संपादकीय : झाले बहु । होतील बहु । परि यासम हा ।

टाटा उद्योग समूहाचे प्रमुख पद्मविभूषण रतन टाटा !

भारतातील आदर्श उद्योगपती, ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने सन्मानित, जागतिक यशाच्या शिखरावरील महत्त्वपूर्ण व्यक्ती म्हणून नावाजलेले, तसेच टाटा उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा असणारे रतन टाटा यांचे ९ ऑक्टोबरला रात्री ११.३० वाजता वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. टाटा हे अनेक उद्योगपतींचे श्रद्धास्थान होते. त्यामुळे ‘उद्योगसमूहातील ध्रुवताराच जणू अस्ताला गेला’, असे सर्वांना वाटले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करणारे ‘स्टेटस’ अनेकांनी ठेवले. त्यांच्या संदर्भातील पोस्टही सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होऊ लागल्या. पदापेक्षा देशासाठी आयुष्य समर्पित करणारे रतन टाटा यांच्याविषयी लहानथोर प्रत्येकाच्याच मनात एक विशेष स्थान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही टाटांविषयी व्यक्त होतांना म्हटले, ‘‘रतन टाटा म्हणजे दूरदर्शी व्यापारी नेतृत्व, दयाळू व्यक्तीमत्त्व होते. नम्रता, दयाळूपणा आणि समाजाप्रतीची अतूट बांधीलकी यांमुळे ते लोकप्रिय ठरले. त्यांच्या निधनाने मला अत्यंत दुःख झाले आहे.’’ टाटा यांचे भारतीय समाजासाठीचे कार्य स्पृहणीय आणि अतुलनीय होते. त्यांनी जे केले, त्याला नैतिकतेचा पाया होता. त्यामुळेच ते जीवनात यशस्वी झाले आणि माणुसकीचा आदर्श म्हणूनच आज भारतियांसमोर ते श्रेष्ठ मूल्यांचे उत्तुंग दीपस्तंभ ठरले !

रतन टाटा यांची अहंशून्यता दर्शवणारा एक प्रसंग ! एकदा प्रवासात रतन टाटा यांच्या चारचाकीचे चाक पंक्चर झाले. त्यामुळे सर्वजण खाली उतरले. चालकानेही ‘थोडा वेळ पाय मोकळे करून मग पंक्चर काढूया’, असे ठरवले. काही वेळाने चालक गाडीजवळ आल्यावर त्याच्या हातात स्टेपनीचे चाक कुणीतरी दिले. त्याला आश्चर्य वाटले ! ते चाक देणारे दुसरे-तिसरे कुणीही नसून रतन टाटा होते ! जेव्हा सगळे पाय मोकळे करायला गेले, तेव्हा टाटा यांनी स्वतःच्या शर्टच्या बाह्या दुमडल्या आणि चाकाचे पंक्चर काढले. या वेळी ते पुष्कळ घामाघूम झाले होते. चालकाला काय बोलावे, तेच सुचेना ! खरेतर टाटा यांच्यासारख्या उद्योगपतीला असा घाम गाळण्याची आवश्यकताच नव्हती; पण केवळ आदेश सोडणे, अधिकार गाजवणे हे त्यांच्या तत्त्वातच बसत नसल्याने त्यांनी हे काम करून ‘तुम्ही यशाच्या कितीही उंचीवर पोचलात, तरी पाय भूमीवरच हवेत’, हे कृतीतून दाखवून दिले. कोरोना महामारीच्या प्रतिकूल काळात टाटा यांनी कोविडयोद्धे बनलेले आधुनिक वैद्य आणि परिचारिका यांची महागड्या ताज हॉटेलमध्ये विनामूल्य सोय केली होती. वर्ष २००८ मध्ये मुंबईतील ताज हॉटेलवर आतंकवादी आक्रमण झाल्याचे समजताच रतन टाटा तडक तेथे पोचले. ते ३ दिवस हॉटेल व्यवस्थापनासमवेत होते. त्यांनी घायाळ झालेल्यांना, तसेच मृतांच्या कुटुंबियांना अर्थसाहाय्य पुरवले. त्यांच्यातील हे समाजभान निश्चितच वाखाणण्यासारखे आहे.

भारतमातेचे खरे रत्न !

भारतमाता

आज भारतीय उद्योग जगतात सर्वत्र भ्रष्ट मनोवृत्तीच दिसून येते. अनेक जण संगनमताने पैसा कमावतांना दिसतात. धंदा किंवा धंदेवाईक यांचाच सर्वत्र चिखल झालेला आढळतो. काही मोजक्याच व्यक्ती समर्पित भावनेने उद्योगांची यशस्वी धुरा चालवत आहेत. त्यांतीलच एक होते रतन टाटा ! ‘माणसासाठी काम करणारा खरा माणूस’ म्हणून ते भारतात नव्हे, तर विश्वात लोकप्रिय झाले. आज जरी ते आपल्यात नसले, तरी त्यांच्या कार्यकुशल नेतृत्वाच्या पाऊलखुणांमुळे ‘मरावे परि कीर्तीरूपे उरावे’ ही उक्ती टाटा यांनी सार्थ केली आहे’, असे म्हणता येईल !

