डॉ. दाभोलकर आणि पानसरे हत्या प्रकरणांत सनातन संस्थेला गोवण्यामागे अंनिस आणि नक्षलवादी यांचे षड्यंत्र ! – सनातन संस्था

सनातन संस्थेच्या वतीने ‘अंधश्रद्धा निर्मूलन कि छुपा अर्बन नक्षलवाद ?’ या विषयावर दादर (मुंबई) आणि पुणे येथे पार पडला विशेष कार्यक्रम !

मुंबई, २० ऑगस्ट (वार्ता.) – सनातन धर्म नष्ट करण्यासाठी शहरी नक्षलवाद्यांकडून षड्यंत्रे चालू आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे आदी पुरोगाम्यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेला दोषी ठरवण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि शहरी नक्षलवादी यांचे षड्यंत्र होते. हे षड्यंत्र अयशस्वी झाले आहे, असे वक्तव्य सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक यांनी केले. सनातन संस्थेच्या वतीने ‘अंधश्रद्धा निर्मूलन कि छुपा अर्बन नक्षलवाद ?’, या विषयावर २० ऑगस्ट या दिवशी दादर (पश्चिम) येथील कित्ते भंडारी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि प्रख्यात सर्जन डॉ. अमित थढानी यांनीही या वेळी उपस्थितांना संबोधित केले. या कार्यक्रमाला अधिवक्ते, पत्रकार, उद्योजक आदी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. असाच कार्यक्रम पुणे येथेही झाला.

मुंबई येथे बोलतांना श्री. अभय वर्तक म्हणाले, ‘‘डॉ. दाभोलकर आणि पानसरे हत्या प्रकरणांत सनातन संस्थेला दोषी ठरवून ‘बळीचा बकरा’ बनवण्याचा प्रयत्न झाला. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी न्यायालयाने हिंदु जनजागृती समितीचे डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सनातन संस्थेचे साधक श्री. विक्रम भावे आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांची निर्दाेष मुक्तता केली. डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना या प्रकरणात ८ वर्षे कारागृहवास भोगावा लागला. हा त्यांच्यावरील अन्याय आहे. डॉ. तावडे यांच्या विरोधात केंद्रीय अन्वेषण यंत्रणा ठोस पुरावे सादर करू शकली नाही. त्यानंतरही डॉ. तावडे यांना अन्य प्रकरणात जामीन न मिळणे, हा अन्याय आहे. श्री. विक्रम भावे यांना २ वर्षे आणि अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना ४२ दिवस कारागृहात रहावे लागले. या तिघांची झालेली व्यक्तीगत हानी कोण भरून देणार ?’’

नास्तिकवादाच्या प्रसाराची चळवळ राष्ट्र आणि धर्मविरोधी !

श्री. अभय वर्तक

११ ऑगस्ट २०१२ या दिवशी मुंबईतील आझाद मैदानात धर्मांधांनी पोलीस आणि पत्रकार यांच्यावर आक्रमण केले. महिला पोलिसांचा विनयभंग केला. या प्रकरणातील दोषींना अद्यापही शिक्षा झालेली नाही. हिंदुत्वनिष्ठांविरुद्ध कथित ‘हेटस्पीच’चे (द्वेषपूर्ण भाषणाचे) गुन्हे नोंदवले जातात. यामागेही शहरी नक्षलवादी जोमाने कार्यरत आहेत. नास्तिकतेच्या नावाखाली अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाने चालू असलेल्या नास्तिकवादाच्या प्रसाराची चळवळ केवळ धर्मविरोधी नव्हे, तर राष्ट्रविरोधी आहे, असे श्री. अभय वर्तक म्हणाले.

खोटे नॅरेटिव्ह प्रसारित करून साम्यवादी जनतेला भ्रमित करत आहेत ! – अधिवक्ता संजीव पुनाळेकर, मुंबई उच्च न्यायालय

अधिवक्ता संजीव पुनाळेकर

साम्यवादी स्वत:ला विचारवंत असल्याचा प्रसार करून जनतेमध्ये खोटा भ्रम पसरवत आहेत. यामुळे जनतेची चांगले आणि वाईट यांविषयी निर्णय घेण्याची क्षमता अल्प होते. या अपप्रचाराद्वारे हे नकली हिरो निर्माण करतात आणि देशाच्या खर्‍या नायकांना ‘खलनायक’ करण्याचे यांचे कारस्थान आहे. निखिल वागले, असीम सरोदे, विश्वंभर चौधरी आदी यांचे प्रमुख आहेत. काही स्वयंसेवी संस्था यासाठी साम्यवाद्यांना पैसा पुरवत आहेत. यामध्ये हिंदी चित्रपटसृष्टी, पत्रकार, पोलीस यांचाही सहभाग आहे. ‘खोट बोल पण रेटून बोल’, असे करून ही मंडळी न्यायव्यवस्थेवर दबाव निर्माण करतात. यासाठी हिंदूंनीही स्वत:ची ‘इकोसिस्टिम’ निर्माण करणे आवश्यक आहे. हिंदुत्वनिष्ठ पत्रकार, अधिवक्ता, शासनकर्ते यांनी या हिंदुविरोधी षड्यंत्राच्या विरोधात एकजुटीने काम करणे आवश्यक आहे. साम्यवादी ‘व्हॉट्सॲप युनिवर्सिटी’ नावाने ओरड करतात; मात्र ‘फेक नेरेटिव्ह’द्वारे (खोट्या कथानकाद्वोर) हेच प्रसिद्धीमाध्यमांचा उपयोग करून समाजामध्ये खोटी माहिती पसरवत आहेत. याविषयी जनतेने सावध रहाण्याची आवश्यकता आहे.

केवळ हिंदुत्वनिष्ठ संघटनांना दोषी ठरवण्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येचे अन्वेषण करण्यात आले ! – डॉ. अमित थढानी

डॉ. अमित थडानी

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला ११ वर्षे पूर्ण झाली; मात्र इतक्या वर्षांमध्ये हा खटला पूर्णपणे खोट्या पद्धतीने चालवला गेला. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमध्ये आर्थिक घोटाळा, काही जणांशी असलेले पूर्ववैमनस्य किंवा त्यांच्यावर यापूर्वी झालेले आक्रमण अशी विविध अंगे होती; मात्र अन्वेषण केवळ एकाच कोनातून करण्यात आले. हिंदुत्वनिष्ठ संघटनांना आरोपी करण्यासाठीच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचे अन्वेषण करण्यात आले. हिंदुत्वनिष्ठ संघटनांची अपकीर्ती करण्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येची ट्रायल चालवली गेली. अन्वेषण यंत्रणांनी आरोपींच्या विरोधात खोटे पुरावे सादर केले. याविषयी मी ‘दाभोलकर-पानसरे हत्या ‘तपासामागील रहस्ये ?’ हे पुस्तक लिहिले आहे.


जगात अराजक माजवून विध्वंस घडवण्याचे साम्यवादी आणि जिहादी यांचे षड्यंत्र ! – अभिजित जोग, प्रसिद्ध लेखक

श्री. अभिजित जोग (डावीकडे) आणि सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस

पुणे – जागतिक महत्त्वाकांक्षा असलेल्या ३ शक्ती आज जगात कार्यरत आहेत. ‘डीप स्टेट’ (‘डीप स्टेट’ म्हणजे सरकारी अधिकारी आणि खासगी संस्था यांच्या गुप्त जाळ्यांचा संदर्भ देते जी कुणासही उत्तरदायी न रहाता सरकारी धोरणावर प्रभाव टाकते.), साम्यवादी, तसेच ‘सेमिटिक धर्म’ (मध्यपूर्वेत उदयाला आलेले धर्म) असलेले ख्रिस्ती चर्च आणि जिहादी इस्लाम ! आपली ओळख आणि आत्मसन्मान जपणारी, तसेच देशहिताची स्वतंत्र धोरणे आखणारी राष्ट्रे त्यांच्या डोळ्यांत खुपतात. या देशांमध्ये अराजक आणि हिंसाचार यांचे थैमान घालून विध्वंस घडवून आणण्यासाठी या शक्ती प्रयत्नशील असतात.  याचा प्रयोग नुकताच बांगलादेशामध्ये यशस्वीपणे करण्यात आला आणि भारतातही तेच चालू आहे, असे गंभीर वक्तव्य ‘असत्यमेव जयते’ या पुस्तकाचे लेखक अन् साम्यवादाचे सखोल संशोधक श्री. अभिजित जोग यांनी केले.

‘लोकमान्य सभागृहा’त आयोजित विशेष कार्यक्रमाला उपस्थित हिंदु धर्मप्रेमी

येथील टिळकवाडा परिसरात असलेल्या ‘लोकमान्य सभागृहा’त आयोजित विशेष कार्यक्रमाला ते संबोधित करत होते. या वेळी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनीही उपस्थितांना संबोधित केले.

डॉ. दाभोलकर-पानसरे हत्येत सनातन संस्थेला गुंतवण्यामागे अंनिस अन् शहरी नक्षलवादी ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

चेतन राजहंस

सनातन धर्म नष्ट करण्यासाठी शहरी नक्षलवाद्यांकडून सातत्याने षड्यंत्रे रचली जात आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर-कॉ. गोविंद पानसरे आदी पुरोगाम्यांच्या हत्यांच्या प्रकरणी सनातन संस्थेला दोषी ठरवण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि शहरी नक्षलवादी यांनी षड्यंत्र आखले होते. यांच्याकडून सनातन संस्थेला दोषी ठरवून ‘बळीचा बकरा’ बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला. शहरी नक्षलवादाशी जोडलेल्या डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, प्रा. कलबुर्गी, साम्यवादी पत्रकार गौरी लंकेश या ४ हत्या झाल्यावर देशातील साम्यवादी विचारांच्या मान्यवरांनी ‘पुरस्कार वापसी’च्या मोहिमेपासून ते भारतात रहाण्याची भीती वाटू लागल्याची ओरड चालू केली होती. म. गांधींच्या हत्येनंतर देशात याच ४ हत्या झाल्याचे वातावरण निर्माण करण्यात आले; मात्र भारतात मागील २५ वर्षांत नक्षलवाद्यांनी १४ सहस्रांहून अधिक सैनिक, पोलीस, राजकीय नेते, तसेच सामान्य नागरिक यांच्या ज्या हत्या केल्या आहेत, देशभरात कमलेश तिवारी, किशन भरवाड, प्रवीण नेट्टारू, प्रशांत पुजारी यांच्यासारख्या सहस्रो हिंदुत्वनिष्ठांच्या ज्या हत्या करण्यात आल्या, त्यांच्या संदर्भात कधीही चर्चा केली जात नाही.