आजपासून ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’ची ‘सांगली युवा संसद’ भरणार !

सांगली – अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सांगली जिल्हा आयोजित ‘सांगली युवा संसद’ हे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे दोन दिवसीय प्रति संसदीय अधिवेशन २२ आणि २३ मार्च या दिवशी वसंतदादा पाटील सभागृह, सांगली जिल्हा परिषद येथे आयोजित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमधील प्रतिभावान आणि नेतृत्व करण्यास इच्छुक असणार्‍या विद्यार्थ्यांना संसदीय कार्यपद्धतीची ओळख व्हावी, विविध राष्ट्रीय आणि स्थानिक सूत्रांवर चर्चा व्हावी, या हेतूने ‘सांगली युवा संसदे’चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अ.भा.वि.प. सांगली जिल्हा संयोजक प्रियांका माने यांनी दिली आहे.

प्रियांका माने म्हणाल्या, ‘‘संसदीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन गटांमध्ये ‘एक देश एक निवडणूक’, समान नागरी कायदा आणि ‘झिरो अवर’ या तीन सत्रांमध्ये चर्चा अन् वादविवाद होईल. दुसर्‍या दिवशी दिवसभर ‘सांगलीचा शाश्वत विकास’ या विषयावर विद्यार्थ्यांच्या मनातील संकल्पना सर्वांपुढे मांडल्या जातील. सांगली युवा संसदेच्या शेवटच्या सत्रात सांगली जिल्ह्यातील सर्व विधानसभा आणि विधान परिषद सदस्य उपस्थित राहून थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. विद्यार्थ्यांमधील नेतृत्वगुण विकसित करून त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ही सांगली युवा संसद एक मैलाचा दगड ठरेल.’’