‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
‘सकारात्मक किंवा नकारात्मक स्पंदने असलेली विभूती आज्ञाचक्राच्या ठिकाणी म्हणजे दोन भुवयांच्या मध्ये लावल्याने व्यक्तीच्या सूक्ष्म-ऊर्जेवर काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. ‘लेखाच्या मागील भागात आपण ‘सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्ही प्रकारची स्पंदने असलेली विभूती लावल्याने व्यक्तीच्या सूक्ष्म-ऊर्जेवर काय परिणाम होतो?’, हे पाहिले. आता लेखाच्या शेवटच्या भागात ‘सकारात्मक स्पंदने असलेली विभूती लावल्याने व्यक्तीच्या सूक्ष्म-ऊर्जेवर काय परिणाम होतो ?’ ते पाहूया.
(भाग ३)
या लेखातील मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/852870.html
२ इ. ‘विभूती क्र. ३’ (सकारात्मक स्पंदने असलेली विभूती) लावल्याचा सर्वांवर पुष्कळ सकारात्मक परिणाम होणे आणि तो अनुमाने १ घंटा टिकून रहाणे
वरील नोंदींच्या तुलनात्मक अभ्यासातून पुढील सूत्रे लक्षात आली.
१. विभूती लावल्यानंतर तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या व्यक्तीतील नकारात्मक ऊर्जा पुष्कळ न्यून झाली. विभूती लावल्यानंतर १५ मिनिटांनी तिच्यातील नकारात्मक ऊर्जा आणखी न्यून झाली आणि तिच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली.
२. विभूती लावल्यानंतर अन्य ३ व्यक्तींमधील नकारात्मक ऊर्जा पुष्कळ न्यून झाली आणि त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा वाढली. विभूती लावल्यानंतर १५ मिनिटांनी तिघांतील नकारात्मक ऊर्जा नाहीशी झाली आणि त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा पुष्कळ वाढली.
३. बालसंतांमध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही. विभूती लावल्यानंतर त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा वाढली. विभूती लावल्यानंतर १५ मिनिटांनी त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा आणखी वाढली.
४. सर्वांवर विभूतीचा सकारात्मक परिणाम विभूती लावल्यानंतर १५ मिनिटांनी पूर्णपणे दिसून आला.
५. या विभूतीचा सकारात्मक परिणाम सर्वांवर अनुमाने १ घंटा टिकला.
निष्कर्ष : सकारात्मक स्पंदने असलेली विभूती लावल्यावर सर्वांच्या सूक्ष्म-ऊर्जेवर पुष्कळ सकारात्मक परिणाम झाले आणि ते अनुमाने १ घंटा टिकून राहिले. यातून ‘विभूतीतील सात्त्विकतेमुळे व्यक्तीला आध्यात्मिकदृष्ट्या केवढा लाभ होतो’, हे लक्षात येते. ‘विभूती लावणे’, ही कृती करायला केवळ काही सेकंदच लागतात; पण तिचा परिणाम मात्र १ घंट्याहून अधिक काळ टिकून रहातो. हे वैशिष्ट्यपूर्ण आहे.
वाचकांना सूचना
‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’ या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.
३. प्रयोगात सहभागी झालेल्या ४ व्यक्ती आणि बालसंत यांना प्रत्येक विभूती लावल्यावर जाणवलेली सूत्रे
पुढील सूत्रांतून ‘आज्ञाचक्राच्या ठिकाणी विभूती लावणे या छोट्याशा कृतीचा व्यक्तीवर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम आणि त्याचे स्वरूप कसे असते ?’, याची काही अंशी कल्पना येईल.
टीप १ – ‘वाईट शक्तींचा तीव्र त्रास असलेली व्यक्ती एखाद्या सात्त्विक वस्तूच्या संपर्कात आली की, तिला त्रास देणार्या वाईट शक्तीला ती सात्त्विकता सहन होत नाही. त्यामुळे व्यक्तीला अस्वस्थ वाटणे, नकारात्मक विचार वाढणे अशा स्वरूपाचे त्रास होतात. याउलट वाईट शक्तींचा त्रास असलेली व्यक्ती एखाद्या असात्त्विक वस्तूच्या संपर्कात आली की, तिला त्रास देणार्या वाईट शक्तीला तिच्यातून (असात्त्विक वस्तूमधून) त्रासदायक (काळी) शक्ती मिळत असल्याने तिला सुखावह वाटते.’
टीप २ – ‘आध्यात्मिक त्रास नसलेली व्यक्ती एखाद्या सात्त्विक वस्तूच्या संपर्कात आली की, चैतन्यामुळे तिच्यावरील त्रासदायक (काळे) आवरण न्यून किंवा नाहीसे होण्याची प्रक्रिया आरंभ होते. त्यामुळे प्रारंभी तिला उष्णता जाणवते किंवा तिच्यातून उष्णता बाहेर पडत असल्याचे तिला जाणवते. तिच्यावरील आवरण न्यून किंवा नाहीसे होऊन तिला चैतन्य मिळू लागते, तेव्हा तिला गारवा जाणवतो किंवा मनाला शांतता जाणवते.’
४. विभूतीवर त्रासदायक स्पंदनांचे आवरण नसल्याची निश्चिती करून मगच ती वापरणे श्रेयस्कर !
सध्याचे वातावरण अत्यंत रज-तमप्रधान आहे. याचा परिणाम विभूतीवर होऊन तिच्यावर त्रासदायक स्पंदनांचे आवरण येण्याची शक्यता असते. हे लक्षात घेऊन विभूती वापरण्यापूर्वी तिच्यात चैतन्य टिकून आहे ना ? याची निश्चिती करून मगच तिचा उपयोग करावा.
४ अ. ‘विभूतीवर आवरण आले आहे का ?’, हे कसे ओळखावे ? : विभूती हातात घेतल्यावर मनाला ‘चांगल्या संवेदना जाणवणे, नामजप चालू होणे, मनाला हलकेपणा जाणवणे इत्यादी जाणवले’, तर ‘विभूतीवर आवरण नाही’, असे समजावे. याउलट विभूती हातात घेतल्यावर मनाला ‘त्रासदायक संवेदना जाणवणे, नामजप बंद पडणे, दाब जाणवणे’ इत्यादी जाणवले, तर ‘विभूतीवर आवरण आहे’, असे समजावे.
४ आ. विभूतीवरील आवरण काढून मगच तिचा उपयोग करावा ! : विभूतीवर आवरण आले असल्यास ती थोडा वेळ उन्हात ठेवावी जेणेकरून तिच्यावरील आवरण दूर होईल. विभूतीवर पुष्कळ अधिक आवरण असेल आणि ते दूर होत नसेल, तर मात्र ती विसर्जित करावी.’
(समाप्त)
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (७.९.२०२४)
इ-मेल : [email protected]
ज्ञानप्राप्तकर्ता साधक श्री. राम होनप यांना सौ. मधुरा कर्वे यांनी विचारलेला प्रश्न
प्रश्न
‘विभूती क्र. १’ मध्ये (नकारात्मक स्पंदने असलेल्या विभूतीमध्ये) सकारात्मक ऊर्जा काहीच नसून नकारात्मक ऊर्जा आहे. या विभूतीचे सर्वांच्या सूक्ष्म-ऊर्जेवर नकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून आले, तसेच तो परिणाम १ घंटा टिकून होता. असे असूनही प्रयोगातील व्यक्ती आणि बालसंत यांना मात्र या विभूतीच्या संदर्भात चांगल्या अनुभूती आल्या आहेत. याचे कारण काय ?
उत्तर
विभूतीत नकारात्मक स्पंदने असूनही प्रयोगातील व्यक्ती आणि बालसंत यांना विभूतीच्या संदर्भात चांगल्या अनुभूती येण्यामागील कारणे
१. ‘प्रयोगाच्या वेळी प्रयोगातील व्यक्ती आणि बालसंत यांचा विभूतीविषयी ‘विभूती देव किंवा गुरु यांची आहे’, असा भाव होता. साधना करणार्या जिवांवर प्रत्येक गोष्टीत देव किंवा गुरु पहाण्याचा संस्कार झालेला असतो. त्यानुरूप ते कृती करत असतात. अशा प्रसंगी ‘ती विभूती चांगली कि वाईट ?’, असा विचार न करता ते त्याविषयी भाव किंवा श्रद्धा ठेवून ती ग्रहण करत असतात. तेव्हा त्यांचा जीवात्मा भगवंताच्या अनुसंधानात असतो. परिणामी त्यांच्यावर नकारात्मक स्पंदने असलेल्या विभूतीचा परिणाम होत असला, तरी अशा जिवांना चांगल्या अनुभूती येतात.
२. नकारात्मक स्पंदने असलेल्या विभूतीविषयी भाव किंवा श्रद्धा ठेवून ती ग्रहण केल्याने तिच्यातील नकारात्मक स्पंदनांचा परिणाम व्यक्तीचे शरीर आणि मन येथपर्यंत पोचतो; मात्र तिच्या अंतर्मनावर परिणाम होत नाही; कारण तिचे अंतर्मन भगवंताच्या स्मरणात असते. याउलट भाव न ठेवता नकारात्मक विभूती ग्रहण केल्यास तिच्यातील नकारात्मक स्पंदनाचा दुष्परिणाम व्यक्तीचे शरीर, मन आणि अंतर्मन यांवर होत असतो.
३. व्यक्तीला ‘विभूती चांगली किंवा त्रासदायक आहे ?’, हे ओळखता येत नसल्यास तिने ती नामजपासहित किंवा भावपूर्णरित्या ग्रहण केल्यास विभूतीतील नकारात्मक स्पंदनांचा दुष्परिणाम न्यून होतो आणि विभूतीत सकारात्मक स्पंदने असल्यास व्यक्तीला तिचा पुष्कळ आध्यात्मिक लाभ होतो.’
– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.९.२०२४)
|