सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी १९९० मध्ये सनातन हिंदु धर्माचे कार्य करणार्या आणि आध्यात्मिक दृष्टीकोन असलेल्या साधक-कार्यकर्त्यांची पिढी निर्माण करण्याचे दैवी कार्य आरंभले. हिंदु धर्मातील अध्यात्मशास्त्राविषयी शास्त्रीय परिभाषेमध्ये ज्ञान देण्याचे कार्य सनातन संस्था गेली ३ दशकांहून अधिक कालावधी करत आहे. हे कार्य उभे रहात असतांना कोणत्या प्रकारचे अडथळे आले ? किती संकटे आली ? त्यासाठी किती साधकांनी स्वतःचे आयुष्य पणाला लावले, किती कष्ट सोसले ? याची कल्पना आपल्यापैकी फार थोड्या मंडळींना असणार आहे. कार्य उभारणीसाठी घ्यावे लागणारे कष्ट आणि हे कार्य थांबावे म्हणून षड्यंत्रकारी देशी-विदेशी शक्तींनी सनातन संस्थेवर केलेले आघात थांबवण्यासाठी किंवा त्याचा परिणाम म्हणून भोगावे लागणारे कष्ट यांत पुष्कळ मोठे अंतर आहे !
१. सनातनवर आघात करणारे असुररूपी शक्तींचे षड्यंत्र !
सनातन संस्थेचे आध्यात्मिक हिंदु धर्माचे कार्य थांबवण्यासाठी तत्कालीन काँग्रेसप्रणित, विदेशी मिशनरी प्रणित आणि साम्यवादी विचारांच्या शक्तींनी सनातन संस्थेला ‘एक आतंकवादी संघटना’ म्हणून कलंकित करण्याचा एक मोठा घाट घातला. त्यासाठी विविध साम्यवाद्यांच्या हत्या किंवा तथाकथित बाँबस्फोट यांत सनातन संस्थेच्या निरपराध साधकांना षड्यंत्रपूर्वक गुंतवण्यात आले. अशा प्रकारे सनातन संस्थेचा हा अश्वमेध यज्ञाचा अश्व रोखून धरण्याचा प्रयत्न करण्यात आला. ईश्वरी कृपेमुळे या आसुरी शक्तींना ते शक्य झाले नाही. त्यामुळेच आज हा आध्यात्मिक वटवृक्ष उभा राहिला आहे.
२. राष्ट्रकार्यासाठी कारागृहात गेलेल्या हिंदूंविषयी संवेदना हवी !
असे असले, तरी दाभोलकर-पानसरे-कलबुर्गी-गौरी लंकेश यांच्या हत्या आणि नालासोपारा (मुंबई) येथे हिंदुत्वनिष्ठांना झालेल्या अटका यांमध्ये सनातन संस्थेचे साधकच नव्हे, तर अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांना गुंतवण्यात प्रयत्न करण्यात आला. त्यांचे जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हिंदू समाज स्वतःवर झालेले आघात सहजतेने विसरतो. सुदैवाने मालेगाव बाँबस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि कर्नल पुरोहित यांच्याविषयी हिंदु समाजाला थोडी जाणीव झाली अन् अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी त्यांना त्यांनी सोसलेल्या आघातांविषयीची संवेदना दाखवून दिली. आज साध्वी प्रज्ञासिंह यांच्याप्रमाणे अनुमाने २५ हून अधिक हिंदुत्वनिष्ठ वर्ष २०१८ पासून, म्हणजे तब्बल ६ वर्षांपासून केवळ हिंदुत्वाचे कार्य केले; म्हणून कारावासात हाल सहन करत आहेत. दाभोळकर हत्येमध्ये डॉ. वीरेंद्रसिंह तावडे या एका अतिशय हुशार अशा नामांकित डॉक्टरांना, ज्यांनी हिंदुत्वाच्या कार्यासाठी संपूर्ण जीवन समर्पित केले आहे, त्यांना गुंतवून त्यांचे संपूर्ण आयुष्य या शक्तींनी उद्ध्वस्त केले.
