गडचिरोलीतील मानवावरील वाघांची आक्रमणे रोखण्यासाठी ३ महिन्यांत आराखडा सिद्ध करा ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – गडचिरोली जिल्ह्यात व्याघ्र आक्रमणातील मनुष्यहानी टाळण्यासाठी परिस्थितीचा तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करून तातडीने विशेष उपाययोजना राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यामध्ये गेल्या ५ वर्षांत व्याघ्र आक्रमणातील मृत्यूमुखींच्या कुटुंबियांना विशेष हानीभरपाई देणे, अतिरिक्त वाघांचे स्थलांतर आदींचा समावेश असून त्याचा अहवाल ३ महिन्यांत देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. (असे निर्देश देण्याची वेळ का येते ? – संपादक)

यासाठी ‘मित्रा संस्थे’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली आराखडा सिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार श्री. परदेशी यांनी नागपुरात वरिष्ठ वन अधिकार्‍यांची बैठक घेऊन उपाययोजनांवर चर्चा केली आणि त्यावर कार्यवाहीचे निर्देश दिले. धोकाग्रस्त आणि संवेदनशील क्षेत्राचे सौम्यीकरण (मिटीगेशन) आराखडा सिद्ध करण्याविषयी चर्चा केली. मानव आणि वन्यजीव संघर्षात आढळणारे वाघ हे वयस्कर आहेत. त्यांच्या स्थलांतर संदर्भातही धोरणात्मक निर्णय घेण्याचे आवश्यक असल्याचे मत या वेळी मांडले. या बैठकीस राज्याच्या प्रधान मुख्य वन संरक्षक (वन बल प्रमुख) शोमिता बिस्वास, अपर प्रधान मुख्य वन संरक्षक विवेक खांडेकर, ‘ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पा’चे मुख्य वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक डॉ. रामचंद्र रामगावकर आदी उपस्थित होते.