Ukraine Fires British Missile On Russia : रशियाकडून प्रत्‍युत्तरादाखल युक्रेनवर आंतरखंडीय क्षेपणास्‍त्रांचा मारा

  • रशियाच्‍या चेतावणीनंतरही युक्रेनकडून रशियावर ब्रिटनकडून मिळालेल्‍या क्षेपणास्‍त्रांचा मारा

  • तिसरे महायुद्ध प्रारंभ होण्‍याची शक्‍यता

  • युरोपीय देशांमध्‍ये भीतीचे वातावरण

कीव (युक्रेन) – युक्रेनने २० नोव्‍हेंबरला रशियाच्‍या आतील भागात ब्रिटनकडून मिळालेल्‍या लांब पल्‍ल्‍याच्‍या क्रूझ क्षेपणास्‍त्रांचा मारा केल्‍यानंतर रशियाने दुसर्‍या दिवशी त्‍याला प्रत्‍युत्तर दिले आहे. रशियाने पहिल्‍यांदाच युक्रेनवर आंतरखंडीय बॅलिस्‍टिक क्षेपणास्‍त्राद्वारे आक्रमण केले. हे क्षेपणास्‍त्र ५ सहस्र ५०० किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर आक्रमण करू शकते. हे विशेषतः अण्‍वस्‍त्रेे प्रक्षेपित करण्‍यासाठी वापरले जाते. युक्रेनच्‍या वायूदलाने या आक्रमणाला दुजोरा दिला.

१. विशेष म्‍हणजे एक दिवस आधीच रशियाचे राष्‍ट्राध्‍यक्ष पुतिन यांनी या संदर्भात चेतावणी दिली होती. प्रसारमाध्‍यमांच्‍या वृत्तानुसार युक्रेनच्‍या उत्तरेला असलेल्‍या रशियाच्‍या कुर्स्‍क प्रदेशात स्‍टॉर्म शॅडो क्षेपणास्‍त्राचे अवशेष सापडले आहेत. येयस्‍क आणि दक्षिण क्रास्नोडार प्रदेशातील बंदरावर ‘एस्-४००’ या क्षेपणास्‍त्रविरोधी प्रणालीद्वारे स्‍टॉर्म शॅडो क्षेपणास्‍त्रेेही अडवण्‍यात आली.

२. अलीकडेच अमेरिकेने युक्रेनला त्‍याची लांब पल्‍ल्‍याची क्षेपणास्‍त्रेे वापरण्‍याची अनुमती दिली. अमेरिकेच्‍या या मान्‍यतेनंतर युक्रेनचे सैन्‍य रशियाच्‍या अंतर्गत भागांना आणि सैनिकी तळांना लक्ष्य करण्‍यात यशस्‍वी झाले आहे, ज्‍यामुळे रशिया-युक्रेन युद्धाची संपूर्ण परिस्‍थिती पालटू शकते. आतापर्यंत कमकुवत वाटत असलेल्‍या युक्रेनला कदाचित् मोठी आघाडी मिळू शकेल. म्‍हणूनच रशियाचे राष्‍ट्राध्‍यक्ष व्‍लादिमीर पुतिन यांनी याबद्दल चेतावणी दिली होती.

३. ‘जर आमच्‍यावर मोठ्या प्रमाणात आक्रमणे झाली, तर त्‍याचे गंभीर परिणाम होतील’, असे पुतिन यांनी म्‍हटले होते. यासह रशियाने त्‍याच्‍या आण्‍विक धोरणात पालट करत रशियावर मोठे हवाई आक्रमण झाल्‍यास रशिया अण्‍वस्‍त्रे वापरू शकतो, असा नियम करण्‍यात आला. तसेच रशियाचे माजी पंतप्रधान मेदवेदेव यांनीही ‘तिसरे महायुद्ध प्रारंभ झाले आहे’, असे विधान केले.

४. यानंतर युरोपमध्‍ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक देशांनी त्‍यांच्‍या सैन्‍याला सिद्ध रहाण्‍याचा आदेश देण्‍यासह नागरिकांना अन्‍नधान्‍याचा साठा करण्‍याचाही सल्ला दिला आहे. तसेच युक्रेनची राजधानी कीव येथील अमेरिकेचे दूतावास बंद करण्‍यात आले.

बॅलिस्‍टिक क्षेपणास्‍त्रे कशा प्रकारे कार्य करतात ?

रशियाकडून या युद्धामध्‍ये बॅलिस्‍टिक क्षेपणास्‍त्रे वापरण्‍यात येत आहेत. ही अधिक शक्‍तीशाली आहेत. ती मोठ्या नौकांतून किंवा अन्‍य उपकरणांद्वारे विशिष्‍ट ठिकाणाहून सोडली जातात. बॅलेस्‍टिक क्षेपणास्‍त्रे क्रूझ क्षेपणास्‍त्रांपेक्षा आकाराने मोठी असतात. ही क्षेपणास्‍त्रे क्रूझ क्षेपणास्‍त्रांपेक्षा अधिक वजनदार बाँब वाहून नेऊ शकतात. ती प्रक्षेपित केल्‍यानंतर बॅलेस्‍टिक क्षेपणास्‍त्रे हवेत चंद्रकोराच्‍या आकाराच्‍या मार्गाने प्रवास करतात. रॉकेटशी त्‍यांचा संपर्क तुटताच, त्‍यातील बाँब गुरुत्‍वाकर्षणामुळे भूमीवर पडतो.
बॅलिस्‍टिक क्षेपणास्‍त्रे सामान्‍यत: आण्‍विक शस्‍त्रे वाहून नेण्‍यासाठी वापरली जातात.