काँग्रेस राजवटीच्या काळात संपूर्ण देशात फोफावलेला नक्षलवाद केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून जवळजवळ संपुष्टात येत आहे. गेल्या काही मासांत देशातील मध्यवर्ती राज्यांत असलेल्या नक्षलवाद्यांच्या विरोधात मोठी आणि कठोर मोहीम राबवल्याने यावर्षी १५४ नक्षलवादी मारले गेले आहेत. ‘वर्ष २०२६ पूर्वी देशातील नक्षलवादाचा अंत होईल. त्याविरुद्धची मोहीम आता निर्णायक वळणावर आणि शेवटच्या टप्प्यात आहे. आता या समस्येवर कठोर आणि निर्दयी रणनीतीने आक्रमण करण्याची वेळ आली आहे. आता ही समस्या छत्तीसगडमधील काही निवडक भागांपुरती मर्यादित आहे’, असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. अमित शहा यांच्या मते वर्ष २००४ ते २०१४ या काळात नक्षलवादी आक्रमणांच्या १६ सहस्र २७४ घटना घडल्या आहेत. नक्षलवाद्यांचा बीमोड करण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाने (‘सी.आर्.पी.एफ्.’ने) बस्तर जिल्ह्यात (छत्तीसगड) ४ सहस्रांहून अधिक सैनिक तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.
बंगालमधून नक्षलवादास प्रारंभ !
भारतात नक्षलवादाचा प्रारंभ बंगालमध्ये वर्ष १९६० च्या दशकात झाला. नक्षलवाद्यांना ‘माओवादी’ असेही म्हटले जाते. प्रत्यक्षात माओवाद्यांचे क्रौर्य आणि चीनशी असलेला संबंध लपवण्यासाठी त्याला ‘नक्षलवाद’ असे नाव देण्यात आले. नक्षलवादाची स्वतःची वेगळी अशी विचारसरणी नाही. बंगालमधील नक्षलबारी गावात चारू मुजूमदार यांनी तेथील जमीनदारांविरोधात आंदोलन केले होते. या आंदोलनालाच पुढे ‘नक्षलवाद’ असे संबोधले जाऊ लागले. वर्ष १९७० च्या दशकात या आंदोलनाने अत्यंत उग्र रूप धारण केले. सामाजिक आणि आर्थिक विषमतेमुळे ही चळवळ उदयाला आली. ही चळवळ दडपण्याचा पोलिसांकडून अनेकदा प्रयत्न झाला. गेल्या काही वर्षांत नक्षलवाद्यांचे अनेक गट सिद्ध झाले. झारखंड, बंगाल, ओडिशा, बिहार, छत्तीसगड, महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि आंध्रप्रदेश या भागांत नक्षलवाद्यांचा मोठा प्रभाव आहे. देशातील ११ राज्यांतील ९० जिल्ह्यांत ही चळवळ पसरली आहे, असे प्रशासनाचे मत आहे.
शहरी नक्षलवाद एक मोठे आव्हान !
नक्षलवाद्यांनी केलेल्या आक्रमणात आतापर्यंत ६ सहस्रांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या चळवळीतील बंडखोरांच्या मते ते स्थानिक आदिवासींच्या हक्कासाठी आणि ज्या लोकांकडे सरकारने लक्ष दिले नाही, अशा लोकांच्या हक्कासाठी हे लोक (नक्षलवादी) लढत आहेत. नक्षलवाद ही देशाच्या एकतेला आणि अखंडतेला लागलेली सर्वांत मोठी कीड आहे. याचे असंख्य पुरावे नक्षलवाद्यांच्या प्रकाशित साहित्यातून समोर येत आहेत आणि तरीही त्यांची बाजू घेऊन भांडणारा तथाकथित बुद्धीवाद्यांचा मोठा वर्ग या देशात आहे, हे या देशाचे दुर्भाग्य म्हटले पाहिजे. येथील लोकशाही राज्यव्यवस्थेचे सर्व लाभ पदरात पाडून घेत, रक्तरंजित क्रांतीची स्वप्ने पहाणार्यांची पाठराखण हे तथाकथित बुद्धीवादी घेतात. अशा ‘अर्बन’ (शहरी) नक्षलवाद्यांचे अन्वेषण करून सरकारने त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे.
