|
नवी देहली – काश्मिरी हिंदु समुदाय स्पष्टपणे सांगतो की, ओमर अब्दुल्ला किंवा त्यांचा पक्ष ‘नॅशनल कॉन्फरन्स’ यांच्याकडून आम्हाला कसल्याही अपेक्षा नाहीत. काश्मिरी हिंदू मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना कधीच क्षमा करणार नाहीत. ज्या पक्षाने अनेक दशके पद्धतशीरपणे आमचा वंशविच्छेद होऊ दिला, तोच पक्ष आजही आमच्या वेदनांचा आणि वारशाचा अपमान करत आहे.
ओमर अब्दुल्ला यांनी त्यांचे वडील फारुक अब्दुल्ला आणि आजोबा शेख अब्दुल्ला यांच्याप्रमाणेच काश्मिरी हिंदूंकडे पाठ फिरवली आहे. आम्ही यापुढे गप्प बसणार नाही, अशी रोखठोक भूमिका ‘यूथ फॉर पनून कश्मीर’ या काश्मिरी हिंदूंना काश्मीर खोर्यात वसवण्यासाठी कार्यरत असलेल्या संघटनेने घेतली. १६ ऑक्टोबरला ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या पार्श्वभूमीवर संघटनेच्या वतीने प्रसिद्धीपत्रक प्रसारित केले.
प्रसिद्धीपत्रकातील महत्त्वपूर्ण सूत्रे –
१. ‘नॅशनल कॉन्फरन्स’ने काश्मिरी हिंदूंचा केलेला विश्वासघात ऐतिहासिक !
‘नॅशनल कॉन्फरन्स’ने काश्मिरी हिंदूंचा केलेला विश्वासघात ऐतिहासिक आहे. तथाकथित ‘काश्मीरचा सिंह’ असलेले शेख अब्दुल्ला यांनी त्यांच्या फुटीरतावादी राजकारणाने हिंदु समाजाला जाणीवपूर्वक उपेक्षित आणि वंचित ठेवले. त्यांच्या नेतृत्वाने छळाचा पाया रचला. या सगळ्याचे पर्यावसान आमच्या पलायनात झाले.
२. फारुख अब्दुल्ला यांच्या देखरेखीखाली काश्मिरी हिंदूंना पलायन करावे लागले !
वर्ष १९९० मध्ये जेव्हा खोर्यात जिहादी आतंकवादाने थैमान घातले आणि काश्मिरी हिंदूंना अकल्पनीय भीषणतेचा सामना करावा लागला, तेव्हा जम्मू-काश्मीरचे तत्कालीन मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी आम्हाला वार्यावर सोडून दिले. त्यांनी आमच्या वंशविच्छेदाकडे कानाडोळा केला. त्यांच्याच देखरेखीखाली काश्मिरी हिंदूंना पलायन करावे लागले आणि स्वत:च्याच देशात शरणार्थी म्हणून रहाण्यास बाध्य केले गेले.
३. अब्दुल्ला घराण्याचे हात आमच्या रक्ताने माखलेले आहेत !
आता ओमर अब्दुल्ला यांनी रक्ताने भिजलेला हा वारसा पुढे चालू ठेवला आहे. त्यांनी ऐतिहासिक चुकांचे निराकरण करण्यासाठी काहीही केले नाही आणि त्यांच्या पक्षाची अलीकडील कृत्ये आमची संस्कृती आणि आध्यात्मिक वारसा यांच्याविषयी पूर्णपणे अनादर दर्शवतात. आमच्या दुःखाची खिल्ली उडवली आहे. आमच्यावर झालेल्या अन्यायाविषयी त्यांच्या कुटुंबाच्या भूमिकेवरून त्यांनी कधीही आमची क्षमा मागितली नाही. आम्हाला पुन्हा काश्मीर खोर्यात वसवण्यासाठी अथवा त्यासाठीच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी कोणताही प्रयत्न त्यांनी कधीच केला नाही. आमच्या नरसंहाराविषयी त्यांचे मौन, हा त्यांचा केवळ भ्याडपणा नाही, तर तो नरसंहाराच्या कृत्यातील सहभागच आहे, असे आम्ही मानतो. अब्दुल्ला घराण्याचे हात आमच्या रक्ताने माखलेले आहेत आणि कितीही राजकीय पावित्र्य ते धुऊन काढू शकत नाही.
४. आमच्या छळाचे ‘सत्य’ आम्ही कधीही विसरणार नाही !
अब्दुल्ला कुटुंब आणि नॅशनल कॉन्फरन्स यांना आम्ही कधीही क्षमा करणार नाही. त्यांच्यामुळे आमच्यावर झालेले अत्याचार आम्ही कधीही विसरणार नाही. आम्ही गप्प बसणार नाही, आमचे अस्तित्व मिटू देणार नाही आणि न्यायासाठी आम्ही सतत लढत राहू. नॅशनल कॉन्फरन्सने इतिहासाचे पुनर्लेखन करण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी त्यांनी आमच्या छळाचे ‘सत्य’ आम्ही कधीही विसरू शकणार नाही.