सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रमाणेच व्यापक स्तरावर कार्य करणार्‍या एकमेवाद्वितीय श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

१. एकाच वेळी अनेक स्तरांवर कार्य करणार्‍या आणि कार्य करण्यास काळाचेही बंधन नसणार्‍या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ !

‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या कार्याचा पसारा आता पुष्कळच वाढला आहे. त्यांना कार्य करण्यास आता काळाचेही बंधन राहिलेले नाही. ‘महर्षि त्यांना अवतार का म्हणतात ?’, ते त्यांच्या अफाट समष्टी कार्य करण्याच्या पद्धतीतून लक्षात येते. त्या एकाच वेळी अनंत जणांच्या समस्या एका क्षणात सोडवतात.

२. साधकांना साधनेत योग्य दिशादर्शन करून त्यांची फलनिष्पत्ती वाढवणार्‍या श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

पूर्वी त्या केवळ रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करत. त्यानंतर साधनेने हळहळू त्यांच्यातील कार्य करण्याची क्षमता वाढली. त्या आश्रमाच्या समवेत प्रसारातील साधकांनाही मार्गदर्शन करू लागल्या. त्या साधकांच्या सर्व प्रकारच्या समस्याही सोडवू लागल्या. त्यांना साधनेत योग्य दिशादर्शनही करू लागल्या. सनातन संस्थेच्या अनेक कार्यांशी संबंधित सेवा आहेत. सेवा करणार्‍या साधकांचे सत्संग घेऊन त्यांच्या साधनेची घडी चांगल्या आणि परिपूर्ण पद्धतीने बसवून त्यांची फलनिष्पत्ती वाढवणे, हेही त्यांना जमू लागले. परात्पर गुरु डॉ. आठवलेही (गुरुदेवही) त्यांचे कौतुक करू लागले.

३. अनेक विविध सेवांशी संबंधित सेवा करणार्‍या साधकांचे अप्रत्यक्ष दायित्व त्यांनी लीलया पेलून सद्गुरुपद प्राप्त करणार्‍या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ !

आश्रमात विविध राज्यांतील साधकांची  शिबिरे होतात. ते साधक आश्रमात आले असतांना त्यांना मातृवत् प्रेम देणे, हेही त्यांच्या कार्याचे एक अंग आहे. दैनिक ‘सनातन प्रभात’शी संबंधित सेवा करणारे, कला, बांधकाम आणि प्रसार, तसेच अन्य अनेक विविध सेवांशी संबंधित सेवा करणार्‍या साधकांचे साधनेचे अप्रत्यक्ष दायित्व त्या लीलया पेलू लागल्या. त्यांच्या साधनेची गती एवढी अफाट होती की, बघता बघता त्यांनी सद्गुरुपद कधी प्राप्त केले, हे कुणाच्याच लक्षात आले नाही.

४. अनेकदा साधकांना मार्गदर्शन करून चैतन्याच्या स्तरावर कार्य करणार्‍या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ !

पुढे महर्षि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या अवतारी कार्याचा वारंवार उल्लेख नाडीवाचनातून करू लागले. त्यांना ‘श्री महालक्ष्मीचा अवतार’ म्हणून संबोधू लागले. मी त्यांचा हा प्रवास अगदी जवळून पाहिला आहे. आता तर त्यांचे कार्य चैतन्याच्या स्तरावरच चालले आहे. सूक्ष्मातील कार्यातही त्या अनेकदा मला सांगतात, ‘‘अनेकदा साधकांना मार्गदर्शन करतांना नेमकेपणाने त्यांना काय हवे, हे मला आधीच समजते किंवा अनेकदा पुढे घडणार्‍या प्रसंगांच्या सूचनाही मिळतात.’’ आमच्यात संभाषणही होते. त्यांच्या संभाषणातून मलाही ऊर्जा प्राप्त होत असते. त्यांच्या बोलण्यातून समष्टी कार्य करण्याचे अनेक दृष्टीकोन आणि पैलू मलाही शिकायला मिळतात. त्यांचा भ्रमणभाष येणे, म्हणजे आमची चैतन्याच्या स्तरावरील एक शाळाच असते.

५. ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या अथक प्रयत्नांतून पृथ्वीवर श्रीरामराज्य अवतरणार आहे’, यात शंकाच नाही !

एकाच वेळी अनेक साधकांच्या साधनेतील समस्या सोडवत असतांना त्यांना त्याचा ताण आलेला मी कधी पाहिले नाही, यातूनच त्यांचे देवत्व लक्षात येते. आता त्यांचे कार्य रात्रंदिवस चालू आहे. ‘चिंता करितो विश्वाची’, या वचनाप्रमाणे रात्रंदिवस त्या साधक, समाज आणि राष्ट्र यांसाठी झटत आहेत. ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या अथक प्रयत्नांतून पृथ्वीवर श्रीरामराज्य अवतरणार आहे’, यात शंकाच नाही.

६. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या हाकेला धावून साधकांच्या रक्षणासाठी श्रीविष्णु येणार, यात कुणालाही तीळमात्र संदेह वाटू नये !

एका भक्त प्रल्हादाच्या प्रयत्नाचे फळ म्हणून कसा श्रीविष्णूला नरसिंहअवतार घ्यावा लागला, तसाच श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या हाकेला धावून साधकांच्या रक्षणासाठी श्रीविष्णु येणार यात कुणालाही तीळमात्र संदेह वाटू नये. त्यांच्या कार्याचा वेग आणि त्यांचे कार्य करण्याचे अष्टपैलूत्व ओळखणे आमच्याही आवाक्याबाहेरचे आहे. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ, आम्ही आपल्या चरणी केवळ नतमस्तक होऊ शकतो.

‘आजच्या आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या चैतन्याचा वरदहस्त आम्हा अज्ञानी बालकांच्या डोक्यावर अखंड ठेवा आणि आपल्या कृपेचा अमृतवर्षाव आमच्यावर अविरतपणे होऊ दे’, हीच त्या श्रीमन्नारायणाच्या चरणी प्रार्थना आहे.’

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (२७.९.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक