हिंदु इकोसिस्टम (यंत्रणा) : एक मृगजळ ?

‘वर्ष २०१६ मध्ये ‘भारत तेरे टुकडे होंगे…’, अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या. त्यामागे कोणती विचारसरणी आहे ? या विचारसरणीचा भारत आणि हिंदु धर्म नष्ट करण्याचा उद्देश आहे, ज्याला ‘डावी विचारसरणी’ किंवा ‘साम्यवाद’ अथवा ‘वामपंथ’ या नावाने ओळखले जाते. या विचारसरणीने देशाच्या प्रत्येक क्षेत्रात बस्तान बसवले आहे. या साम्यवाद्यांचा इतिहास सर्वाधिक रक्तरंजित राहिला आहे. केवळ त्यांच्याकडून कोट्यवधी लोकांची हत्या करण्यात आली आहे. आज या साम्यवादाचे स्वरूप काहीसे पालटल्यासारखे दिसते. जिहादी आतंकवादी शारीरिक हानी पोचवतात, त्याचप्रमाणे हे साम्यवादीही आपल्याला बौद्धिक क्षती पोचवतात. साम्यवाद आणि भारतातील त्याची स्थिती या विषयावर पुणे येथील प्रसिद्ध लेखक श्री. अभिजीत जोग यांच्याशी ‘सनातन प्रभात’चे विशेष प्रतिनिधी श्री. विक्रम डोंगरे यांनी केलेला वार्तालाप अन् त्यांनी केलेले अभ्यासपूर्ण विश्लेषण या लेखातून पाहूया.

श्री. अभिजीत जोग (उजवीकडे) यांची मुलाखत घेताना श्री. विक्रम डोंगरे

१. भारतात साम्यवाद पसरण्यामागील कारणे

साम्यवाद जगभर पसरला आहे. तो आपल्यासमोर (भारतियांसमोर) अतिशय आकर्षक मुखवट्याच्या आडून येतो. साम्यवाद ही समता आणि विवेकवाद यांची विचारसरणी असल्याचे दाखवण्यात आले. या आकर्षक मुखवट्यांमुळे त्याकडे अनेक जण विशेषत: तरुण आकर्षित झाले. युवक आदर्शवादी असतात. त्यांना वाटले की, साम्यवाद ही समता, विवेक आणि सामाजिक न्याय यांची विचारसरणी आहे. केवळ भारतातच नाही, तर संपूर्ण जगभरात असे झाले. विशेषत: वर्ष १९१८ मध्ये रशियात साम्यवादी क्रांती झाली, तेव्हा ती पूर्व युरोपभर पसरली. त्या वेळी, ‘साम्यवाद ही शोषितांच्या मुक्तीची विचारसरणी आहे’, असे लोकांना वाटले. त्यामुळे मोठ्या संख्येने लोक त्याकडे आकर्षित झाले. जोपर्यंत या मुखवट्यांच्या मागील खरा तोंडवळा (चेहरा) लोकांसमोर आला नाही, तोपर्यंत ते त्याकडे आकर्षित होत राहिले. नंतर लोकांना साम्यवाद्यांचे खरे स्वरूप समजले.

२. साम्यवादाचे वास्तविक स्वरूप

लोकांना साम्यवादाचे खरे स्वरूप समजल्यावर साम्यवाद्यांनी नवीन क्लृप्ती शोधली आणि कार्यपद्धतीत थोडा पालट केला. साम्यवादावरील समता, शोषणमुक्ती आणि विवेकवाद हे बाह्य आवरण आहे. या आवरणाच्या आतील गर्भात काय दडलेले आहे, हे जाणून घेणे आवश्यक आहे. त्यात ‘समाज किंवा राष्ट्र यांना विविध गटांमध्ये विभाजित करा’, त्याच्यातील एका गटाला ‘तो शोषक आहे आणि दुसर्‍याला शोषित आहे, असे सांगा’, ‘शोषक आणि शोषित यांमध्ये नेहमी संघर्ष चालू रहाण्यासाठी प्रयत्न करा’, असे त्यांचे धोरण असते. त्यातून अराजक निर्माण होऊन विध्वंस व्हावा, असे त्यांना वाटते. सहस्रो वर्षांपासून जी मानवी सभ्यता निर्माण झाली आहे, तिला उद्ध्वस्त करणे, हाच या साम्यवादी विचारसरणीचा मुख्य उद्देश आहे. त्यांना वाटते की, एक दिवस जग कोरी पाटी बनेल आणि त्यावर ते एक नवीन मानव आणि समाज यांची निर्मिती करतील, ज्याचे नियंत्रण त्यांच्याकडे असेल. अर्थात् या माध्यमातून त्यांना संपूर्ण जगाचे नियंत्रण हवे आहे आणि हाच त्यांचा महत्त्वाचा उद्देश आहे. यासाठी आतापर्यंत चालत आलेली मानवी सभ्यता नष्ट करून त्यांना अपेक्षित अशी व्यवस्था निर्माण करायची आहे.