३. अंनिसच्या डॉ. दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणी ५ जणांना गुंतवून नाहक अटक केली जाणे
वर्ष २०१३ मध्ये अंनिसच्या डॉ. दाभोलकरांची हत्या झाली. यामध्ये खंडेलवाल आणि नागोरी या २ आरोपींना पकडण्यात आले. त्यांच्याकडून बंदूक जप्त करण्यात आले. या बंदुकीमधील गोळ्यांचा ‘फॉरेन्सिक रिपोर्ट’ असे सिद्ध करत होता की, दाभोलकरांच्या शरिरातील गोळ्या आणि खंडेलवाल आणि नागोरी यांच्याकडून मिळालेल्या पिस्तुलातील गोळ्या एकच आहेत. असे असतांना सुद्धा खंडेलवाल आणि नागोरी या २ गुंडांना आरोपपत्र प्रविष्ट (दाखल) न करताच सोडून देण्यात आले. राकेश मारिया यांच्यासारखा उच्च पदस्थ अधिकारी २५ लाख रुपये देण्याचे आमीष दाखवून या प्रकरणांमध्ये या पकडलेल्या आरोपींनी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे नाव घ्यावे म्हणून धडपडत होता. वर्ष २०१६ पासून १ नाही, २ नाही, तर ५ हिंदुत्वनिष्ठांना दाभोलकर प्रकरणामध्ये नाहक गुंतवण्यात आले. या हिंदुत्वनिष्ठांचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना अटक करून तर यांनी कहरच केला. न्याय मिळवण्याच्या ऐवजी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार्या अधिवक्त्यालाच कारागृहात डांबण्यात आले. याच्यापेक्षा क्रूर आक्रमण कोणते असू शकते ?
४. डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांचे खरे स्वरूप !
ज्या दाभोलकरांची हत्या झाली, ते काही कुणी महान व्यक्तीमत्त्व नव्हते. ते ‘हिंदूंच्या श्रद्धा या अंधश्रद्धा आहेत’, हे ‘नॅरेटिव्ह’ (कथानक) सिद्ध करण्यासाठी ‘अंनिस’ ही स्वयंसेवी संस्था चालवत होते. या संस्थेला म्हणजे अंनिसला नक्षलवादी ‘इकोसिस्टीम’ने (यंत्रणेने) अवास्तव मोठे करून त्यांचे कार्य कसे महान सामाजिक कार्य कसे आहे, याचा बागूलबुवा निर्माण केला. प्रत्यक्षात हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, माहिती अधिकार कार्यकर्ते श्री. राहुल कोल्हापुरे यांच्यासारख्या व्यक्तींनी अंनिसच्या ‘आर्थिक ताळेबंदा’ची माहिती ही माहिती अधिकारात मागवले. त्यातून त्यांच्या ट्रस्टमधील आर्थिक घोटाळे, ‘विदेशी योगदान नियमन कायद्या’चे उल्लंघन करून मिळणार्या विदेशातील देणग्या अशा गोष्टी समोर आणल्या आणि अवघ्या महाराष्ट्रासमोर यांच्या तथाकथित सामाजिक कार्याचा बुरखा फाडला.
वर्ष १९६२ च्या भारत-चीन युद्धाच्या वेळी भारतविरोधी कारवाया केल्या; म्हणून ज्या मोजक्या लोकांना अटक करण्यात आली होती, त्यात एक नाव होते, कॉम्रेड गोविंद पानसरे ! भ्रष्ट आणि देशद्रोही प्रतिमा असलेल्या पानसरे यांनी स्वपक्षातच अनेक घोटाळे केल्याचे लक्षात येत होते, त्यांना कुणीतरी गोळ्या घातल्या, म्हणून निरपराध हिंदुत्वनिष्ठ तरुणांना बळजोरीने त्या प्रकरणांमध्ये गुंतवण्यात आले. पानसरे यांची हत्या झाल्यानंतर या प्रकरणामध्ये डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना नाहक गुंतवून अटक करण्यात आली. त्यांच्याविषयी पोलीस न्यायालयामध्ये एकही पुरावा सादर करू शकले नाहीत. त्यांना जेव्हा पानसरे प्रकरणांमध्ये जामीन देण्यात आला, त्या वेळेला पोलिसांना विचारण्यात आले, ‘‘यांना तुम्ही अटक का केली ? यांच्याविषयी तुमच्याकडे काही पुरावा आहे का ?’’ तर त्याचे उत्तर पोलिसांनी ‘नाही’ असे दिले. असे होते, तर तुम्ही डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, जे ‘कान-नाक-घसा तज्ञ आणि शल्यचिकित्सक’ आहेत, त्यांना तुम्ही या प्रकरणामध्ये अटक का केली ? या प्रश्नाचे उत्तर कोण देणार ? त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केलेल्या अधिकार्यांना शिक्षा कोण करणार ? हा आजचा सर्वांत मोठा प्रश्न आहे. ज्या विदेशी शक्तींचे हस्तक म्हणून हे पोलीस अधिकारी वागले, त्यांनी सनातन संस्थेची अपकीर्ती करण्यासाठी तिच्या कार्यकर्त्यांना अटक केली, सहस्रो कार्यकर्त्यांची छळवणूक केली, त्या अधिकार्यांना शिक्षा कोण करणार ?
