Dr S Jaishankar On POK : पाकिस्‍तानला पाकव्‍याप्‍त काश्‍मीर रिकामी करायला लावायचे आहे !

भारताचे परराष्‍ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी संयुक्‍त राष्‍ट्रांत पाकला सुनावले  

भारताचे परराष्‍ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

न्‍यूयॉर्क (अमेरिका) – भारत आणि पाकिस्‍तान यांच्‍यामधील केवळ एकच सूत्र सोडवणे शेष आहे. ते म्‍हणजे पाकिस्‍तानने अवैधरित्‍या बळकावलेला काश्‍मीरचा भाग त्‍याला रिकामा करायला लावायचा आहे. तो भारताचा भूभाग आहे. तसेच सीमेपलीकडून भारताविरोधात होत असलेल्‍या आतंकवादी कारवायांचा कायमचा बंदोबस्‍त करायचा आहे, असे विधान भारताचे परराष्‍ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी संयुक्‍त राष्‍ट्रांच्‍या महासभेत केले.

पाकिस्‍तानला परिणाम भोगावे लागतील !

आम्‍ही काल याच मंचावरून काही चुकीच्‍या गोष्‍टी ऐकल्‍या. त्‍यामुळे मला भारताची भूमिका स्‍पष्‍ट करायची आहे. सीमेपलीकडील आतंकवादाचे पाकिस्‍तानचे धोरण कधीच यशस्‍वी होणार नाही. याची त्‍यांना शिक्षा मिळेल. ते त्‍या शिक्षेपासून स्‍वतःचा बचाव करू शकणार नाहीत. त्‍यांच्‍या कृतीचे परिणाम त्‍यांना भोगावेच लागतील, असे डॉ. जयशंकर यांना ठणकावले.

पाकिस्‍तान त्‍याच्‍या कर्माची फळे भोगत आहे !

एस्. जयशंकर पुढे म्‍हणाले की, सीमेपलीकडे पाकिस्‍तान आतंकवादी धोरणे राबवत आहे; मात्र ते त्‍यात कधीच यशस्‍वी होणार नाहीत. त्‍यांच्‍या प्रत्‍येक कृतीचे परिणाम त्‍यांना भोगावेच लागतील. आजही ते त्‍यांच्‍या कर्माची फळे भोगत आहेत. त्‍यांचे ‘कर्म’ आज त्‍यांच्‍याच समाजाला गिळंकृत करत आहे.

स्‍वतःच्‍या चुकांमुळे पाकिस्‍तान मागे राहिला !

डॉ. जयशंकर म्‍हणाले की, काही देश त्‍यांच्‍या नियंत्रणात नसलेल्‍या शक्‍तींमुळे किंवा परिस्‍थितीमुळे मागे राहिले आहेत; परंतु काही देश असेही आहेत जे स्‍वतःच्‍या चुकांमुळे मागे राहिले. ज्‍यांनी जाणूनबुजून असे निर्णय घेतले की, जे त्‍यांच्‍या देशासाठी घातक ठरले. याचे सर्वांत मोठे उदाहरण म्‍हणजे आमचा शेजारी देश पाकिस्‍तान.

पाकने आतंकवाद संपुष्‍टात आणावा !

पाकिस्‍तानने आतंकवाद आणि त्‍यांच्‍या संघटना यांच्‍यासमवेतचे संबंध संपुष्‍टात आणावेत. आतंकवाद हा जगातील कोणत्‍याही समाजाच्‍या, धर्मांच्‍या शिकवणीच्‍या विरोधात आहे, असेही डॉ. जयशंकर यांनी स्‍पष्‍ट केले.

पाकचे सकल राष्‍ट्रीय उत्‍पन्‍न म्‍हणजे आतंकवाद !

डॉ. जयशंकर म्‍हणाले की, पाकच्‍या आतंकवादधार्जिण्‍या राजकारणामुळे त्‍याच्‍या लोकांमध्‍ये (पाकिस्‍तानी) अशी कट्टरता निर्माण होत असेल, तर त्‍याचे सकल राष्‍ट्रीय उत्‍पन्‍न (जीडीपी) केवळ कट्टरतावाद आणि आतंकवाद पसरवण्‍याच्‍या दृष्‍टीने मोजला जाऊ शकतो.

संपादकीय भूमिका

भारताने केवळ बोलू नये, तर कृतीही करून दाखवावी !