तमिळनाडू पोलिसांच्या मोगलाईला मद्रास उच्च न्यायालयाचा चाप !
चेन्नई – तमिळनाडूतील विधुनगर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयातून उचलून नेलेला भारतमातेचा पुतळा आता चेन्नई पोलिसांना भाजप कार्यालयात परत करावा लागणार आहे. या प्रकरणी सुनावणी करतांना मद्रास उच्च न्यायालयाने हा आदेश दिला आहे. एखाद्याच्या खासगी जागेवरून अशा प्रकारे पुतळा काढून टाकणे हा ‘अत्याचारा’चा प्रकार असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आणि तो पुतळा त्याच्या मालकाला परत करावा, असे आदेशात म्हटले आहे.
१. न्यायमूर्ती एन्. आनंद व्यंकटेश यांनी या प्रकरणावर सुनावणी करतांना सांगितले की, एखाद्याच्या खासगी जागेवर जाऊन अशा प्रकारे कोणतीही मालमत्ता काढून घेणे हा राज्याचा अधिकार नाही. भविष्यातही असे करण्याची अनुमती नाही. कदाचित् कुणीतरी त्यांच्यावर असे करण्यासाठी दबाव आणला असेल; परंतु हे अत्यंत निषेधार्ह आहे.
२. हा पुतळा वर्ष २०१६ मध्ये भाजप कार्यालयात आणण्यात आला होता; मात्र गेल्या वर्षी पोलिसांनी हा पुतळा हटवला होता. त्या वेळी पोलिसांनी पुतळा हटवतांना न्यायालयाच्या निर्देशांचा हवाला दिला होता. त्यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष जी. पांडुरंगन् यांनी या संदर्भात न्यायालयात जाऊन पुतळा त्यांना परत करावा, अशी मागणी केली होती.