५. दाभोलकरांच्या हत्येनंतर अनुभवलेली पीतपत्रकारिता !
(टीप : वृत्तपत्राचा खप वाढवण्यासाठी लक्षवेधक मथळे देऊन आणि कुठलीही शहानिशा न करता किंवा अत्यल्प पुरावे वा आधार असतांना बातमी किंवा लिखाण प्रकाशित करणे, म्हणजे पीतपत्रकारिता होय.)
‘दाभोलकर हत्येनंतर विविध वृत्तवाहिन्यांनी, विशेषतः ‘आयबीएन् लोकमत’ वृत्तवाहिनीने ‘दाभोलकर हत्येचा पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस, असे जवळजवळ ५०, ६० दिवस त्यांच्या मालिका चालू ठेवल्या होत्या. दाभोलकर हत्येचा आजचा कितवा दिवस आहे, याचा वाहिनीच्या स्क्रीनवर कोपर्यामध्ये लोगो (बोधचिन्ह) दाखवला जायचा. जणू काही गांधी हत्येनंतर भारतामध्ये एवढी मोठी हत्या दुसरी कुठलीच झाली नाही. वास्तविक केरळमध्ये २५० हून अधिक संघ कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या आहेत. भारतात ४५० हून अधिक हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या झाल्या आहेत. सतीश शेट्टी या माहिती अधिकार कार्यकर्त्याचीही हत्या झाली होती. अशा अनेक हत्या देशभरामध्ये झाल्या होत्या; पण असे दिवस कधी मोजले गेले नव्हते. त्यांची संख्याही मोजली जात नव्हती. त्याच्या बातम्याही कधी दाखवल्या नव्हत्या. काश्मीरमध्ये ५ लाख हिंदूंना विस्थापित व्हावे लागले होते, त्याची कधी वाहिन्यांनी नोंद घेतली नाही. नक्षलवाद्यांनी १४ सहस्रांहून अधिक निरपराध नागरिकांच्या हत्या केल्या आहेत. त्याविषयी कधी कुणी ‘ब्र’ही काढला नाही; परंतु दाभोलकरांच्या हत्येनंतर पीतपत्रकारिता करून ‘सिलेक्टिव्ह जर्नलिझम्’ कसे असते ? हे या तथाकथित साम्यवादी पत्रकार टोळीने दाखवून दिले. आज सनातन संस्थेच्या ३ कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. निखिल वागळे यांच्यामध्ये धैर्य असल्यास त्यांनी वाहिनीवर येऊन जाहीर क्षमा मागायला हवी; पण ते हे कधीही करणार नाहीत; कारण त्यांच्यामध्ये एवढी निर्भयता नक्कीच नाही. उलट तिघे निर्दाेष सुटल्याने त्यांचे पित्त खवळलेलेच आहे. त्यांच्या चुकांचे ते जाहीर पापक्षालन करतील, ही अजिबात शक्यता नाही; कारण गांधींचे नुसते नाव घ्यायचे, एवढेच त्यांना ठाऊक आहे.