रतन टाटा यांना अन्य सर्वाेत्कृष्ट पुरस्कार मिळाले; पण अद्यापपर्यंत ‘भारतरत्न’ न मिळणे, ही सर्वच भारतियांच्या मनातील सल ठरली. खरे पहाता त्यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तीमत्त्वाला पुरस्काराची आवश्यकताच नाही; कारण प्रत्येक भारतियाच्या मनात त्यांचे अढळ स्थान आहे. हाच त्यांच्यासाठीचा सर्वाेच्च पुरस्कार आहे.

९० च्या दशकात टाटा मोटर्स तोट्यात गेले होते. तेव्हा त्यातील पॅसेंजर कारचा व्यवसाय विकण्याचा निर्णय टाटा यांनी घेतला. अमेरिकेतील कार निर्माते आस्थापन असणार्‍या ‘फोर्ड मोटर्स’समवेत त्यांचे बोलणे झाले. फोर्ड आस्थापनाचे अध्यक्ष बिल फोर्ड यांनी टाटा यांची खिल्ली उडवली. ते म्हणाले, ‘‘काही ठाऊक नाही, तर तुम्ही हा व्यवसाय का चालू केला ? जर मी तुमच्यासमवेत हा व्यवहार केला, तर माझे तुमच्यावर मोठे उपकार होतील.’’ झालेला अवमान निमूटपणे गिळून अत्यंत शालीनतेने व्यवसाय विकण्याचा निर्णय टाटा यांनी रहित केला. अमेरिकेतून मुंबईत परतल्यावर त्यांनी झालेल्या घटनेची कुठेही वाच्यता न करता संपूर्ण लक्ष कारच्या क्षेत्राच्या भरभराटीकडे दिले. यासाठी त्यांनी रात्रंदिवस परिश्रम घेतले. ९ वर्षांनंतर टाटा मोटर्सने भरारी घेत संपूर्ण विश्वात पुन्हा एकदा नावलौकिक मिळवला आणि दुसरीकडे ‘फोर्ड’ आस्थापनाच्या नाकावर टिच्चून भारतीयत्वाच्या सामर्थ्याचे दर्शन घडवले. ‘टाटा मोटर्स’चे यश आसमंताला गवसणी घालत असतांनाच फोर्ड आस्थापन तोट्याची झळ सोसत होते. फोर्ड यांनी जरी टाटा यांचा अवमान केलेला असला, तरी माणुसकी जपणारे टाटा यांनी तो लक्षात न ठेवता फोर्ड आस्थापनाला साहाय्याचा हात पुढे केला. त्यामुळे बिल फोर्ड यांना मुंबईत टाटा यांचे पाय धरायला यावे लागले. अशा या आगळ्यावेगळ्या आणि आदर्श व्यक्तीमत्त्वाविषयी कितीही लिहिले, तरी अल्पच आहे.

रतन टाटा यांची शिकवण अंगीकारा !

रतन टाटा यांचे आयुष्य अनुभवांनी आणि शिकवणींनी भरलेले आहे. त्यांनी आजवर सर्वांना दिलेली मोलाची शिकवण आपण अंगीकारली, तर ‘आपण खर्‍या अर्थाने त्यांना श्रद्धांजली वाहिली’, असे होईल. ‘तुमचे अपयश एकट्याचे आहे, त्यासाठी कुणाला दोष देऊ नका. आपल्या चुकांमधून शिका आणि आयुष्यात पुढे जा. तुमचे जीवन चढ-उतारांनी भरलेले आहे, त्याची सवय करा. योग्य निर्णय घेण्यावर माझा विश्वास नाही. मी निर्णय घेतो आणि मग तो योग्य असल्याचे सिद्ध करतो. आपण माणसे आहोत, संगणक नाही. त्यामुळे जीवनाचा आनंद घ्या, नेहमी गंभीर राहू नका. जर लोकांनी तुमच्यावर दगडफेक केली, तर त्या दगडांचा वापर महाल बांधण्यासाठी करा’, ही आणि अशी त्यांची अनेक बोधवचने सर्वांसाठी अनुकरणीय आहेत. अशा या देशाभिमानी, सृजनशील, दूरदर्शी, धाडसी, त्यागी व्यक्तीमत्त्वाचे अतुलनीय योगदान भारताच्या इतिहासात अजरामर राहील ! ‘मिठा’पासून ‘मोटारी’पर्यंतच्या क्षेत्रांत क्रांती घडवणारे रतन टाटा यांच्या समोर प्रत्येक जण नतमस्तकच होईल ! भारताला खर्‍या अर्थाने समृद्ध करणारे रतन टाटा यांच्यासारख्या महापुरुषाला कोटी कोटी प्रणाम ! रतनजी टाटा यांना ‘सनातन प्रभात’समूहाकडून भावपूर्ण श्रद्धांजली !

रतन टाटा यांनी स्वतःच्या उदाहरणातून दिलेली मोलाची शिकवण अंगीकारणे, हीच त्यांच्याप्रती खरी श्रद्धांजली ठरेल !