३. भारताची विद्यमान व्यवस्था संपवण्यासाठी इस्लाम आणि साम्यवाद यांची हातमिळवणी

संपूर्ण जगावर आपले वर्चस्व असावे, असे वाटणार्‍या ख्रिश्चॅनिटी, इस्लाम, साम्यवाद आणि ‘डीप स्टेट’ यांसारख्या जगात अनेक शक्ती आहेत. (‘डीप स्टेट’ म्हणजे सरकारी अधिकारी आणि खासगी संस्था यांच्या गुप्त जाळ्यांचा संदर्भ देते जी कुणासही उत्तरदायी न रहाता सरकारी धोरणावर प्रभाव टाकते.) जगातील काही लोक बँकांवर ताबा मिळवून बसले आहेत. त्यांच्या हातात संपूर्ण आर्थिक व्यवहार एकवटले आहेत. ‘संपूर्ण जगावर स्वतःचे वर्चस्व असावे’, असे त्यांनाही वाटते. त्याचप्रमाणे साम्यवादी, ख्रिस्ती आणि इस्लाम या पंथांनाही वाटते की, संपूर्ण जगावर त्यांचेच वर्चस्व असावे. त्यामुळे या लोकांना ‘सध्या असलेली विद्यमान व्यवस्था नष्ट व्हावी’, असे वाटते. ती नष्ट होईल, तेव्हाच ते नवीन व्यवस्था स्थापन करू शकतील. यासाठी ते काही वेळा एकमेकांना साहाय्यही करतात. त्यांची आपापसांत स्पर्धा आहे; पण त्यांना पहिल्याला नष्ट करायचे आहे. त्यामुळे हे लोक राष्ट्रवादी आणि देशप्रेमी लोकांचा अतिशय द्वेष करतात. त्यांना विविध राष्ट्रांचे अस्तित्व नष्ट करायचे आहे. अर्थातच राष्ट्रवादी किंवा देशप्रेमी लोक असे होऊ देणार नाहीत. त्यामुळे त्यांच्याशी लढण्यासाठी हे एकमेकांशी हातमिळवणी करतात.

तसे पाहिले, तर साम्यवाद आणि इस्लाम या एकमेकांशी विपरीत विचारसरणी आहेत. असे असतांनाही ते एकमेकांशी जुळवून घेत आहेत; कारण त्यांना भारताला नष्ट करायचे आहे. कधी कधी वाटते की, साम्यवाद आणि इस्लाम हे एकत्र कसे येऊ शकतात ? कारण साम्यवाद धर्माचा द्वेष करतो. तो ज्या मूल्यांच्या गोष्टी करतो, त्यातील एकही मूल्य इस्लाममध्ये नाही. तरीही ते इस्लामशी एवढे प्रेम करतात; कारण त्यांना प्रस्थापित व्यवस्था उद्ध्वस्त करायची आहे. त्यासाठी त्यांना इस्लामचे साहाय्य हवे आहे. त्यांना वाटते की, नंतर इस्लामला हटवता येईल. याविषयी काही सांगू शकत नाही; कारण चीनमध्ये तेच चालले आहे.

४. साम्यवाद्यांकडून विविध शब्दांचा शस्त्रांसारखा वापर

‘भाषेला शस्त्र बनवणे’, ही साम्यवादाची एक मोठी शक्ती आहे. ते असे काही शब्द निर्माण करतात की, जे कुणी पूर्वी ऐकलेलेच नसेल. ते त्या शब्दांचा असा अर्थ लावतात की, जे नंतर शस्त्र बनतात. ‘राईट विंगर्स’ (उजव्या विचारसरणीचे) ‘राईट विंग फॅसिझम्’ (उजव्या विचारसरणीचा कथित कट्टरतावाद), ‘इस्लामोफोबिया’ (मुसलमानद्वेष), हे शब्द त्यांनीच निर्माण केले आहेत. आपण वर्ष २००१ पूर्वी ‘इस्लामोफोबिया’ हा शब्द ऐकला नसेल. वर्ष २००१ मध्ये धर्माध आतंकवाद्यांनी अमेरिकेतील जुळे मनोरे (ट्विन टॉवर्स) उद्ध्वस्त केले. तेव्हा सर्व जग इस्लामवर टीका करील, असे त्यांना वाटले. तसे होऊ नये; म्हणून त्यांनी ‘इस्लामोफोबिया’ हा शब्द निर्माण केला. त्यामुळे इस्लामच्या विरोधात बोलणेही अशक्य झाले; कारण ‘इस्लामोफोबिया’चा शिक्का आपल्यावर बसावा, असे कुणालाच वाटत नव्हते.