६. पोलिसांकडून हिंदुत्वनिष्ठ, साधक, हितचिंतक यांच्याही चौकशा
दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश इत्यादी साम्यवाद्यांच्या हत्या झाल्या. त्यात १० सहस्रांपेक्षा अधिक हिंदुत्वनिष्ठांच्या चौकशा करण्यात आल्या. केवळ हिंदुत्वनिष्ठ संघटनांची अपकीर्ती करणे, हा यामागील उद्देश होता. हिंदुत्वाचे कार्य नवीन कार्यकर्त्यांनी करू नये, यासाठी पोलीस कार्यकर्त्यांना भीती दाखवत होते. सनातनच्या हितचिंतकांना ‘सनातन संस्थेला अर्पण देऊ नका’, ‘सनातनच्या कार्यापासून लांब रहा’, अशा प्रकारच्या धमक्या पोलीस अधिकारी देत होते. अशा सहस्रो घटना आज आमच्याकडे आहेत. ज्या देशामध्ये बहुसंख्यांक हिंदू रहातात, त्या देशामध्ये अध्यात्माचे कार्य करणे किती कठीण आहे ? हे आपल्याला यातून लक्षात येईल. ‘आपल्यावर झालेले आघात विसरणे, हा सद्गुण नसून हा दुर्गुण आहे’, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.
७. हिंदुत्वनिष्ठांना कारागृहातून बाहेर काढणे, हे आपले कर्तव्य !
आज जरी सनातन संस्थेचा वटवृक्ष पाहिल्यानंतर आपल्याला समाधान होत असले, आधार वाटत असला, आनंद होत असला, तरी त्या वृक्षवाढीसाठी किती साधकांनी त्याग केला आहे ? हे आपल्याला लक्षात यावे, यासाठीच मी आपल्याला सांगत आहे. आज देशामध्ये हिंदुत्वनिष्ठांचे सरकार आहे. आज देशांमध्ये हिंदूंचा एक आवाज निर्माण झाला आहे. अशा वेळेला आम्ही या कार्यकर्त्यांच्या सुटकेसाठी संवैधानिक मार्गाने प्रयत्न केले नाहीत, जर यांना कारागृहाच्या बाहेर काढले नाही, त्यांना विसरून गेलो, तर ते महापाप होईल. जसे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांना स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही कैदेत रहावे लागले’, तसा दुर्दैवी प्रकार पुन्हा घडू नये, यासाठी आपणही प्रयत्न करायला हवेत.
८. हिंदुत्वनिष्ठांच्या सुटकेसाठी मोठे राजकारणी, अधिवक्ते आदींना यात लक्ष घालण्याची विनंती करा !
आपल्यासमोर आपल्यातीलच काही आदर्श आहेत की, ज्यांनी या कठीण कालावधीमध्ये या कार्यकर्त्यांच्या सुटकेसाठी ठोस आणि दिशा घेऊन प्रयत्न केले. त्यातील ‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’चे पू. भिडेगुरुजी यांनी आम्हाला वेळोवेळी आधार दिला. त्यातून काही चांगल्या गोष्टीही घडल्या. राजकारण्यांना ही गोष्ट कुठेतरी आपण लक्षात आणून दिली पाहिजे की, ज्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला सत्तेवर बसण्यासाठी कारागृहवास भोगला, त्यांना तुम्ही विसरून चालणार नाही. आपल्यापैकी अनेक जण मोठमोठ्या लोकांना जाणत असाल, अनेक उच्च पदांवर असलेल्या व्यक्तींना जाणत असाल, कुणी मोठे अधिवक्ते आपल्याला परिचित असतील, कुणी मोठे राजकारणी आपल्याला परिचित असतील, तर त्यांना आपण ‘या प्रकरणांमध्ये लक्ष घालून या हिंदुत्वनिष्ठांना योग्य न्याय मिळवून द्या’, अशी आवर्जून विनंती केली पाहिजे, हे आपले कर्तव्य आहे. या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष कुठल्याही पक्षाचे कार्य केले नसले, तरीसुद्धा आज आपण ज्या काही अराजकीय संघटना हिंदुत्वाचे कार्य करत आहोत, त्यातून हिंदुत्वनिष्ठ मतदार सिद्ध होतो. त्यातून काँग्रेसविरोधी शक्ती सिद्ध होतात. हे मात्र वास्तव आहे. त्याचा थेट लाभ हिंदुत्वनिष्ठ नेत्यांना होतो. अशा वेळी या हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना जर कुणी हिंदुत्वनिष्ठ राजकीय नेता विसरत असेल, तर त्याला जाणीव करून देणे, हे आपल्या सर्वांचे परमकर्तव्य आहे.
९. पोलिसांकडून हिंदुत्वनिष्ठांना मिळणारी क्रूर आणि जाचक वागणूक !
