‘मी शाळेला सुटी असतांना मिरज आणि रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेले होते. तेव्हा मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. मिरज आश्रमात गेल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
१ अ. पू. जयराम जोशी (पू. आबा) भेटल्यावर भाव जागृत होणे आणि ‘आता केवळ साधना करायची आहे आणि देवाशी एकरूप व्हायचे आहे’, असे वाटणे : ‘मी मिरज आश्रमात गेल्यावर माझी पू. जयराम जोशीआजोबा (पू. आबा, सनातनचे ५१ वे संत, वय ८६ वर्षे)) यांच्याशी भेट झाली. पू. आबा मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सारखेच दिसत होते. मला त्यांचा चेहरा आनंदी आणि चैतन्यमय वाटत होता. ते मला प्रसाद देत असतांना मला त्यांच्या डोळ्यांत प्रीती जाणवली. त्या वेळी माझा भाव जागृत झाला आणि मला वाटले, ‘आता केवळ साधना करायची आहे आणि देवाशी एकरूप व्हायचे आहे.’
१ आ. पू. आबांना भेटल्यावर मला पुष्कळ सकारात्मक वाटले. मला हलकेपणा जाणवला. त्याआधी मला आई-बाबांची आठवण येऊन अस्वस्थ वाटत होते; पण पू. आबांना भेटल्यानंतर मला पुष्कळ चांगले वाटू लागले.
२. रामनाथी आश्रमात असतांना आलेल्या अनुभूती
२ अ. पू. भार्गवराम भरत प्रभु (सनातनचे पहिले बालसंत, वय ७ वर्षे) यांच्याशी खेळणे
२ अ १. पू. भार्गवराम प्रभु यांच्याशी खेळतांना ‘श्रीकृष्णाच्या समवेत खेळत आहे’, असे जाणवणे : ‘रामनाथी आश्रमात पू. भार्गवराम (सनातनचे पहिले बालसंत, वय ७ वर्षे) आमच्या समवेत खेळायला येत असत. मला त्यांच्या समवेत खेळतांना चांगले वाटत असे. मी पू. भार्गवराम यांच्याशी खेळतांना ‘श्रीकृष्णाच्या समवेतच खेळत आहे’, असे मला जाणवत असे.
२ अ २. पू. भार्गवराम यांनी ‘आपण पूर्वी भेटलो आहोत’, असे म्हटल्यावर आश्चर्य वाटणे आणि एका साधकाने ‘पू.
भार्गवराम यांनी तुला सूक्ष्मातून पाहिले असेल आणि सूक्ष्मातून तुमची भेट झाली असेल’, असे सांगितल्यावर पू. भार्गवराम यांच्या प्रती कृतज्ञता वाटणे : एकदा आम्ही खेळत असतांना पू. भार्गवराम मला म्हणाले, ‘‘मी तुला या आधी पाहिले आहे. आपण भेटलो आहोत. मी प्रथमच आश्रमात आलो असतांना तुला पाहिले होते.’’ त्यांचे बोलणे ऐकून मला आश्चर्य वाटले. तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘आता मी प्रथमच पू. भार्गवराम यांना भेटत आहे. वर्ष २०१६ मध्ये मी ५ वर्षांची असतांना पहिल्यांदा आश्रमात आले होते. त्या वेळी पू. भार्गवराम यांचा जन्मही झाला नव्हता. मग त्यांनी मला कसे काय पाहिले असेल ?’’ त्या वेळी माझ्या समवेत असलेला श्रीवल्लभ जोशीदादा म्हणाला, ‘‘पू. भार्गवराम यांनी तुला सूक्ष्मातून पाहिले असावे आणि सूक्ष्मातून तुमची भेट झाली असावी.’’ हे ऐकून मला पू. भार्गवराम यांच्या प्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली.
२ आ. ‘देव मनोलय करत आहेत आणि ईश्वरेच्छेने रहायला शिकवत आहेत’, असे लक्षात येणे आणि धान्य निवडण्याची सेवा करतांना आनंद मिळणे : रामनाथी आश्रमात आल्यावर आरंभी मला धान्य निवडण्याची सेवा दिली जात असे. मला ती सेवा करायला कंटाळा येत असे. मी साधकांना सेवा विचारायला गेल्यावर ते मला धान्य निवडण्याची सेवा देत असत. तेव्हा १ – २ वेळा माझ्या मनात ‘मला नेहमी हीच सेवा का मिळते ?’, अशी प्रतिक्रिया आली. त्यानंतर ३ – ४ दिवसांनी माझ्या लक्षात आले, ‘देवच माझा मनोलय करत आहे आणि मला स्वेच्छेने नाही, तर ईश्वरेच्छेने रहायला शिकवत आहेत.’ त्यानंतर मला धान्य निवडण्याची सेवा करतांना आनंद मिळू लागला.
‘हे श्रीकृष्णा आणि हे गुरुमाऊली, तुम्हाला अपेक्षित अशी साधना तुम्हीच माझ्याकडून करून घ्या अन् मला तुमच्या चरणांजवळ ठेवा’, अशी तुमच्या चरणी संपूर्ण शरण जाऊन प्रार्थना करत आहे.’
– कु. कार्तिकी अश्विन ढाले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय १३ वर्षे), नागपूर (२२.९.२०२४)
|