त्याप्रमाणे ‘टॉक्सिक मस्कुलिनिटी’ हा शब्द आहे. त्याचा अर्थ पुरुषांनी त्यांचे पुरुषत्व आणि स्त्रियांनी त्यांचे स्त्रीत्व विसरून जावे. ‘फेमिनिस्ट’ ही स्त्री विरुद्ध पुरुष अशी चळवळ आहे, त्याचे साम्यवाद्यांनी पूर्ण विकृतीकरण केले आहे. साम्यवाद्यांनुसार स्त्रियांना निश्चितपणे बरोबरीचे अधिकार मिळायला हवे; पण त्यांनी पती-पत्नी यांना असे स्वरूप दिले की, ते एकमेकांचे शत्रू आहेत आणि त्यांनी नेहमी भांडत राहिले पाहिजे. कोणत्याही विषयावर संघर्ष चालू रहावा, त्यासाठी ते नवनवीन विषय निर्माण करत असतात. जेवढे अधिक संघर्षाचे बिंदू निर्माण होतील, तेवढे संघर्ष वाढतील, तेवढे अराजक वाढेल आणि तेवढा विध्वंस होईल, ही त्यांची विचारसरणी आहे.

५. भांडवलशाहीने कार्ल मार्क्सचे भाकित खोटे ठरवले !

सर्वप्रथम मार्क्स याने साम्यवादाचे स्वरूप जगासमोर ठेवले. त्याने म्हटले होते, ‘समाजात जो संघर्ष होईल, तो आर्थिक असेल.’ त्याच्या मते पुंजीपती (भांडवलदार) विरुद्ध कामगार असा संघर्ष होईल. ज्या राष्ट्रांमध्ये अधिक औद्योगिकरण झाले आहे, तेथे हा संघर्ष सर्वप्रथम होईल. ‘इंग्लंड आणि जर्मनी या देशांमध्ये रक्तरंजित क्रांती होईल अन् ती बंदुकीतून निघेल’, असेही त्याने सांगितले होते. मार्क्स याच्या म्हणण्याप्रमाणे या देशांमध्ये तसे काहीच घडले नाही आणि रक्तपातही झाला नाही. त्याने म्हटले होते, ‘जगातील सर्व कामगार एकत्र होतील आणि देशांची ओळख पुसली जाईल; कारण कामगारांना कळेल की, राष्ट्रातीलच नाही, तर संपूर्ण जगातील कामगार त्यांचे भाऊ आहेत.’

मार्क्सप्रमाणे मुसलमान म्हणतात, ‘संपूर्ण मुसलमान समाज त्यांचा आहे.’ त्यामुळे ‘एम्.आय.एम्.’चे नेते खासदार असदुद्दीन ओवैसी संसदेत ‘जय पॅलेस्टाईन’ची घोषणा देतात. त्यांना वाटते की, संपूर्ण जगातील मुसलमान एकत्र आले पाहिजेत. त्याप्रमाणे मार्क्सलाही वाटत होते की, संपूर्ण जगातील कामगार एकत्र होतील; परंतु पहिल्या आणि दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी इंग्लंड अन् जर्मनी यांचे कामगार त्यांच्या त्यांच्या देशासाठी लढले आणि त्यांनी क्रांतीकडे पाठ फिरवली. भांडवलशाहीतून मिळालेल्या समृद्धीत ते आनंदाने सहभागी झाले. याचा अर्थ मार्क्सने सांगितलेले सर्व चुकीचे सिद्ध झाले. साम्यवादामुळे केवळ एक मोठा गोंधळ निर्माण झाला.

– श्री. अभिजीत जोग, प्रसिद्ध लेखक, पुणे.

संपादकीय भूमिका

सहस्रो वर्षांपासून जी मानवी सभ्यता निर्माण झाली आहे, तिला उद्ध्वस्त करणे, हाच साम्यवादी विचारसरणीचा उद्देश आहे, हे जाणा !