Maharashtra Assembly Election 2024 : महायुती आल्यास वाढवण विमानतळाचा निर्णय घेऊ ! – पंतप्रधान

  • महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४

  • काँग्रेस सत्तेत आल्यास ‘लाडकी बहीण योजना’ बंद होईल, असा आरोप !

आचारसंहिता संपताच, वाढवण येथील विमानतळाबाबत देखील निर्णय घेऊ असं पंतप्रधान मोदींचे धुळे येथे आश्वासन !

धुळे : इलेक्ट्रॉनिक वाहन परियोजना, स्टील प्रकल्प, ग्रीन प्रकल्प असे प्रकल्प राज्यातील वेगवेगळ्या भागात स्थापित केले जात आहेत. महाराष्ट्रात वाढवण येथे बंदर होत आहे. वाढवण बंदराच्या उद्घाटनाच्या वेळी मी आलो होतो, तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, ‘‘एवढे सर्व करत आहात, तर तिथे एक विमानतळही द्या.’ जेव्हा राज्यात महायुतीचे सरकार येईल, आचारसंहिता संपेल, तेव्हा वाढवण येथील विमानतळाविषयी निर्णय घेऊ, असे आश्‍वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची देशभरात चर्चा आहे. काँग्रेसचे लोक योजना बंद करण्यासाठी न्यायालयात गेले. त्यांना सत्ता मिळाली, तर ही योजना ते बंद करतील, असा आरोपही पंतप्रधानांनी केला.

पंतप्रधान म्हणाले…,

१. शेतकर्‍यांना सध्या ‘नमो शेतकरी’चे ६ सहस्र रुपये आणि ‘पीएम् किसान योजने’चे १२ सहस्र रुपये मिळत आहेत. महायुतीचे सरकार आल्यास ही रक्कम १२ सहस्रांवरून १५ सहस्र रुपये करण्यात येतील.

२. मातृभाषा आपली आई असते. आम्ही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला. अनेक वर्षांचे हे स्वप्न आमच्या शासनानेे पूर्ण केले. काँग्रेसची राज्यात आणि केंद्रात सत्ता होती; पण त्यांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याची आवश्यकता वाटली नाही.

३. विकसित महाराष्ट्र आणि विकसित भारताचा आधार महायुतीचा वचननामा होईल.

४. मागील १० वर्षांत महिलांसाठी पुष्कळ योजना आणल्या. आज प्रत्येक ठिकाणी महिला केंद्रस्थानी आहेत. महायुती सरकारने आईचे नाव अनिवार्य केले आहे. सर्वांनी या निर्णयाचे स्वागत केले. महिलांचे सामर्थ्य वाढत आहे, मुलींना रोजगार मिळत आहे. महिला सशक्तीकरणासाठी आमचे सरकार पावले उचलत आहे, ते विरोधकांना सहन होत नाही.