|
इंदूर (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यात असलेल्या १३ व्या शतकातील ऐतिहासिक भोजशाळेत ९८ दिवस चाललेल्या भारतीय पुरातत्व विभागाचा सर्वेक्षण अहवाल मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपिठात सादर करण्यात आला. या अहवालाच्या आधारे उच्च न्यायालयात २२ जुलै या दिवशी सुनावणी होणार आहे. सध्या हा अहवाल सार्वजनिक न करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. इंदूर उच्च न्यायालयाच्या आदेशावरूनच हे सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणाच्या काळात मुसलमान पक्षाकडून वेळोवेळी आक्षेप घेण्यात आले; मात्र त्याकडे दुर्लक्ष करत सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. सर्वेक्षणाच्या वेळी करण्यात आलेल्या उत्खननात भूमीतून अनेक विशेष अवशेष काढण्यात आले. भोजशाळेत भिंती आणि खांब यांच्यासह ३७ देवतांच्या मूर्तीही सापडल्या. एकूण १ सहस्र ७०० अवशेष सापडले आहेत. त्यांतील ६५० अवशेष सर्वाधिक महत्त्वाचे आहेत.
११ मार्च ते २७ जून या कालावधीत हे सर्वेक्षण करण्यात आले. इंदूर उच्च न्यायालयाने भोजशाळेच्या ५०० मीटरच्या परिघात वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याचा आदेश दिला होता. सर्वेक्षणाच्या वेळी उत्खननही करण्यात आले. या सर्वेक्षणाची छायाचित्रे काढण्यासह चित्रीकरणही करण्यात आले.
#WATCH | Archeological Survey of India to present a report on Bhojshala Complex in Dhar | Advocate Hari Shankar Jain says, ” Today is a very happy occasion…it has been clear by the (ASI) report today that there used to be a Hindu temple…only Hindu puja should take place… pic.twitter.com/Ewca3Kjs7Z
— ANI (@ANI) July 15, 2024
जैन समाजाचाही भोजशाळेवर दावा !
जैन समाजानेही भोजशाळेवर दावा केला आहे. भोजशाळा एक जैन धार्मिक स्थळ असल्याचा दावा करणारी याचिका उच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली आहे. त्यावरही उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
काय आहे प्रकरण?
‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’ या संघटनेने १ मे २०२२ या दिवशी इंदूर उच्च न्यायालयात भोजशाळेविषयी याचिका प्रविष्ट (दाखल) करण्यात आली. यात ‘प्रत्येक मंगळवारी हिंदू यज्ञ करून भोजशाळेची वास्तू शुद्ध करतात आणि शुक्रवारी मुसलमान नमाजपठणाच्या नावाने वास्तू अशुद्ध करतात. हे थांबवले पाहिजे. भोजशाळेचे संपूर्ण नियंत्रण हिंदूंच्या हाती द्यावे. त्यासाठी आवश्यकता भासल्यास संपूर्ण वास्तूचे छायाचित्रण, चित्रीकरण आणि उत्खनन करण्यात यावे’, अशी मागणी करण्यात आली होती. या याचिकेवरून न्यायालयाने पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण करून घेण्याचा आदेश दिला होता. याच आवारात मुसलमान आक्रमकांनी बांधलेली कमल मौला मशीद आहे.
भोजशाळा काय आहे ?
११ व्या शतकात परमार घराण्याने मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यावर राज्य केले. राजा भोज हे वर्ष १००० ते १०५५ पर्यंत धारचे शासक होते. विशेष म्हणजे राजा भोज श्री सरस्वतीदेवीचे परमभक्त होते. वर्ष १०३४ मध्ये राजा भोज यांनी एक महाविद्यालय स्थापन केले. हे महाविद्यालय नंतर ‘भोजशाळा’ म्हणून ओळखले जाऊ लागले. यालाच वाग्देवीचे (सरस्वतीदेवीचे) मंदिरही म्हटले जात होते.
आमचा दावा अधिक सशक्त झाला ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन
‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’चे याचिकाकर्ते आणि अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी म्हटले की, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने आज इंदूर उच्च न्यायालयासमोर अहवाल सादर केला आहे. हा अहवाल २ सहस्र पानांचा आहे. आम्ही अहवालाचा तपशील पहात आहोत. मी अहवालाच्या आधारे सांगू शकतो की, तो फार सकारात्मक आहे. यामुळे आमच्या ‘भोजशाळा पूर्वीपासून अस्तित्वात असलेली हिंदू रचना होती जी बेकायदेशीरपणे मशिदीत रूपांतरित झाली’ हा दावा अधिक सशक्त झाला. आमची मूळ मागणी आहे की, येथे शुक्रवारी मुसलमानांना नमाजपठणाची देण्यात आलेली अनुमती रहित करण्यात यावी.