पणजी, २१ मार्च (पत्रक) – गोवा सरकारचे पर्यटन खाते गोव्याच्या समुद्रकिनार्यांवरील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाला तोंड देण्यासाठी सर्वसमावेशक श्वान निर्बीजीकरण आणि उपचार मोहीम चालू करणार आहे. सार्वजनिक सुरक्षा, प्राणी कल्याण आणि स्वच्छ पर्यटन अनुभव सुनिश्चित करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
२४ मार्चपासून निर्बीजीकरण आणि उपचार कार्यक्रम विविध समुद्रकिनार्यांवर राबवला जाईल. यातील ठिकाणांच्या संदर्भात तपशीलवार माहिती संबंधित अधिकार्यांना दिली जाईल. या उपक्रमाविषयी पर्यटन संचालक श्री. केदार नाईक म्हणाले, ‘‘या श्वान निर्बीजीकरण आणि उपचार मोहिमेमुळे भटक्या कुत्र्यांच्या त्रासाला आळा घालण्यास साहाय्य होणार.’’
पर्यटन खात्याकडून समुद्रकिनार्यांवरील दलाल आणि अवैध व्यवसाय यांवर कडक कारवाई
पणजी – गोवा सरकारचे पर्यटन खाते राज्याच्या समुद्रकिनार्यांवरील दलाल आणि अवैध व्यवसाय यांच्या उपद्रवाविरुद्ध कठोर कारवाई करत आहे. या कारवाईचा उद्देश पर्यटकांची सुरक्षा सुनिश्चित करणे आणि त्यांना गोव्यात चांगला अनुभव देणे, हा आहे. तसेच यातून केवळ अधिकृत व्यवसायच नियुक्त क्षेत्रांमध्ये काम करतील, याची निश्चिती केली जाणार आहे.
दलाल आणि अनधिकृत विक्रेत्यांना समुद्रकिनार्याच्या ठिकाणी काम करण्यापासून रोखण्यासाठी खात्याने शॅक चालक (शॅक म्हणजे समुद्रकिनार्यावर मद्य आणि जेवण पुरवणारे तात्पुरते उपाहारगृह), बीच असोसिएशन आणि इतर संबंधितांना निर्देश जारी केला आहे. ते समुद्रकिनार्यावरील परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यास अपयशी ठरल्यास पर्यटन खाते स्वतः या अनधिकृत व्यावसायिकांना कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी कायदेशीर यंत्रणेसह पाऊल उचलणार, असे सांगण्यात आले आहे.