महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या यांचे प्रकरण
कोलकाता (बंगाल) – येथील राधा गोबिंद कर रुग्णालयामध्ये प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्यानंतर कनिष्ठ डॉक्टर आणि इतर सहकारी यांनी संप पुकारला होता. गेल्या ४१ दिवसांपासून चालू असलेला हा संप आता मागे घेण्यात आला आहे. २१ सप्टेंबरपासून सगळे डॉक्टर कामावर परतणार आहेत. २ दिवसांपूर्वी या डॉक्टरांच्या शिष्टमंडळाची बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा झाली. त्यानंतर डॉक्टरांनी संप मागे घेत असल्याची घोषणा केली. ममता बॅनर्जी सरकारने या डॉक्टरांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत.
या संदर्भात आंदोलन करणार्या डॉक्टरांपैकी डॉक्टर अकीब म्हणाले की,
आंदोलनाच्या कालावधीत कनिष्ठ डॉक्टरांच्या आघाडीने अनेक गोष्टी मिळवल्या आहेत. आम्ही कोलकाताचे पोलीस आयुक्त, आरोग्य विभागाचे महासंचालक आणि अन्य अधिकारी यांना त्यागपत्र द्यायला भाग पाडले. आम्ही संप मागे घेतला, याचा अर्थ आमचे आंदोलन संपलेले नाही. आम्ही नव्या पद्धतीने आंदोलन पुढे घेऊन जाऊ. २१ सप्टेंबरपासून आम्ही रुग्णालयात कामावर परतणार आहोत. काम चालू केल्यानंतर प्रशासनावर आमचे लक्ष असणार आहे. आम्हाला काहीही चुकीचे वाटले, तर आम्ही पुन्हा नव्या शक्तीनिशी मैदानात उतरणार आहोत.