मुंबई, २१ मार्च (वार्ता.) – अमरावती औद्योगिक क्षेत्रांमध्ये महामंडळाकडून ६०६ भूखंडांचे वाटप करण्यात आले आहे. त्यातील ५२४ भूखंडावर उद्योग उभारले आहेत. सध्या २० भूखंड मोकळे आहेत. राज्यातील औद्योगिक क्षेत्रांमध्ये किती भूखंड मोकळे आहेत, त्याचा आढावा घेतला जाईल. या औद्योगिक क्षेत्रांतील विविध समस्यांविषयी येत्या १५ दिवसांमध्ये बैठक घेऊन त्यावर तोडगा काढू, असे आश्वासन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी विधान परिषदेमध्ये दिले. भाजपचे आमदार श्रीकांत भारतीय यांनी याविषयी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
मंत्री नाईक म्हणाले की, राज्यातील अनेक भूखंड वापराविना रिकामे आहेत. त्यातील काही भूखंडांचा विकास कालावधी अद्यापही शेष आहे. सदर भूखंडधारकांना वापर करण्यासंबंधी सूचना करण्यात आल्या आहेत. ज्या भूखंडाची समयमर्यादा संपली आहे, त्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. घेतलेल्या भूखंडावर किती दिवसांमध्ये उद्योग उभारणे याचा निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक औद्योगिक क्षेत्रांमध्ये महिलांना, महिला उद्योगांना प्राधान्यही देण्यात येत आहे.