संबंधित अधिकार्यांवरही कारवाई होणार

मुंबई, २१ मार्च (वार्ता.) – पालघर जिल्ह्यात ‘जलजीवन मिशन’च्या योजनेत एकाच ठेकेदाराला अनेक कामे दिली जात असल्याने कामे निकृष्ट होत असल्याचा आरोप होत आहे. चळणी ग्रामपंचायत क्षेत्रातील सुकड आंबा शिरसूनपाडा येथे हर्षला पागी आणि संजना प्रकाश राव या २ मुली पाण्याच्या टाकीवर खेळत असतांना टाकी कोसळून त्या मृत्यूमुखी पडल्या. या प्रकरणी आमदार राजेंद्र गावित यांनी २१ मार्च या दिवशी विधानसभेत लक्षवेधी मांडली. त्यावर पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी या प्रकरणी संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे, तसेच या प्रकरणी ठेकेदारावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (विधानसभेत सदस्यांनी आवाज उठवल्यानंतर मंत्री याविषयी कारवाई करतात, इतर वेळी जलजीवन मिशनच्या योजनेतील निकृष्ट दर्जाची कामे करणारे संबंधित ठेकेदार आणि त्याच्याशी संगनमताने भ्रष्टाचार करणार्या प्रशासकीय अधिकार्यांवर कारवाई का होत नाही ? पाणीपुरवठा मंत्र्यांनी अशा प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करणे आवश्यक आहे. – संपादक)
त्या २ मुली ३० फूट उंचीवरून खाली पडल्या. त्यांच्या डोक्याला मार लागून त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये ‘जलजीवन मिशन’च्या कामाविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे.