सरकारीकरण झालेल्‍या मंदिरांमध्‍ये ऑनलाइन सेवांची पूर्तता करण्‍यात अडचणी : पुजार्‍यांनी मांडली व्‍यथा !

अखिल कर्नाटक हिंदु मंदिर पुजारी फेडरेशन’चे महासचिव के.एस्.एन्. दीक्षित

बेंगळुरू (कर्नाटक) : कर्नाटकात सरकारी मालकीच्‍या मंदिरांमध्‍ये भक्‍तगण रात्री ऑनलाइन सेवा नोंदवतात आणि दुसर्‍या दिवशी सकाळी एक किलो प्रसाद ‘हॉटेलमधून ऑर्डर केल्‍याप्रमाणे’ पुरवावा अशी अपेक्षा करतात. अशा ऑनलाइन सेवांची पूर्तता करण्‍यात अनेक अडचणी येतात, अशी तक्रार पुजार्‍यांनी केली आहे.

कर्नाटकात ३४ सहस्र मंदिरे सरकारच्‍या कह्यात आहेत. त्‍यांपैकी २०५ मंदिरे ‘ए’ श्रेणीतील आहेत, ज्‍यांचे वार्षिक उत्‍पन्‍न २५ लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. ५ लाख ते २५ लाख रुपयांपर्यंत उत्‍पन्‍न असणारी १९३ मंदिरे आहेत ‘बी’ श्रेणीतील, तर उर्वरित ५ लाखांपेक्षा अल्‍प उत्‍पन्‍न असणारी मंदिरे ‘सी’ श्रेणीतील मंदिरे आहेत. ‘ए’ आणि ‘बी’ श्रेणीतील मंदिरांमध्‍ये ऑनलाइन सेवांचा समावेश आहे. ऑनलाइन सेवांची पूर्तता करतांना पुजार्‍यांना  अनेक गैरसोयींना सामना करावा लागत आहे. त्‍यामुळे पुजारी ऑनलाइन सेवांना विरोध करत आहेत, असे ‘अखिल कर्नाटक हिंदु मंदिर पुजारी फेडरेशन’चे महासचिव के.एस्.एन्. दीक्षित यांनी सांगितले.

खासगी एजन्‍सीद्वारे ‘ऑनलाईक बुकिंग’ केल्‍यामुळे पैसे एजन्‍सीच्‍या खात्‍यात जातात आणि मंदिरांपर्यंत पोचायला अनेक आठवड्यांचा कालावधी लागतो, असे दीक्षित म्‍हणाले. किराणा वस्‍तू खरेदी करण्‍यासाठी पुजार्‍यांना उत्‍पन्‍न हवे असते; परंतु ऑनलाइन पैसे भरल्‍यामुळे ते पैसे खाजगी एजन्‍सीकडे जातात. ही सेवा नसून व्‍यापार झाला आहे, असे दीक्षित यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

मंदिर सरकारीकरणाचे दुष्‍परिणाम ! यासाठी मंदिरे भक्‍तांच्‍याच कह्यात हवीत !