नरक भयापासून मुक्त होण्यासाठी पहाटे तीळतेलाचा अभ्यंग करून स्नान करावे. रात्रीच्या शेवटच्या प्रहरापासून चंद्रोदयापर्यंतचा काळ श्रेष्ठ आहे. स्नान करतांना अपामार्ग (आघाडा) वनस्पतीने प्रोक्षण, स्नानोत्तर यमतर्पण आणि दुपारी ब्राह्मणभोजन करावे. प्रदोषकाळी घराबाहेर सर्वत्र दिवे लावावेत. या दिवसाची पौराणिक कथा अशी, ‘प्राग्ज्योतिषपूरचा (आताचे आसाम) राजा नरकासुर याला भूदेवीकडून वैष्णवास्त्र प्राप्त झाले. त्यामुळे तो उन्मत्त झाला. तिन्ही लोकांवर राज्य मिळावे; म्हणून त्याने २० सहस्र कुमारिकांचा बळी देणारा ‘नारीमेध’ यज्ञ करायचा ठरवला. १६ सहस्र १०८ मुलींना त्याने डांबून ठेवले होते. इंद्राने श्रीकृष्णाची प्रार्थना केली. श्रीकृष्णाने सत्यभामेसह त्यावर आश्विन कृष्ण चतुर्दशीला स्वारी करून त्याला ठार केले. मरतांना त्याने कृष्णाची क्षमा मागून वर मागितला, ‘जे कुणी या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करतील, त्यांना नरकाची पीडा होऊ नये.’ श्रीकृष्णाने ‘तथास्तु’ म्हणून त्याचा वध केला आणि त्या कुमारिकांची सुटका केली. त्यामुळे त्या घटनेची आठवण म्हणून नरकासुराचे प्रतीक मानले गेलेले कारीट नावाचे कडू फळ स्नानाआधी पायाने फोडतात. ते फुटले, म्हणजे नरकासुराचा नाश झाला, असे मानतात. त्या हत्येच्या पापक्षालनासाठी अभ्यंगस्नान करतात. स्नानानंतर नवे कपडे घालून वडीलधार्यांना नमस्कार करतात. देवाला नैवेद्य दाखवून फराळ करतात. हा फराळही सकाळी लवकर करतात.
– डॉ. ज्योत्स्ना खरे