Ratan Tata Passed Away : उद्योगमहर्षि पद्मविभूषण रतन टाटा पंचतत्त्वात विलीन !

कै.पद्मविभूषण रतन टाटा

मुंबई : देशातील सुप्रसिद्ध उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांचे ९ ऑक्टोबरला रात्री ११.३० वाजता वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील ब्रीचकँडी रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्‍वास घेतला. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू होते. त्यांना उपचारासाठी अतीदक्षता विभागामध्ये ठेवण्यात आले होते. रतन टाटा यांच्या निधनाने एक सुप्रसिद्ध उद्योगपतीसह एक चांगले व्यक्तीमत्त्व हरपल्याचे दुःख समाजातील सर्व स्तरांवरून व्यक्त केले जात आहे. रतन टाटा यांच्या निधनामुळे महाराष्ट्रात १० ऑक्टोबरला एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात आला. रतन टाटा यांचे पार्थिव कुलाबा येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. अंत्यदर्शनासाठी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत दक्षिण मुंबईमधील ‘नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स’ (एन्.सी.पी.ए.) येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. रतन टाटा यांच्या निधनामुळे महाराष्ट्रासह अन्य काही राज्यांनीही १० ऑक्टोबर या दिवशी दुखवटा घोषित केला होता.

रतन टाटा यांचा परिचय !

रतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ या दिवशी झाला. त्यांनी अमेरिकेत कॉर्नेल युनिव्हर्सिटीमधून आर्किटेक्चर आणि स्ट्रक्चरल अभियांत्रिकीमध्ये पदवी घेतली. ‘युनिव्हर्सिटी ऑफ हार्वर्ड’मधील ‘अ‍ॅडव्हान्स्ड मॅनेजमेंट प्रोग्राम’मध्ये शिकून त्यांनी त्यांचे व्यवसायिक कौशल्ये अधिक वाढवली. वर्ष १९६२ मध्ये त्यांनी टाटा समूहात प्रशिक्षणार्थी म्हणून प्रवेश केला. वर्ष १९९१ मध्ये जे.आर्.डी. टाटा यांच्या निधनानंतर त्यांना टाटा समूहाचे नेतृत्व मिळाले. रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली. टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि टाटा टेलीसर्व्हिसेस या क्षेत्रांमध्ये त्यांनी क्रांतीकारी पालट घडवले.

ते आदर्श समाजसेवक होते. त्यांनी त्यांच्या संपत्तीचा मोठा भाग समाजकल्याणासाठी दिला. त्यांच्या कार्यामुळे त्यांना भारत सरकारकडून पद्मभूषण (वर्ष २०००) आणि पद्मविभूषण (वर्ष २००८) या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. अमेरिका, ब्रिटन, आणि अन्य देशांमध्येही त्यांना विविध सन्मान मिळाले.

एक दिवसाचा दुखवटा, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार !

उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनामुळे त्यांच्या सन्मानार्थ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १० ऑक्टोबर हा दिवस दुखवटा दिवस म्हणून पाळण्यात येणार असल्याचे घोषित केले. त्यामुळे या दिवशी राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर ठेवण्यात आला. १० ऑक्टोबर या दिवशी राज्यात मनोरंजन आणि करमणुकीचे कुठलेही कार्यक्रम साजरे करण्यात आले नाहीत. रतन टाटा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले गेले.

समाजाला अधिक चांगले बनवण्याच्या अतूट बांधिलकीमुळे रतन टाटा लोकप्रिय ठरले !

पंतप्रधान मोदी यांनी वाहिली श्रद्धांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रतन टाटा यांनी श्रद्धांजली वहातांना म्हटले की, रतन टाटा एक दूरदर्शी नेतृत्व, एक दयाळू व्यक्तीमत्त्व आणि एक विलक्षण व्यक्ती होते. त्यांनी भारतातील सर्वांत जुन्या आणि प्रतिष्ठित व्यावसायिक घराण्यांना स्थिर नेतृत्व दिले.

नम्रता, दयाळूपणा आणि समाजाला अधिक चांगले बनवण्याच्या अतूट बांधिलकीमुळे ते लोकप्रिय झाले. रतन टाटा यांच्या सर्वांत अनोख्या पैलूंपैकी एक म्हणजे मोठी स्वप्ने पहाण्याची आवड. शिक्षण, आरोग्यसेवा, स्वच्छता, प्राणी कल्याण यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी कार्य केले. रतन टाटा यांच्याशी झालेल्या असंख्य संवादांच्या आठवणींनी माझे मन भरून आले आहे. मी मुख्यमंत्री असतांना त्यांची गुजरातमध्ये वारंवार भेट होत असे. आम्ही विविध सूत्रांंवर विचार विनिमय करत असू. मला त्यांचा दृष्टीकोन अतिशय समृद्ध वाटला. मी देहलीत आलो, तेव्हाही हे संवाद चालूच होते. त्यांच्या निधनाने अत्यंत दु:ख झाले.

सौजन्य : TOI

मानवता, दातृत्व, विश्‍वासार्हता यांचा मानबिंदू हरपला ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

मुंबई : ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाने अवघ्या देशाला मानवतेच्या श्रीमंतीची अनुभूती देणारे एक ज्येष्ठ व्यक्तीमत्त्व आपल्यातून निघून गेले आहे. त्यांच्या निधनाने मानवता, दातृत्व, विश्‍वासार्हता यांचा मानबिंदू हरपला आहे.

रतन टाटा एक यशस्वी उद्योजक तर होतेच; पण त्या पलीकडे ते समाजाचा विचार, माणुसकी आणि विनम्रता यांचे मूर्तीमंत उदाहरण होते. शिक्षण, ग्रामोन्नती आणि कुपोषण निर्मूलन, आरोग्य आदी क्षेत्रांत त्यांनी केलेले काम अतिशय उल्लेखनीय आहे.


देशाच्या आर्थिक विकासासह मानवतेच्या विकासात त्यांनी लावलेला हातभार अत्यंत मोठा आहे. समाजातून कमावलेले समाजालाच परत केले पाहिजे, या श्रद्धेनेच ते कायम जगले. त्यांचे जाणे ही महाराष्ट्राची, देशाची मोठी हानी आहे.


हे ही वाचा – The One And Only RATAN TATA : उद्योगापेक्षा देशाला प्राधान्य देणारे एकमेवाद्वितीय रतन टाटा !


‘श्रीमंत योगी’ हरपला ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना या जगात कुणाशीही होऊ शकत नाही; पण समर्थ रामदासस्वामी यांनी महाराजांना ‘श्रीमंत योगी’ म्हटले आहे. रामदासस्वामी यांनी महाराजांचे केलेले हे अचूक वर्णन अन्यत्र कुठे आढळत नाही.

रतन टाटा यांच्याविषयी विचार करतांना ‘श्रीमंत योगी’ ही उपमा तंतोतंत पटते. श्रीमंत असूनही त्यांनी स्वत:च्या श्रीमंतीचे प्रदर्शन मांडले नाही. असा माणूस पुढच्या पिढ्यांना पहायला न मिळणे हे अधिक दुःखदायक आहे.

आज मी एक ज्येष्ठ मित्र गमावला, याचे दुःख आहेच; पण एकूणच भारताने कदाचित् शेवटचा असा ‘कर्तृत्ववान’ तरीही निर्लेप राहिलेला उद्योजक गमावला, हे त्याहून मोठे दु:ख आहे.

__________________________________________

हे ही वाचा – संपादकीय : झाले बहु। होतील बहु। परि यासम हा।
__________________________________________