्द ‘डीप स्टेट’ यालाही गोध्रा हत्याकांड हे चांगले उदाहरण आहे. चित्रपटात सांगितल्याप्रमाणे या हत्याकांडात मुसलमानांकडून जिवंत जाळल्या गेलेल्या एक-दोन हिंदूंची नावेही कुणाला माहिती नाहीत. दुसरीकडे अखलाक, रोहित वेमुला अशी नावे मात्र मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होतात. काश्मीरमध्ये हिंदूंच्या झालेल्या हत्याकांडातील काश्मिरी हिंदु पंडितांची नावेही देशाला अजून तेवढी माहिती नाहीत, म्हणजे ती जाणीवपूर्वक दाबण्यात आली आहेत.
अशा प्रकारे षड्यंत्र उघड करायला हवे !
‘द कश्मीर फाइल्स’, ‘द केरल स्टोरी’ यानंतर हिंदूंवरील अत्याचार उघड करणारा हा एक चित्रपट म्हणावा लागेल. एवढेच की, यामध्ये चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक यांनी ‘मुसलमानांमध्येही काही चांगले लोक आहेत’, हे चित्रपटातून दाखवून चित्रपट समतोल करण्याचा प्रयत्न केला आहे. हिंदूंच्या संदर्भात झालेले प्रत्येक हत्याकांड, धर्मांधांकडून घडवून आणलेली प्रत्येक दंगल यांविषयी असे चित्रपट सातत्याने प्रदशित झाले पाहिजेत, जेणेकरून झोपलेल्या हिंदु समाजाला त्यांच्याविरुद्ध किती मोठ्या प्रमाणात षड्यंत्र वारंवार रचले जाऊन त्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, हे लक्षात येईल.
– श्री. यज्ञेश सावंत
संपादकीय भूमिका :झोपलेल्या हिंदु समाजाला त्याच्याविरुद्ध किती मोठ्या प्रमाणात षड्यंत्र वारंवार रचले जात आहे, हे चित्रपटाच्या माध्यमातून उघड करणे आवश्यक ! |