प्रेमळ आणि सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता असणारे सनातनचे मंगळुरू, कर्नाटक येथील बालसंत पू. भार्गवराम (वय ७ वर्षे ) !

‘वर्ष २०२३ मार्चमध्ये माझी शारीरिक स्थिती ठीक नव्हती. त्यामुळे मी वैद्यकीय उपचार आणि नामजपादी उपाय करण्यासाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आले होते. तेव्हा गुरुकृपेने मला सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम प्रभु यांचा सत्संग लाभला. त्या वेळी पू. भार्गवराम यांच्याकडून मला शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

पू. भार्गवराम प्रभु

१. चिक्की आवडत असूनही पू. भार्गवराम यांनी अन्य बालसाधकांएवढीच चिक्की घेणे

‘‘माझे हात आणि पाय यांमध्ये गाठी झाल्या होत्या. त्यामुळे मला रात्री झोप लागत नसे. त्यासाठी मला प्रतिदिन अग्निहोत्र करण्यास सांगितले होते. मी खोलीत अग्निहोत्र करत असतांना पू. भार्गवराम येत असत. एकदा अग्निहोत्र झाल्यावर मी बालसाधकांना राजगिर्‍याची चिक्की दिली. पू. भार्गवराम यांना राजगिर्‍याचे लाडू आणि चिक्की आवडते. त्यानंतर मी पू. भार्गवराम यांना सांगितले, ‘‘तुम्ही उर्वरित सर्व चिक्की घ्या.’’ त्या वेळी ते म्हणाले, ‘‘सर्व बालसाधकांना सोडून मी एकटा सर्व चिक्की कसा खाऊ ?’’ त्यांनी राहिलेली चिक्की सर्वांना वाटली आणि प्रत्येक बालसाधकाला जेवढी चिक्की दिली, तेवढीच चिक्की त्यांनी स्वतः घेतली.

२. प्रेमभाव

कु. पूनम चौधरी

एकदा एक बालसाधक माझ्या खोलीत आला होता. तो अन्य बालसाधकांमध्ये मिसळत नव्हता. हे पू. भार्गवराम यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी स्वतःची गाडी त्या बालसाधकाला खेळण्यासाठी दिली. त्यानंतर तो बालसाधक सर्वांशी खेळू लागला.

३. सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता

एके दिवशी अग्निहोत्राच्या वेळी पू. भार्गवराम म्हणाले, ‘‘आता भगवान परशुराम आणि त्यांच्या समवेत अन्य देवता या ठिकाणी उपस्थित आहेत.’’

४. आलेल्या अनुभूती

४ अ. पू. भार्गवराम मांडीवर बसल्यावर वाईट शक्तींचे त्रास दूर होऊन आनंद मिळणे : मी अग्निहोत्र करत असतांना पू. भार्गवराम माझ्या मांडीवर बसत असत. (पूज्य भार्गवराम यांच्या आई सौ. भवानी प्रभु यांनी सांगितले, ‘‘पू. भार्गवराम सहसा कुणाच्याही मांडीवर बसत नाहीत.’’) त्या वेळी पू. भार्गवराम यांच्यामुळे मला होत असलेले वाईट शक्तींचे त्रास दूर होऊन मला पुष्कळ आनंद मिळत असे.

४ आ. एक दिवस मला ‘अग्निहोत्राचे कुंड मंदिराप्रमाणे आहे’, असे वाटले.

४ इ. पू. भार्गवराम यांच्या चरणांना दैवी सुगंध येतो.

४ ई. अग्निहोत्राचा अग्नि पू. भार्गवराम यांच्या दिशेने जाणे : एकदा पू. भार्गवराम यांनी सांगितले, ‘‘मी ज्या बाजूला बसतो, त्या दिशेला अग्निहोत्राचा अग्नि जातो.’ त्या वेळी एका बालसाधिकेने त्यांना दुसर्‍या बाजूला बसायला सांगितले. तेव्हा पू. भार्गवराम ज्या ठिकाणी बसले, त्या दिशेलाही अग्नि जात होता.

४ उ. अग्निहोत्र करत असतांना ‘पू. भार्गवराम तेथे सूक्ष्मातून उपस्थित असतात’, असे मला जाणवते.

‘प.पू. डॉक्टरांच्या कृपेने मला पू. भार्गवराम यांच्यातील देवत्व प्रकट होणारे क्षण अनुभवता आले’, याबद्दल गुरुदेवांच्या (प.पू. डॉक्टरांच्या) पावन चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– सुश्री (कु.) पूनम चौधरी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

(२१.५.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  •  वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. 
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक