श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या खोलीतील देवतांच्या मूर्तींमध्ये झालेले पालट आणि त्यांच्या खोलीविषयी जाणवलेली सूत्रे

‘मी अनेकदा श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या खोलीत सेवेनिमित्त जात असते. त्यांच्या खोलीतील एका पटलावर श्रीकृष्णाची लाकडी मूर्ती, आणि गुरुपादुका आहेत, तसेच दुसर्‍या पटलावर श्री कालभैरवाचा दंड, एका देवीची मारक रूपातील मूर्ती, श्री गणेशाच्या २ मूर्ती आणि श्री कार्तिकेय आदी देवतांच्या मूर्ती आहेत. या सर्वांचे निरीक्षण करतांना काही मूर्तींमध्ये मला जाणवलेले पालट येथे दिले आहेत.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

१. खोलीतील मूर्तींमध्ये जाणवलेले पालट

१ अ. श्रीकृष्णाच्या मूर्तीची चकाकी वाढल्याचे जाणवणे : श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या खोलीतील श्रीकृष्णाची मूर्ती अधिक हसरी झाल्याचे आणि मूर्तीची चकाकी वाढल्याचे जाणवते. मूर्तीकडे पाहिल्यावर तिचे डोळे आणि मुख यांवरील भाव आपल्याला आकर्षित करतात. त्यामुळे मूर्तीकडे ‘पहातच रहावे’, असे वाटते.

१ आ. देवीची मूर्ती

१ आ १. देवीचे रूप मारक असूनही कधीकधी ती प्रेमळ अन् तारक वाटणे : या मूर्तीत काळानुसार आवश्यक अशी शक्ती जाणवते. देवीचे मुख रक्ताने माखलेले लाल रंगाचे आहे. तिने जीभ बाहेर काढली आहे. तिचे ‘मोठे डोळे, गळ्यात मुंडमाला (कवट्यांची माळ) आणि लांब मोकळे सोडलेले केस’, असे देवीचे रूप आहे. देवीचे रूप मारक असूनही कधीकधी देवी प्रेमळ अन् तारक वाटते.

१ आ २. देवीचे तारक आणि मारक रूप जाणवण्यामागील कारणमीमांसा : एकदा माझ्या मनात विचार आला, ‘देवी असुरांचा संहार करते, तसेच श्रीसत्‌शक्ति  (सौ.) सिंगबाळ या साधकांच्या स्थूल आणि सूक्ष्म अहंकाराचा संहार करतात. आम्ही श्रीसत्‌शक्ति  (सौ.) सिंगबाळ यांची प्रीती अनुभवतो, तसेच त्या तीव्र स्वभावदोष आणि अहं यांमुळे होणार्‍या अक्षम्य अन् गंभीर चुकांसाठी साधकांना तितक्याच कठोरतेने जाणीव करून देतात. या कठोरतेमागेही त्यांची प्रीतीच असते. ‘साधकांची साधना चुकांमुळे व्यय होऊ नये’, असा त्यांचा विचार असतो. त्यामुळे ‘देवीचेही मला कधी तारक, तर कधी मारक रूप जाणवते’, असे वाटले.

१ आ ३. श्री कालभैरवाचा दंड : हा दंड याआधी आश्रम परिसरात बांधलेल्या घुमटीमध्ये स्थापित केला होता. या परिसराची रचना पालटण्यात आल्यानंतर हा दंड श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या खोलीत ठेवला आहे; कारण ‘हा दंड ठेवण्यासाठी हीच योग्य जागा आहे’, असे संतांनी सांगितले.

२. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या खोलीविषयी जाणवलेली सूत्रे

अहोरात्र कार्यरत असणार्‍या श्रीसत्‌शक्ति  (सौ.) सिंगबाळ यांची खोली म्हणजे रणक्षेत्र (युद्धभूमी) आहे. येथे सुर आणि असुर यांचे सूक्ष्मातून युद्ध होत असते. यामुळे श्रीसत्‌शक्ति  (सौ.) सिंगबाळ यांना ‘घसा सुकणे, आतून पुष्कळ उष्णता जाणवणे’, असे त्रास होतात. अशा उष्णतेमुळे त्यांना थंडीच्या दिवसांतही थंड पाणी किंवा सरबत घ्यावे लागते.

२ अ. साधकांना साधनेसाठी ऊर्जा मिळणे : ही खोली साधकांना सत्संग आणि चैतन्य देणारी असून साधकांना साधनेसाठी ऊर्जा देणारी आहे. मला कधीकधी निरुत्साह वाटत असेल किंवा सेवेचा वेग मंदावला असेल, तेव्हा काही क्षण या खोलीत जाऊन आले, तरी मला उत्साही वाटून सेवेचा वेग वाढतो. हे आम्ही सेवेनिमित्त जाणार्‍या साधिकांनी अनेकदा अनुभवले आहे. ‘त्यांनी दिलेल्या ऊर्जेमुळेच आम्ही सेवा करू शकतो’, हे आम्ही नित्य अनुभवतो.

२ आ. खोलीत गेल्यावर आमचा नामजप आपोआप चालू होतो.

२ इ. खोलीच्या बाहेर आणि खोलीत वेगळेपणा जाणवतो.’

– कु. मेघा चव्हाण, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.१०.२०२३)


सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्याविषयी दर्शवलेला विश्वास     

‘एकदा सहज बोलतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी सांगितले, ‘‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी यातील श्री गणेशाची मूर्ती मला आणि श्री कार्तिकेयाची मूर्ती श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना दिली आहे. तेव्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले म्हणाले, ‘‘श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ सतत दौर्‍यावर असतात. त्यामुळे त्यांना या मूर्तीची पूजा करणे, सांभाळणे कठीण जाईल; म्हणून ती श्रीसत्‌शक्ति  (सौ.) सिंगबाळ यांच्या खोलीत ठेवूया. आश्रमात यापेक्षा अजून कोणती योग्य जागा असेल ?’’

– कु. मेघा चव्हाण, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.१०.२०२३)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक