-
मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एन्.आय.ए. न्यायालयात सुनावणी !’
-
मुंबई माजी पोलीस आयुक्तांनी दिले होते आदेश
मुंबई – वर्ष २००८ मधील मालेगाव बाँबस्फोट प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक मोहन भागवत यांना उचलून मुंबईत आणण्याचे आदेश दिले होते, अशी माहिती उघड झाली आहे. तत्कालीन आतंकवादविरोधी पथकाचे अधिकारी मेहबूब मुजावर यांना परमबीर सिंह यांनी हा आदेश दिला होता; मात्र हा आदेश तोंडी आणि बेकायदेशीर असल्याने मेहबूब मुजावर यांना विनाकारण एका प्रकरणात गोवण्यात आल्याचा दावा मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एन्.आय.ए. न्यायालयात करण्यात आला. २९ सप्टेंबर २००८ या दिवशी मालेगाव येथे मशिदीजवळ असलेल्या दुचाकीवर बाँबस्फोट झाला होता. त्यात ६ जणांचा मृत्यू झाला होता. १०० हून अधिक नागरिक घायाळ झाले होते. या खटल्याची सुनावणी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एन्.आय.ए. न्यायालयात चालू आहे. न्यायाधीश ए.के. लाहोटी यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत खटल्यातील आरोपी क्रमांक १० असलेले सुधाकर द्विवेदी यांच्या वतीने अधिवक्ता रणजित सांगळे यांनी वरील युक्तीवाद केला.
१. अधिवक्ता रणजित सांगळे म्हणाले की, मेहबूब मुजावर यांना परमबीर सिंह यांनी मोहन भागवत यांच्या संदर्भात दिलेला आदेश बेकायदेशीर आणि लिखित स्वरूपात नसल्याने मुजावर यांनी परमबीर सिंह यांच्या आदेशाचे पालन केले नाही. त्यामुळे सोलापूर येथील एका खोट्या प्रकरणात मुजावर यांना गोवण्यात आले. ही माहिती मुजावर यांनी सोलापूर न्यायालयात दिली होती.
२. संदीप डांगे आणि रामचंद्र कालसंग्रा या दोघांचा आतंकवादविरोधी पथकाच्या कोठडीत मृत्यू झाला होता; पण त्यांना या खटल्यास फरार आरोपी म्हणून दाखवण्यात आले, असे मुजावर यांनी माध्यमांसमोर सांगितले होते; पण आता आतंकवादविरोधी पथकाला ते दोघे हवे आहेत, असे अधिवक्ता सांगळे म्हणाले.