सनातन संस्थेने पोलिसांच्या जाचक छळाचा गेली १५ वर्षे दैनंदिन अनुभव घेतला आहे. अनेक कार्यकर्त्यांना घंटोन्घंटे पोलीस ठाण्याच्या बाहेर बसावे लागले; कारण हे २५ कार्यकर्ते जरी आपल्याला कारागृहात दिसत असले, तरी किमान १६०० कुटुंबांची चौकशी झाली आहे आहे. त्यातील किमान १ सहस्र युवकांना पोलिसांनी छळले आहे, त्यात काही महिलाही होत्या. दुर्दैवाने हे की, अजूनही असा एकही आठवडा जात नाही की, कुठल्या कार्यकर्त्याला चौकशीसाठी पोलिसांनी बोलावले नाही. पोलीस कसे राजकीय नेत्यांच्या हातातील बाहुले आहेत, हे आपण अनेक जणांनी गेली अनेक वर्षे अनुभवले आहे.
९ अ. पोलीस प्रशासनाकडून हिंदुत्वनिष्ठ आरोपींना तातडीचे वैद्यकीय साहाय्य न मिळणे : डॉ. वीरेंद्रसिंह तावडे गेली ८ वर्षे कारागृहात खितपत पडले होते. त्यांना विविध आजार आहेत. त्या वेळी त्यांनी माननीय न्यायमूर्तींना विनंती केली की, मला तातडीने उपचारांची आवश्यकता आहे. मी डॉक्टर आहे, मला पक्षाघाताची पूर्वलक्षणे जाणवत आहेत, मला तातडीने वैद्यकीय उपचार द्या. माननीय न्यायमूर्तींनीही ती मागणी मान्यही केली; परंतु कारागृह प्रशासनाने त्याची कार्यवाही करण्यास विलंब केला आणि ती ‘ट्रीटमेंट’ (उपचार) मिळू शकली नाही. भारतावर आक्रमण करणार्या कसाबला कारागृहात बिर्याणी पोचवली जाते; मात्र हिंदुत्वनिष्ठांना साधे उपचारही मिळू दिले जात नाहीत, हे चित्र सरकारच्या दृष्टीने चांगले नाही. ही समस्या केवळ सनातन संस्थेची नसून संपूर्ण हिंदु समाजाची समस्या आहे. ही विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी त्यांची समस्या म्हणून पहावे; कारण सनातन संस्थेच्या मर्यादा आहेत. आपल्यापैकी अनेक जण अधिक प्रभावीपणे कार्य करू शकतात. या कार्यकर्त्यांची सुटका जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत आम्ही कुणीही शांततेने दोन घास खाऊ शकणार नाही; कारण हिंदुत्वासाठी ते कार्यकर्ते हा सर्व त्रास सहन करत आहेत, त्यांचे कुटुंबीयही अनेक अडचणींचा सामना करत आहेत. तरीही ते हिंदुत्वापासून झुकलेले नाहीत. आज मुसलमान आतंकवादी याकूब मेमनची फाशी रहित करण्यासाठी देशातील साम्यवादी मोठमोठे विचारवंत पहाटे ३ वाजता सर्वाेच्च न्यायालय उघडायला लावून त्याची फाशी रहित करण्याची मागणी करतात, हे आपल्यासाठी त्यांनी करणे शक्य आहे का ? याकूब मेमनच्या अंत्ययात्रेत लाखो मुसलमान सहभागी होऊन त्याच्या कबरीवर सजावट करतात. तो आतंकवादी, भारतविरोधी असूनही त्याच्यामागे संपूर्ण मुसलमान समाज उभा रहातो. सहस्रो लोकांना ठार मारणार्या नक्षलवाद्यांसाठीही अशाच प्रकारे न्यायालयात, समाजातील साम्यवादी उभे रहातात, तर हिंदुत्वासाठी कारागृहात जाणार्या, त्रास भोगणार्या हिंदुत्वनिष्ठांना आपण विसरणे, हे एक प्रकारे पापच नाही का ? हे आम्ही कदापि विसरू शकत नाही. हिंदुत्वनिष्ठांच्या सुटकेसाठी स्वतःला जे शक्य आहे, ते सर्व प्रयत्न करा !
– श्री. अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था.