दीपावली विशेष !
अलीकडेच प्रकाशित संशोधन अहवालानुसार भारतात सुमारे ४४ टक्के मानवी शल्यकर्म खोट्या किंवा आवश्यकता नसतांनाही केल्या जातात. याचा अर्थ रुग्णालयांमध्ये केली जाणारी जवळजवळ अर्धी शल्यकर्मे केवळ रुग्णाचे किंवा शासनाचे पैसे लुबाडण्यासाठी केल्या जातात. मृत रुग्णांना जिवंत दाखवून त्यांच्यावर उपचार करण्याच्याही घटना घडतात. अशा घटनांविषयी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ या वृत्तपत्राने एक अहवाल प्रकाशित केला आहे. रुग्णांकडून अधिक पैसे उकळण्यासाठी केला जाणारा हा अत्यंत घृणास्पद प्रकार आहे. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे ‘कट प्रॅक्टिस !’ ‘कट प्रॅक्टिस’ म्हणजे काय ?, तर ‘हेच औषध घ्या’, ‘अमुक एक ठिकाणीच तपासणी करा’, असे सांगून ठराविक आधुनिक वैद्यांकडे वा ठराविक प्रयोगशाळेत पाठवले जाते. ‘आपली औषधे डॉक्टरांनी विकावीत’, अशी अट आस्थापनांकडून घातली जाते आणि त्या आधुनिक वैद्याला आर्थिक लाभ दिला जातो. आधुनिक उपचारपद्धतीत अशा प्रकारे भ्रष्टाचार बोकाळला आहे. सध्या प्रचंड वाढलेले रोगांचे प्रमाण आणि आयुर्वेदाचे लक्षात येत असलेले महत्त्व यांमुळे भारतीय आज परत आयुर्वेद उपचारांकडे वळत आहेत.
आयुर्वेद ही सर्वांत प्राचीन चिकित्साप्रणाली स्वतः भगवान धन्वन्तरि यांची देणगी आहे. आश्विन कृष्ण द्वादशीच्या दिवशी देवतांचे वैद्य ‘धन्वन्तरि देवता’ यांची जयंती ! ‘धन्वन्तरीचा जन्म हा देव आणि राक्षस यांनी केलेल्या समुद्रमंथनातून झाला. चार हस्त असलेले भगवान धन्वन्तरि एका हातात ‘अमृत कलश’, दुसर्या हातात ‘जळू’, तिसर्या हातात ‘शंख’ आणि चौथ्या हातात ‘चक्र’ घेऊन समुद्रमंथनातून बाहेर आले. या सर्वांचा उपयोग करून अनेक व्याधी वा रोग यांना बरे करण्याचे काम भगवान धन्वन्तरि करतात. एका रोगावर अनेक औषधी आणि सर्वोत्तम प्रकारची रोगचिकित्सा यांत प्रवीण अन् वैद्यकशास्त्रात निपुण असे हे दैवतांचे वैद्य, म्हणजे स्वतः देवच ! बहुतांश वैद्य धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वन्तरीचे पूजन करतात. आरोग्यसंपन्न व्यक्तीचे आरोग्य राखणे आणि रोगी व्यक्तीच्या रोगांचे निर्मुलन करणे, हे आयुर्वेदाचे ध्येय आहे. यात शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्य कसे राखावे ? याचे मार्गदर्शन आहे. आयुष्याला हितकर आणि अहितकर आहार-विहार, आचार यांचे विवेचन आहे. मानवी आयुष्याचे ध्येय आणि खरे सुख कशात आहे ? याचाही विचार आहे. रोग होऊ नयेत म्हणून उपाय आहेत. याच नव्हे, तर पुढील जन्मांतही रोगमुक्त राहून जीवनाचे अंतिम ध्येय, म्हणजे परब्रह्माची अनुभूती कशी घ्यावी ? हेही आयुर्वेद सांगतो !
– श्री. नीलेश पाटील, जळगाव