‘भारतातील नक्षलवादी चळवळ ही जगातील चौथ्या क्रमांकाची दहशत पसरवणारी आहे’, असे वर्ष २०१८ च्या अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाच्या अहवालात म्हटले आहे. आतंकवाद्यांसमवेत नक्षलवाद हेही देशापुढील एक मोठे आव्हान मानले जाते. काँग्रेसने नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. नक्षलवाद्यांनी त्यांच्या ब्रीदवाक्यासाठी आणि ध्येयासाठी वाट्टेल तेवढी हिंसा अन् दडपशाही केली आहे. प्रत्यक्षात राजकीय सत्ता मिळवणे, हे नक्षलवाद्यांचे अंतिम उद्दिष्ट आहे आणि तेही निवडणुकीच्या मार्गाने नाही, तर हिंसेच्या मार्गाने. नक्षलवाद्यांनी सरकारला विकासकामे करू न दिल्याने तरुणांना रोजगाराच्या संधी मिळाल्या नाहीत. समाजाच्या प्रवाहात येऊ इच्छिणार्या तरुणांना नक्षलवाद्यांनी दहशतीच्या जोरावर वेठीस धरले आहे. त्यामुळे नक्षलवादी चळवळ खर्या अर्थाने देशभरातील सामाजिक, राजकीय व्यवस्थेला प्रभावित करणारी आणि लोकशाही व्यवस्थेची पाळेमुळे खिळखिळी करणारी ठरली आहे. बंगालच्या एका लहानशा खेड्यात जन्माला आलेला नक्षलवाद आता गावाकडून महानगरांकडे वळला आहे. शहरी नक्षलवाद महाविद्यालय आणि वस्त्या इथपर्यंत येऊन पोचला आहे.
देशरक्षणार्थ नक्षलवादाचा समूळ अंत हवाच !
नक्षलवादाच्या या चळवळीने तिची ६ दशके पूर्ण केल्यानंतरही लोककल्याणासाठी भक्कम असा पर्याय उपलब्ध करून देण्यात ही चळवळ पूर्णतः अपयशी ठरली आहे. गेल्या ६० वर्षांत नक्षलवाद्यांनी अतीहिंसाचारामुळे स्वतःची विश्वासार्हता गमावली आहे. प्रारंभी त्यांच्यासमवेत असलेले वनवासी नंतर त्यांच्यापासून दूर जाऊ लागले. चळवळीचा प्रभाव असलेल्या क्षेत्रातून लोकांचे होत असलेले स्थलांतर आणि शिक्षण, तसेच नोकरीसाठी आग्रही असलेली तरुण पिढी पाहिली की, हे विश्वासार्हता गमावण्याचे सूत्र आणखीनच स्पष्ट होते. स्वतःच्या प्रभावक्षेत्रातील लोकांवरील पकड ढिली होऊ नये; म्हणून नक्षलवाद्यांनी हत्यासत्र वाढवले. त्यातून निर्माण होणार्या दहशतीतून लोक समवेत रहातील, हा हेतू त्यामागे होता; पण झाले मात्र उलटेच. नक्षलवाद्यांनी आता विश्वासार्हता गमावली असल्याने त्यांचा अंत आला आहे. नक्षलवाद्यांची विचारसरणी कट्टर रूप धारण करते आणि देशाच्या कायदा अन् सुव्यवस्थेला आव्हान देते, तेव्हा त्यांचे उच्चाटन करण्यासाठी जे काही उपाय आखले जातील, ते कोणत्याही स्थितीत कार्यवाहीत आणायला हवेत. अर्थात् तथाकथित बुद्धीजीवी लोकांचा गट नक्षलवादी बंड वा हिंसा योग्य असल्याचे सांगत एक प्रकारे लोकशाहीला आव्हान देत आला आहे; पण नकळतपणे ही नक्षलवाद्यांची पाठराखणच आहे, हे विसरता कामा नये. हा देश लाखो भारतियांच्या बलीदानातून उभा राहिलेला आहे. सहस्रो क्रांतीकारकांच्या त्यागातून हा देश स्वतंत्र झालेला आहे. प्रत्येक भारतियाला शेवटपर्यंत आपल्या देशाची अखंडता आणि वैभव टिकून रहाण्यासाठी अधिक जागरूक अन् सतर्क रहावे लागेल; कारण नक्षलवादाचा अंत जसा जवळ येत आहे, तसा तो अधिक फडफड करील अन् सर्व शक्तीनिशी विविध मार्गांनी आक्रमण करण्याचा प्रयत्न करील; पण सर्व भारतियांसह शासनकर्ते, प्रशासन आणि सुरक्षादले यांनी देशाच्या सुरक्षेसाठी नक्षलवादाचा समूळ अंत करावाच लागेल, हे निश्चित !
देशाची अखंडता, वैभव आणि सुरक्षा यांसाठी विविधांगी असलेल्या नक्षलवादाचा समूळ अंत करावाच लागेल ! |