विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची सरकारवर टीका

मुंबई, २१ मार्च (वार्ता.) – राज्यात सध्या औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण चांगलेच तापलेले आहे. ‘छत्रपतींच्या आशीर्वादावर सरकार चालते’, असे सरकार म्हणते. सत्ताधार्यांनी छत्रपती शंभूराजांच्या मारेकर्याभोवती जणू किल्लाच (संरक्षणात्मक) उभा केला आहे. कबरीच्या संरक्षणासाठी आता सैन्यदलाला बोलवायचे शेष राहिलेले आहे, असे म्हणत औरंगजेबाच्या कबरीला दिलेल्या सुरक्षेवरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर टीका केली आहे.
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेचे पथक छत्रपती संभाजीनगर येथे !
औरंगजेब कबरीवरून चालू असलेल्या वादामुळे नागपुरात दंगल झाली. मराठवाड्यातही तणाव निर्माण होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेचे (एन्.आय.ए) देहलीचे एक पथक २० मार्चला छत्रपती संभाजीनगर शहरात आले आहे. राज्यभरात हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून खुलताबाद येथील कबर हटवण्यासाठी आंदोलने चालू आहेत.
औरंगजेबाच्या कबरीचा विषय या क्षणी निरर्थक आहे, असे रा.स्व. संघानेही सांगितले आहे. औरंगजेबाची कबर काढून टाकण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारला काही पत्र लिहिले असेल, असे मला वाटत नाही. बाबरी पाडतांना कुणाची अनुमती घेतली नव्हती. करसेवेला जातांना फडणवीसांचे छायाचित्र मी पाहिले आहे. आता त्यांनी कुदळ-फावडे घेऊन कबर तोडायला गेले पाहिजे. – ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत |