प्रश्नोत्तरात मंत्री उपस्थित न रहाणे खेदजनक ! – राहुल नार्वेकर, अध्यक्ष, विधानसभा
मुंबई, २१ मार्च (वार्ता.) – विधानसभेत २१ मार्च या दिवशी सकाळी ११ वाजता कामकाजाला प्रारंभ झाल्यानंतर प्रश्नोत्तरे पुकारण्यात आली; मात्र त्या वेळी सदस्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी संबंधित खात्यांचे मंत्रीच उपस्थित नव्हते. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांनी खेद व्यक्त केला. त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेचे कामकाज १० मिनिटांसाठी स्थगित केले. प्रश्नोत्तराच्या वेळी संबंधित खात्याचा जो प्रश्न आहे, त्याची उत्तरे देण्यासाठी त्या खात्यांचे मंत्री आणि राज्यमंत्री यांनी सभागृहात वेळेवर उपस्थित रहाणे आवश्यक आहे, असे स्पष्ट केले.
अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, विधान परिषदेत कामकाज चालू असल्याने तेथेही मंत्र्यांना जावे लागते, हे मान्य आहे; मात्र प्रश्नोत्तराच्या वेळी सभागृहात मंत्री, राज्यमंत्री उपस्थित नसल्याने प्रश्नोत्तरातील पहिले १० प्रश्न प्रलंबित ठेवावे लागतात, हे खेदजनक आहे. एखादवेळी विधानसभा आणि विधान परिषदेतील लक्षवेधी मागे ठेवता येते; मात्र प्रश्नोत्तराच्या वेळी मंत्र्यांनी उपस्थित राहून प्रश्नांची उत्तरे देणे आवश्यक आहे, असे सांगितले. त्यानंतर प्रश्नोत्तराचे कामकाज चालू झाले.
संपादकीय भूमिका :विधानसभेत लोकप्रतिनिधी वेळेत उपस्थित रहात नसतील, तर जनता त्यांचा काय आदर्श घेणार ? |