श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेकडून ‘सांगली बंद’चा निर्णय मागे !

  • मोटारसायकलींवरून फेरी काढून निषेध !

  • जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर !

सांगली, २२ ऑगस्ट (वार्ता.) – बांगलादेशातील हिंदूंवर धर्मांधांनी अत्याचार केल्याच्या निषेधार्थ येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेकडून २५ ऑगस्ट या दिवशी छेडण्यात आलेला ‘सांगली बंद’चा निर्णय मागे घेण्यात आला आहे. या बंदऐवजी २२ ऑगस्ट या दिवशी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराचा निषेध करत शिवतीर्थ ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी धारकर्‍यांनी फेरी काढून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले. या वेळी जिल्हाधिकार्‍यांच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले.

निवेदन दिल्यानंतर ज्योती पाटील यांच्याशी चर्चा करतांना पू. संभाजीराव भिडेगुरुजी (उजवीकडे)

या वेळी पत्रकारांशी बोलतांना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. हणमंतराव पवार म्हणाले, ‘‘बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या अत्याचारांच्या निषेधार्थ आज १०० च्या संख्येने धारकर्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन निवेदन दिलेले आहे. ‘या निवेदनाविषयी केंद्राकडे प्रस्ताव पाठवतो’, असे प्रशासनाने सांगितले आहे. २४ ऑगस्ट या दिवशी काही संघटनांनी बंद पाळण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून २५ ऑगस्ट या दिवशी बंद पाळणे हे योग्य दिसत नाही.

पू. भिडेगुरुजींच्या आदेशानुसार पुढील बैठक घेऊन बंद कधी पाळणार ? याविषयीच्या दिनांकाची माहिती दिली जाईल.’’

‘‘आपल्या हिंदु बांधवांवर बांगलादेश येथे होत असलेल्या अत्याचारांच्या विरोधात केंद्र सरकारने कठोर पावले उचलावीत. प्रशासन काय कारवाई करते ? ते पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल.’’ – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की…

बांगलादेशात जो नंगानाच चालू आहे, त्या विरोधात सरकारने कठोर पावले उचलावीत. या निमित्ताने आपल्या देशातही शेजारील राष्ट्राच्या अस्थिर वातावरणाचा अपलाभ घेऊन नाशिक येथे जे दंगलसदृश्य प्रकार घडले, त्यातील दोषींवर कठोर कारवाई करावी.